चला उन्हाळी पर्यटनाला…

0
162

– सौ. सुमेधा कामत-देसाई

वसंत ऋतूचं आगमन झालं आणि हवेतला उबदारपणा हळूहळू वाढायला लागलाय. उन्हाच्या वाढत्या झळा शरीराला जाणवू लागल्या नि मनदेखील त्या कासाविशीने बेचैन होऊन उठले. अशावेळी काम करणेदेखील अनुत्साहाचे होऊन बसते. यावेळी मन आणि शरीर म्हणते, ‘मुझे चेंज चाहिए!’ आजच्या धकाधकीच्या, घाईगडबडीच्या, गोंधळाच्या वातावरणात हा ‘चेंज’च तुमचा कायाकल्प करून टाकतो. पुन्हा नव्याने कामाला जुंपताना हुरूप येतो.

शाळा-कॉलेजांला लवकरच सुट्या लागणार आहेत. उन्हाळा अधिकच रौद्र रूप धारण करणार आहे. यावेळी चार विसाव्याचे, विरंगुळ्याचे क्षण मिळण्यासाठी घराबाहेर- गावाबाहेर पडणे जरूरीचे आहे. चार-आठ-पंधरा दिवस- जमेल तसे बाहेरगावी घालवून परत येणे सोयीस्कर पडेल. आमचे गोवेकर पूर्वज दुसर्‍या एखाद्या ठिकाणी हवापालटासाठी जायचे. गोव्यात त्यासाठी एक विशिष्ट शब्द आहे आणि तो म्हणजे- मुदास. चेंज, बदल, हवापालट असा त्याचा अर्थ घेता येतो. जुन्या काळात लोक समुद्रकाठी चारआठ दिवस राहत. दिवसाला तीन ‘नहाणं’ करत. वेगळे जीवन, वेगळे वातावरण, वेगळी माणसे. गरीब लोक समुद्राच्या काठावर असलेल्या गरीब लोकांच्या मातीच्या भिंतींच्या घरांच्या मागे असलेल्या ‘मांगरा’त राहत. सोबत आणलेला शिधा शिजवून खात. गरीब-श्रीमंत दोन्ही गट मुदासाची मजा लुटत. ही कल्पना पाश्‍चात्त्य संकल्पनेतून गोव्यात आली असावी.
आमचे पूर्वज म्हणत, पंधरा दिवस (रात्री) नव्या गावातल्या नव्या वातावरणात घालवले तर आयुरारोग्य प्राप्त होते. आधुनिक शास्त्रातील पेशीबदल आणि त्यामुळे प्राप्त होणारे नवसंजीवन या सिद्धांताकडे याची सांगड घालता येते.
गोव्यातील अनेक श्रीमंत कुटुंबे पाचगणीसारख्या ठिकाणी हवापालटासाठी जात. त्या काळात पाचगणीला बंगल्यासाठी तीन महिन्यांचे भाडे आगाऊ भरावे लागत असे. मग तुम्ही तेथे किमान कितीही दिवस वास्तव्य करा, पण भाडे मात्र तीन महिन्यांचेच भरा! आजकाल गाडी घेऊन पाचगणी- महाबळेश्‍वरला सहजपणे जाता येते.
