चला सुजाण नागरिक बनूया

0
190

    – पौर्णिमा केरकर

समजून-उमजून शिस्तीने मार्ग क्रमायचा… पैसा-प्रतिष्ठा नाही तर माणूस महत्त्वाचा आहे. माणसांनाच जगविण्यासाठी धडपडणारे डॉक्टर, पोलीस, नर्स व इतर अनेकजण यांच्याप्रती कृतज्ञ होत संघटित लढा देऊन या महामारीचा निकराने सामना करूया! चला, विचारी, सुजाण नागरिक बनूया!

 

 

दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे

आवरावे आपणच आपल्याला कठीण होत आहे

खरंच खूप कठीण होत आहे अलीकडे एकेक दिवस पुढे ढकलणे. जग असे एकाएकी ’पॉज’ घेणार याचा पुसटही विचार स्वप्नातसुद्धा कधी आणला नव्हता. पण हेच आज वास्तवात अनुभवताना मनात असंख्य विचारांनी गर्दी केली आहे. ‘वेळ नाही, वेळच नाही’ हे वाक्य तर घरी बसून तासन्तास गप्पा झोडणारे, दूरदर्शनवर वेळ घालवणारे आणि त्याहीपेक्षा आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेल्या प्रत्येकाच्याच ओठी रुळलेले होते. ते इतके सवयीचे झालेले होते की कोणाला जर विचारले की तुम्हाला वेळ नाही तर मग तुम्ही दिवसभर करता तरी काय? यावेळी उत्तर देताना होणारी गडबड, काय बोलायचे हेच मुळात सुचत नसे. यावरून लक्षात यायचे. आज जग थांबलेय, देश थांबला आहे. या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजविलेला आहे. पौराणिक कालखंडातील कथांतून महाकाय राक्षसी प्रवृत्तीची वर्णने केलेली आढळतात. या भूतलावर जशी सत्प्रवृत्ती देव बनून अवतरली, तशीच एक दुष्ट प्रवृत्ती आसुरी शक्ती राक्षस बनून थैमान घालीत असलेली वर्णनेही या कथांतून जाणवली. सुष्ट-दुष्टांचा झगडा, त्यात सुष्टांचा होणारा विजय, म्हणजेच चांगुलपणाने वाईट, अपप्रवृत्तीवर मिळविलेला विजय होता. आमची पिढी हे ऐकत-वाचत त्यावर अढळ विश्वास ठेवीत वाढत गेली. देवाला झाडापेडात अनुभवले. सामूहिक एकोप्याने प्रश्न सोडविले, सुख-दुःखात सहभागी होत, एकमेकांना आधारभूत होत राहिली. सण- उत्सवांत, दुखल्या-खुपल्यात सहकार्य देताना नाती वृद्धिंगत होत राहिली. कष्ट, घरगुती कामात व्यस्त राहूनही ’वेळच नाही’ ही सबब सर्रास ऐकू येत नसे. पैसा जास्त नव्हता, पण हृदयात जागा होती. प्रत्येकाच्या मालकीचा जमिनीचा तुकडा होताच. ज्यांच्याकडे नव्हता त्यांना कसून खाण्यासाठी म्हणून थोडी जागा देण्याचे धैर्य आणि मनाचा मोठेपणा

