‘चातुर्मास’चा अगाध महिमा

0
13
  • रमेश सावईकर

आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून संबोधला जातो. हे चार महिने देवभक्ती, धार्मिक विधी, अनुष्ठाने, व्रतवैकल्यांसाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जातात. भक्तगण भगवान विष्णू, शंकर आणि इतर देवदेवतांची मनोभावे भक्ती करतात आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेतात.

हिंदू पंचांगानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांचा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून संबोधला जातो. आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशाही नागावरती निद्रा घेतात म्हणून ही ‘शयनी एकादशी’ म्हटली जाते. चार महिन्यांची निद्रा घेतल्यानंतर कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू निद्रेतून जागे होऊन पुनश्च विश्वाचे रक्षण करणे आणि कारभार चालविण्याची सूत्रे आपल्या हाती घेतात. भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात म्हणून कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी म्हणतात. अर्धा आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन व अर्धा कार्तिक हे चातुर्मासाचे चार महिने देवभक्ती, धार्मिक विधी, अनुष्ठाने, व्रतवैकल्ये करण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानले जातात. भगवान विष्णू या चार महिन्यांकरिता विश्वाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी भगवान शंकर यांच्यावर सोपवितात, म्हणून चातुर्मासात भगवान शंकराची भक्ती करण्यास अधिक महत्त्व दिले गेले आहे.
संन्याशी चातुर्मास व्रत आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेपासून सुरू करतात. आपले गुरू आद्य शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन व पादुकांची पाद्यपूजा पौर्णिमेला करतात नि चातुर्मास व्रतासाठी आश्रमात वास्तव्य करून राहतात. या कालावधीत व्रताचरण, लोकांना मार्गदर्शन करण्याकरिता आशीर्वचन देतात. भारतीय संस्कृती नि सनातन धर्माचा प्रसार करणे हा त्यामागचा हेतू असतो. चातुर्मासात गोपद्म व्रत, चातुर्मास व्रत, अशून्य शयन व्रत भक्तमंडळी करतात. ही व्रते भगवान विष्णूचा कृपाशीर्वाद लाभावा म्हणून केली जातात. गोपद्म व्रत करणारे भक्त गाईच्या 33 पावलांची रांगोळी रेखाटून त्यांची पूजा करतात व दिवसभर उपवास करतात. हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे असे शास्त्रात सांगितले आहे.

चातुर्मास व्रत करणाऱ्यांनी तुळस व पिंपळाची पूजा करावी, दीपदान करावे आणि दिवसातून एकच वेळ भोजन करावे. गुरुपौर्णिमा ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत हे व्रत आचरणात आणावे. स्वामीजी, मठाधीश चातुर्मासाचे व्रत करतात.
‘भविष्य पुराणा’नुसार ‘अशून्य शयनी’ व्रताचा महिमा विशेष आहे. भगवान विष्णूची षोड्शोपचार पूजा करावी, दिवसभर कडक उपवास करावा, अर्घ्यदान करावे आणि रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडावा. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला मार्गशीर्ष महिन्यापर्यंत करावे, असे ‘भविष्य पुराणा’त सांगितले आहे. जे भक्त या व्रताचे आचरण करतील त्यांना कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांचे जीवन सुखी-समृद्धी-आनंदाने भरून जाईल अशी भाविकांची श्रद्धा आहे.

चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशीला होतो. या दिवशी पंढरपूरला श्रीविठोबाच्या भक्तांची चंद्रभागेतटीच्या वाळवंटी भव्य तीर्थयात्रा भरते. लाखो वारकरी भक्तगण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, उत्तर भारतातील राज्यांच्या विविध ठिकाणांहून पायी चालत दिंड्या घेऊन येतात. त्यांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, नामदेव, एकनाथ, तुकाराम, मुक्ताबाई यांच्या पालख्या दिंडीसह विठुरायाच्या दर्शनासाठी त्यांच्या जन्मगावातून येऊन दाखल होतात. त्यामुळे चंद्रभागेला भक्तीचा महापूर येतो. पंढरपूरनगरी विठोबाच्या नामगजराने दुमदुमून जाते. भक्त चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करून, नंतर विठोबाचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात.
आषाढ महिना सुरू झाला की वारकऱ्यांना कधी एकदा पंढरपुरी जाऊन विठोबाचे दर्शन घेतो, अशी आस लागून राहते. आषाढ महिना म्हटला की धो-धो पाऊस कोसळणार! शरीरासंगे मनाला ओलेचिंब भिजवणार! त्याची अनेक रूपं… कधी तो रुसून बसल्यासारखा येतच नाही, तर कधी खट्याळ, लहरी बनून धरणीमातेला अभ्यंगस्नान घालून पसार होतो. धुंवाधार कोसळतो तेव्हा नकोसा वाटणारा आणि विश्रांती घेत अधून-मधून पडतो त्यावेळी हवाहवासा वाटणारा हा पाऊस! त्याच्यामुळे तर धरणी ग्रीष्माच्या तप्तांतून सुखावते. शेतकरी बियाण्यांची पेरणी करतो. बिजांकूर आल्याने वनस्पती, झाडे वाढतील, फुले-फळे देतील ही स्वप्नं शेतकरीच नव्हे तर इतर लोकही मनात बाळगून असतात. चातुर्मासातील आषाढ महिन्याचे हे एक आकर्षक रूप पाहून कोणाला भुरळ पडणार नाही?
त्यानंतर येणारा श्रावण हा तर अत्यंत पवित्र असा महिना. धार्मिक विधी, व्रत-वैकल्ये, उपवास, देवभक्तीत मन गुंतविणारा, आनंददायक, आल्हादक, सुखावह असा हा महिना!