आता तुम्हाला विमानाचे तिकीट स्वस्त दरात उपलब्ध व्हायचे नाही. ट्रेनचेदेखील तिकीट मिळायचे नाही. तेव्हा तुमच्यासाठी अन्य काय पर्याय असू शकतील? गाडी-बसने प्रवास करणे हा एक मार्ग झाला. फार पैसे खर्च करायचे नसतील, पुष्कळ दिवस रजा टाकायची नसेल तर येथून थेट उडुपीला चला. तेथून शृंगेरी-तुंगभद्रा नदीच्या काठावर हा मठ वसेलला आहे. नदीच्या काठावर फार मोठा विस्तीर्ण पायर्‍यांचा घाट बांधलेला आहे. तेथे मोठमोठे मासे जलविहार करताना दृष्टीस पडतात. घाटाच्या पायर्‍यांवरून त्यांना दाणे-कुरमुरे टाकायचा आनंद तुम्हाला लुटता येईल. नदीवरच्या इटुकल्या पुलाच्या मध्यभागी उभं राहून खालून भणाणणार्‍या वार्‍याच्या झुळकांचा सुखद गारवा अनुभवता येईल. उडुपी ते शृंगेरी हा घाटाघाटांतून, वळणावळणाने जाणारा रस्ता आहे. घनगर्द जंगलाने व्यापलेला हा अप्रतिम सुंदर व नयनरम्य प्रदेश आहे. शृंगेरी हा प्राचीन कुळागरांनी बनलेला थंड, शांत गाव. येथे तुम्हाला गुरुमाऊलीच्या दर्शनाच्या आध्यात्मिक अनुभवाबरोबरच निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद अनुभवता येईल. येथल्या बाजारपेठांतून तुम्हाला वेलची, चहापूड, पोहे, फणस पापड वगैरे गोष्टी उपलब्ध होतील. येताना उडुपीचे कृष्णंदिर, रात्रीची पालखी व हत्तीबाईंची मिरवणूक पाहायला विसरू नका. उडुपीला जेवण सर्व्ह करण्यासाठीची लाकूड कोलन केलेली लाकडी भांडी मिळतात. सोलकढी ठेवण्याचे आजीचे कोळमूळही येथे दिसेल. २०१२ त या कोळमुळाचा दर होता अडीच हजार रुपये (पाचसहा जणांसाठीची कडी मावू शकेल एवढेच कोळमूळ). थोडी वाट वाकडी करून केरळीयन लोकांचे शक्ती/शक्तिस्थान असलेले कौलूर मुकांबिकेचे देऊळ पाहायला विसरू नका. देवीचे दर्शन घ्यायला पूर्वपुण्याई लागते असे भक्त सांगतात. तेथे देवीचा प्रसाद म्हणून ‘कषाय’ मिळतो. या देवस्थानातील हत्तीला माझा ‘हॅलो’ जरूर सांगा.
गोव्यातून तसे फार लांब नसलेले आणखी एक ठिकाण आहे ते म्हणजे मडिकेरी (कूर्ग). येथून थेट मेंगलोरला चला. मडगावहून एक ट्रेनदेखील सुटते. हा प्रवास जास्त आरामदायक आहे. वाटेत भटकळला गरम गरम बटाटेवडे घ्या आणि तेदेखील एन्जॉय करा. मेंगलोरला एक रात्र मुक्काम करा. समुद्रकिनारा, बंदर, विश्‍व कोकणी केंद्र वगैरे बघा.
पावसाळा जवळ आलाय. मेंगलोरला छत्र्यांची खूप दुकाने आहेत. रास्त दरात, चांगल्या प्रतीच्या छत्र्या इथे मिळतात. कूर्गमधल्या कॉफीमळ्यांचे मालकदेखील मोठमोठ्या छत्र्या येथूनच खरेदी करतात. पण या छत्र्या परतीच्या प्रवासात विकत घ्या.
मेंगलोर हा समुद्राची सोबत घेऊन जगणारा गाव. येथून बस/गाडी घेऊन कूर्गच्या दिशेने चढाई करा. हा प्रवास स्वप्नवत आहे. मेंगलोर मागे पडते. समुद्रलाटांची सोबत तुटते आणि पहाडी प्रदेश सुरू होतो. उंच उंच चढ. वळणे आणि वळणे. डोंगररांगांतल्या सपाट प्रदेशात पानांचे झेंडे फडकावणारी केळीची बने. हादेखील नारळी-पोफळींनी भरलेला गार गार प्रदेश. सुंदर प्रदेश. सकाळी बाहेर पडलात तर दुपारपर्यंत कूर्ग मुक्कामी पोचाल. येथे हॉटेल्स/पेईंगगेस्ट स्कीम (विथ नाश्ता) सोय आहे. येथे हिलस्टेशनवर असते तसे टिपिकल वातावरण आहे. घाईगडबड-गोंधळ नाही. सगळा आरामच आराम. येथे मसाल्याच्या विविध पदार्थांची दुकाने आहेत. पूर्ण दुकानच मसाल्याने भरलेले. या दुकानांतून आपला वर्षभराचा स्टॉक करून घ्या.