दाखविणारी माणसे घराघरांतून भेटायची. ’एकमेकां साह्य करू’ या युक्तीने शेतीभाताची, घर शाकारणीची, पोरसू लावण्याची, सुख-दुःखाची सारीच कामे व्हायची. खूप सुंदर, शांत, संयत जीवन होते. जास्त धावाधाव नाही की वेगाची स्पर्धा नाही. नात्यांना ओलावा होता. जगण्याला शिस्त होती. मुबलक पैसा नव्हता, पण माणुसकीची गाठोडी प्रत्येक घरी सांभाळून ठेवलेली होती. घराला शिस्त, नियम, अटी होत्या. काही आदर्श होते. चुकल्यामाकल्यांना धाक दाखविणारी जुनी जाणती जशी होती, तशीच त्यांच्या चुकांवर बोट ठेवून मार्ग दाखविणारी, समजून घेऊन सरळ करणारी मोठ्या मनाची मोठी माणसे हे घराघराचे वैभव होते. आजूबाजूला सगळेच शांत. शांत असतानाच आता हे सारे आठवते आहे. अगदी अलीकडचीच घटना, ‘कोरोना’चा संसर्ग मुलांना होऊ नये, लहान मुले आणि जाणती माणसे हीच जास्त लवकर संसर्गात येतात म्हणून शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये बंद करण्याचा, परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय बर्‍याच जणांना खटकला. मुलांना सुट्टी हरकत नाही; पण शिक्षकांना सुट्टी मिळता कामा नये म्हणूनही काहीजण जिवाच्या आकांताने बोलत होते. ही गोष्ट सहज म्हणून जरी तिच्याकडे दुर्लक्ष केले तरीही बरेच पालक मुलांना दिलेल्या सुट्टीचे गांभीर्य लक्षात न घेताच चिडचिड व्यक्त करताना जेव्हा ऐकू येऊ लागले तेव्हा मात्र मानवी जगण्याचे प्रयोजन तरी कोणते? माणसाला हवे तरी काय? तो अजूनही स्वतःला ओळखू शकत नाही? जग बंद, देश बंद, जे कधीच झाले नाही ते अघटित आता घडतेय. मजा-मनोरंजन म्हणून हे चाललेले नाही हे कोणाच्याच लक्षात येत नाही का? ते जर कळले असते तर अजूनही सावध होण्याची वेळ गेलेली नाही.

एक माता बाजारात खरेदी करताना आपल्या मैत्रिणीशी संवाद साधीत होती. विषय अर्थातच मुलांच्या परीक्षा पुढे ढकलल्या, त्यांना आता सुट्टी म्हणजे मग मुले घरीच राहणार… मुले घरी म्हणजे एक कटकट होऊन राहिली. अर्धा दिवस शाळेत, तर अर्धा दिवस ट्युशनसाठी तेव्हा बरे होते. निदान दिवसभर तरी कोणतीच त्यांची कटकट नसायची. मुलांकडे बघण्याची पालकांची अशी मानसिकता असेल तर मग त्यांच्याशी संवाद तरी कसा साधला जाईल. एक भयानक संकट आज संपूर्ण जगावर हुकूमत गाजवीत आहे. या संकटातून सुटकेसाठी धनदौलत, प्रतिष्ठा, श्रीमंती, मोठा बंगला, पॉश गाड्या, उंची वस्त्रे इ.ची कसलीच गरज नाही. गरज आहे ती फक्त या आणीबाणीच्या प्रसंगी समजून उमजून जगण्याची! स्वयंशिस्त लावून घेण्याची.

‘बंद’च्या कालावधीत सुट्टी आहे म्हणून मुले मैदानावर खेळायला जातात, गाड्या घेऊन फिरतात, आता मनोरंजन, पब, पार्ट्या, फास्ट फूड, स्ट्रीट फूड, मॉल, हॉटेल्स हे तर बंदच आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याच्या वाटेवर आहे. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा या प्रार्थनेच्या जागा ओस पडल्या. यातून बोध घ्यायचा की आपलीच दादागिरी चालू ठेवायची? किती म्हणून धावणार आपण? कोणाशी स्पर्धा चाललेली आहे. अजूनही स्वतः शिक्षक असलेले पालक म्हणतात की बारावीचे राहिलेले दोन पेपर घेतले असते तर काय बिघडले असते? म्हणजे एकूणच सुजाण नागरिकांना अजूनही या मानवनिर्मित महामारीचे संकट कळलेच नाही असेच म्हणावे लागेल.