सगळीकडे निसर्गाची कृपा होऊन ‘आनंदी आनंद गडे, इकडे-तिकडे चोहीकडे’ असे म्हणत आनंदाला उधाण आणणारा! श्रावण म्हटला की सर्वप्रथम ओठांवर येते ती शाळेत असताना शिकलेली बालकवींची कविता.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।
आणखी कितीतरी मराठी-हिंदी गीतांतून श्रावणाचे केलेले वर्णन पावसाची सर अवनीवरती कोसळताच मनात रुंजी घालते. आकाशात पांढऱ्या-काळ्या ढगांची अभ्रे दाटीवाटीने पुढे सरकतात. काळ्या ढगांतून सूर्य अलगद हळूच डोकावून धरणीमातेला पाहतो. ऊन-पावसाचा लपंडाव चालूच असतो. पावसाच्या बिंदूंवर सांजवेळी सूर्याचे सोनेरी किरण पडले की आकाशात ‘इंद्रधनुष्य’ (सप्तरंगी) उमटते. हे सारे दृश्य नजरेत सामावून घेतले की सृष्टीची किमया किती अवर्णनीय आहे यावर आपला विश्वास बसतो. पर्णहीन झाडांना पालवी फुटते. हिरवीगार शेतं डोळेभरून पाहिल्यावर मन तृप्त होते. धरणीमातेने हिरवा शालू नेसून, नटून-थटून ती राधा बनून श्याम मुरारीच्या भेटीसाठी अधीर झालेली पाहिली की आकाश नि धरणीमातेच्या नात्याचे पाश किती घट्ट आहेत याची जाणीव होते. कवी पाडगावकर याचे वर्णन करताना म्हणतात-
श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा…
श्रावणात पाऊस हा फक्त बाहेरून येत नसतो, तर तो मनाच्या आतून येत असतो. एका कवीने वर्णन केले आहे-
पाऊस आला याद घेऊन
ओलाचिंब साद देऊन
बाहेर जरी ढगांतून पाऊस आला,
खरं म्हणजे पाऊस आतून आतून आला…
याशिवाय ‘सावन आया, बादल आये…’ व अन्य कितीतरी मराठी-हिंदी गीतांमधून श्रावण महिन्याचे महत्त्व गायिले गेले आहे. श्रावण महिना म्हणजे सृष्टीने माणसाला दिलेले सर्वात मोठे सौंदर्यदान! धरणीमातेचे स्नान झाल्यावर सोन्याचा प्रकाश पडेल अशी खात्री देताना कवी बा. भ. बोरकर म्हणतात-
स्नान झाले धरणीचे
आता पडेल सोन्याचा प्रकाश!
झाडांच्या हिरव्या पात्यांतून उद्याच्या भविष्यकाळाचे बीजारोपण झालेले असते. त्या सर्व निसर्गकिमयांची श्रावण मास साक्ष देऊन जातो.
श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना. आठवड्याच्या सोमवारला विशेष महत्त्व. म्हणून भक्तगण ‘श्रावणी सोमवार’ उपवास व्रत पाळतात. शिवलिंगाभिषेक, पूजा, पाठ, प्रार्थना नि त्याचा कृपाशीर्वाद घेतात. शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात.
मंगळवारी महिला ‘मंगळा गौरी’ (पार्वतीदेवी) उपवासव्रत, पूजा, आरती, हळदीकुंकू समारंभाचे आयोजन श्रद्धेने करतात. गौरीसाठी विविध फुलझाडांची पत्री गोळा करण्यासाठी हातात परडी घेऊन प्रसन्न मुद्रेने वावरणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह नि उमेद पाहिली की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ‘वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत’ असे बालकवी म्हणतात.

गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी श्रीमहालक्ष्मी व्रत व पूजन, शनिवारी हनुमान पूजन आणि रविवारी आदित्य (सूर्य) पूजन (गोव्यात ‘श्रावणी आयतार’ संबोधतात) हे दिवस साजरे केले जातात. याशिवाय श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पिठोरी अमावास्या आदी महत्त्वाचे सण हिंदुधर्मीय लोक भक्ती, आनंद व उत्साहात साजरे करतात. या एकूण पार्श्वभूमीवर चातुर्मासातील श्रावण महिन्याचे महत्त्व सर्वात अधिक असल्याचे मानले जाते.
श्रावणानंतर येणारा भाद्रपद महिना म्हणजे विशेष भक्तीचा, उमेदीचा नि उत्साहाचा! कारण ‘गणेश चतुर्थी’ हा उत्सव दीड, पाच, सात, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवस आपल्या सोयी-सवडी, आर्थिक ऐपतीनुसार साजरा करतात. सारे वातावरण मोरयाच्या आरती, अभंग-भजनाच्या स्वरनिनादाने दुमदुमुन जाते. गणेशाची विधिवत पूजा, गणपती अथर्वशीर्ष, गणयाग, गणहोम आदी अनुष्ठाने करतात. बुद्धिदाता, संकट किंवा विघ्नहर्ता नि सुखकर्ता गणरायाची आपणावर कृपा व्हावी म्हणून मोठ्या भक्तिभावे त्याची आराधना केली जाते. याशिवाय गौरीपूजन, सीतला गौरीपूजन, अनंत चतुर्दशी (अनंतव्रत) हे सणही भाद्रपद महिन्यात साजरे केले जातात. भाद्रपद कृष्ण पक्ष हा ‘महालय’ महिना म्हणून गणला गेला आहे. आपले पूर्वज, पितर, स्वर्गवासी नातेवाईक (जवळचे) यांची स्मृती म्हणून पिंडदान करतात. अमावास्येला सर्व पितरांची आठवण केली जाते.
आश्विन महिन्यात नवरात्री, सरस्वती, महालक्ष्मी पूजन, दसरा, कोजागरी पौर्णिमा, दीपावली (दिवाळी), लक्ष्मीपूजन हे सण साजरे केले जातात.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून ‘नवरात्री’ उत्सवाची सुरुवात होते. दुर्गामातेने वेगवेगळे अवतार घेऊन चांड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर आदी दैत्यांशी नऊ दिवस युद्ध करून त्यांना ठार मारले. हे देवीचे नऊ अवतार म्हणजे नवरात्री आणि विजयाचा दुसरा दिवस विजयादशमी किंवा ‘दसरा’ या नावाने देशभर साजरा केला जातो.

आश्विन वद्य चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिवासातील 14 हजार महिलांची सुटका केली, तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा ‘दिवाळी’चा सण. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन करतात.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा म्हणून साजरी केली जाते. भगवान विष्णूने वामनावतार धारण करून बळीराजाला पाताळात लोटले आणि त्याला वर्षातून एकदाच किंवा एका दिवसाकरिताच तुला पृथ्वीवर येता येईल असा उःशाप दिला. तो दिवस म्हणूनच ‘बलिप्रतिपदा’ म्हणून साजरा केला जातो. द्वितीया ही यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरी करतात.
कार्तिक शुद्ध एकादशीला भगवान विष्णू आपल्या निद्रेतून जागे होतात नि पुनश्च विश्वाचा कारभार नि रक्षण करण्याची जबाबदारी भगवान शंकराकडून आपल्याकडे घेतात. म्हणून या एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी म्हटले जाते. द्वादशीला ‘भगवान एकादशी’ म्हणून वैष्णव लोक साजरी करतात. या दिवसापासून तुलसी विवाहास प्रारंभ होऊन पौर्णिमेला सांगता होते. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा संबोधले जाते. कारण त्याच दिवशी त्रिपुरासुराचा वध करून त्याने निर्माण केलेल्या तिन्ही नगरी देव उद्ध्वस्त करतात.
कार्तिक एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. या दिवशी ‘चातुर्मास’ व्रताची संन्यासी, स्वामी, संतमंडळी सांगता करतात. भक्तगण भगवान विष्णू, शंकर आणि इतर देवदेवतांची अनासक्त, निरपेक्ष, भावपूर्ण, मनोभावे भक्ती-आराधना करतात आणि या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांची कृपा प्राप्त करून घेतात.