कूर्गहून भल्या पहाटे उठून तळकावेरीच्या शोधार्थ जायचे. येथून कावेरी नदीचा उगम होतो. तुम्ही दहा वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या पायथ्याशी पोचता. तेथे खाली आलेला कावेरी नदीचा प्रवाह दिसतो. तेथे लोक पवित्र स्नान उरकताना दिसतात.
येथून महाप्रचंड चढ चढायचा आहे. घाबरू नका. चढ तुम्ही चढणार नाही. तुम्ही ठरवलेली स्पेशल टॅक्सी तुम्हाला पोटात भरून घेऊन तो चढ चढणार आहे. वाटेत अनादी अनंत काळापासून असलेले अस्पर्श, धनगर्द सदाहरित अरण्य लागेल. सगळे शांत शांत… आलबेल…. पण येथे थोडे सावध असणे आवश्यक!
आपण तळकावेरीच्या प्रदेशात पोचतो. तेथे पोचल्यावर भीती संपते. कुंडातल्या जलाने प्रक्षालन करून तुम्ही पापमुक्त होता. येथून दुरवरचा पहाडी प्रदेश, सदाहरित अरण्ये दिसतात. तिरुपतीच्या डोंगरावरूनही असाच दूरवरचा प्रदेश न्याहाळता येतो.
त्यादिवशी परत खाली उतरा. कूर्गला मुक्काम करा नि दुसर्‍या दिवशी नागरहोले अभयारण्य पाहायला चला. येथे कावेरीच्या प्रवाहात छोटी छोटी बेटे आहेत. एका छोट्याशा होडक्यात बसून तुम्ही नागरहोळेच्या जंगलात प्रवेश करता. तेथे शासनाने शे-शंभर हत्ती पाळलेले आहेत. हे हत्ती दिवसभर अरण्यात मनसोक्त संचार करतात नि संध्याकाळी सरकारच्या जावयासारखे सरकारी इतमामात पाहुणचार घ्यायला परत येतात. एक मोठे बंदिस्त आवार आहे. उंच उंच दगडी भिंती. आत बडा खाना बनवला जातो तो हत्ती स्पेशल. नाचणीचे पीठ उकडून त्यात गूळ, कांदे घालून ही स्पेशल डीश बनवली जाते. ओट्यावर पीठ मळून त्याचे नारळाएवढे गोळे बनवले जातात. बाहेर दरवाजावर महाकाय हत्ती धडका देत असतात. ‘मला दे, मला दे, मला सगळ्यात आधी’ म्हणून हाहाकार करत राहतात. माहुत छोट्या काठ्या घेऊन या हत्तीसैन्याला काबूत आणण्याचा प्रयत्न करतात. हे हत्ती म्हणे म्हैसूरच्या दसरोत्सवात एटेंडन्स लावतात.