खूप धावलो आपण आता थोडे थांबूया. सक्तीची का असेना ही सुट्टी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी घेऊन आलेली आहे, अशा दृष्टीने विचार करूया. आज माणूस पिंजर्‍यात, तर जनावरे जंगलात मुक्त श्वास घेत असतील. कधी नव्हे तो पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळची जाग येते आहे, माकडांचा उच्छाद थंडावला आहे. ध्वनी, कचरा प्रदूषण नियंत्रणात आलेले आहे. आपल्या माणसांसाठी निवांत वेळ मिळाला आहे. जे आहे त्याचा वापर करता यावा. तडजोड काय असते? कमीत कमी गरजा ठेवून जीवन कसे आनंदी करता येईल याचाही विचार यानिमित्ताने करता येईल. पैशामागे धावताना खर्‍या श्रीमंतीचा, जीवनाच्या सौंदर्याचा विचार करणेच आपण सोडून दिलेले आहे. माणूस आणि निसर्ग यांचे एक अतूट नाते परंपरेने चालत आलेले. त्यालाही आपण भ्रष्ट करून टाकले. वारेमाप जंगलतोड, प्राणी-पक्ष्यांची स्वार्थासाठी छळवणूक, त्यांना बेघर करणे, त्यांची शिकार, जाळणे, सिमेंट-काँक्रीटची जंगले उभी करणे, झाडे कापून मंदिरांची उभारणी, कच्चे मांस खाण्याची विकृती, कचरा, प्लास्टिकचा वारेमाप वापर, अस्वच्छता, बेशिस्त वागणूक, आरोग्य, संस्कार, शिस्त… एकूणच आलेली बेताल, अहंकारी वृत्ती. कोणता देव आता आपल्याला वाचवेल? निसर्गावर मात करून नाही आम्ही पुढे जाऊ शकत, हेच शिकायला हवे. कोरोनाने भल्याभल्यांना जमीन दाखविली. त्यातून आम्ही धडा घ्यायलाच हवा!

आरोग्यम् धनसंपदा ही आमच्या संस्कृतीची शिकवण. शरीर-मनाची, घरादाराची स्वच्छता जशी महत्त्वाची मानली गेली होती, तशीच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही अधोरेखित केले होते. आज वसुंधरा मोकळा श्वास घेत असेल. म्हणत असेल, या माझ्या भूमिपुत्रांना जगणं सुंदर, शांत, संयत करण्याची शक्ती दे! करू दे त्यांना आत्मपरीक्षण, समजू दे स्वच्छतेचे महत्त्व. नुसतेच धावायचे नाही तर आहार, आरोग्य, संस्कार यांच्याकडे लक्ष देत जीवनाला आकार द्यायचा. करू दे त्यांना मोकळा संवाद कुटुंबातील सदस्यांशी.

धकाधकीत राहून गेलेले छंद असतील, काही कामे असतील अपुरी ती पूर्णत्वास आणण्याची बुद्धी दे. शांत राहून सभोवताल न्याहाळू दे त्यांना… आपण फक्त या विशाल जगाचा एक नाममात्र बिंदू आहोत. आपण असो-नसो हे जग पुढे पुढे जाणारच… माणसे आणि निसर्ग सोबतीनेच वाढले. माणूस लोभी बनला, तो ओरबाडत राहिला. निसर्गाने आपला धर्म सोडला नाही म्हणून तो आज हसतोय. माणूस मात्र रडतोय. जागे व्हायचे आपल्याला या आणीबाणीच्या प्रसंगी. विचारपूर्वक वाटचाल करायचीय. समजून-उमजून शिस्तीने मार्ग क्रमायचा… पैसा-प्रतिष्ठा नाही तर माणूस महत्त्वाचा आहे. माणसांनाच जगविण्यासाठी धडपडणारे डॉक्टर, पोलीस, नर्स व इतर अनेकजण यांच्याप्रती कृतज्ञ होत संघटित लढा देऊन या महामारीचा निकराने सामना करूया! चला, विचारी, सुजाण नागरिक बनूया!