गाडी घेऊन जात असाल तर बेंगलोर, म्हैसूर, उटीला जाता येते. उटी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण. कितीही पाहिले तरी मनाचे समाधान होत नाही. येथून कोडाईलादेखील जाता येते. द. भारत हा मंदिरांचा, पहाडांचा नि सदाहरित अरण्यांचा प्रदेश. मोठी शहरे वगळून छोट्या छोट्या गावांतून प्रवास केला तर उष्णतेचा त्रास जाणवत नाही. प्रत्येक ऋतूलादेखील स्वतःची एक स्वतंत्र सौंदर्यकळा असते. ते लोभस सौंदर्य प्रत्येकाने अनुभवलेच पाहिजे. बेंगलोर-म्हैसूर ट्रेनमधून जरूर सफर करा. कन्नड कादंबरीकारांची खूपशी पात्रे त्यात भेटतील. कादंबर्‍यांत वर्णिलेला परिसर दिसेल आणि तो तुम्हाला कादंबरी वाचनाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद प्राप्त करून देईल. केरळमधल्या मुन्नार गावाला भेट देता येईल. कोचीला गेला तर कालडी नदीचा अतिविशाल प्रवाह आणि शंकराचार्यांच्या मठाच्या उदात्त वातावरणाचा अनुभव घेता येईल.
मनाली ही पर्वतीय राणी मानली जाते. मनालीत पाहण्याजोगे खूप काही आहे. युवाशक्ती पुणे नि अभियान ट्रेव्हल्स अहमदाबाद या दोन संस्थांतले मी येथे एकूण तीन ट्रेकिंग प्रोग्राम केले. चौथ्यांदा गंमत म्हणून नसतीच परत एकदा यथेच्छ भटकंती करून आले. तेथल्या नग्गर गावाचे समाजजीवन पाहायला मला खूप आवडते. मनाली मला खूप खूप आवडते. तेथे मला अगदी घरच्यासारखे वाटते. आपल्या अटलबिहारी वाजपेयींचे उन्हाळी घर मनालीच्या परिसरात आहे.
सोलंगनाला बेस कॅम्पवर बियास नदी अगदी जवळून वाहते. तेथून पाताळसूच्या हाय ऍल्टि. ट्रेकिंग कॅम्पला जाता येते. मनालीला नेहरू माऊंटेनियरिंग इन्स्टि. आहे. तेथे उन्हाळी सुट्‌ट्यांत वेगवेगळे कॅम्पस नि साहस मोहिमा आखण्यात येतात. येथे तज्ज्ञ स्त्रियाही प्रशिक्षण देण्यास उपलब्ध असतात. मणिकरण येथे आशिया खंडातील सर्वात उकळत्या पाण्याचे फवारे पाहायला मिळतात.
नट्टापट्टा करून, उंची कपडे घालून, उंच टाचांचे बूट घालून, एसी गाड्यांत बसून नि आरामदायक, आलिशान हॉटेलात वास्तव्य करून केलेला प्रवास हा खरा प्रवास नव्हे. ट्रेकिंगच्या निमित्ताने माणसांना आपल्या सर्व प्रकारच्या क्षमता अजमावून पाहता येतात. खूपशी मनःशांतीदेखील मिळते. एखाद दुसरा ट्रेक पूर्ण करता आला नाही तर त्याचे फारसे मनाला लावून घेऊही नये. मनाली, द्वारका, महाबळेश्‍वर, कन्याकुमारी, नैनिताल, लोणावळा असे ट्रेकिंग प्रोग्राम मला पार पाडायला मिळाले हे मी माझ्या आयुष्यातले भाग्ययोग समजते.
शक्य झाले तर उन्हाळ्यातले काश्मिर बघा. खरे म्हणजे काश्मिर वेगवेगळ्या ऋतूंत पाहिले पाहिजे. आता वसंत ऋतूंत असंख्य फुले मस्तकावर माळून काश्मिरची राणी तुमची वाट पाहात बसलेली असेल. शिकार्‍यातला जलविहार, चिनार-चिनाबचे साहचर्य तुमची काश्मिरची सफर रंगतदायी बनवून टाकेल.
नैनितालदर्शन हा असाच एक नितांतरमणीय अनुभव आहे. विवेकानंद केंद्राच्या योगशिबिराच्या निमित्ताने मला तेथे पंधरा दिवस राहता आले. तेथील जनजीवन, निसर्गसौंदर्य, वनसृष्टी, पक्षिजीवन यांचे जवळून दर्शन घेता आले. दुपारी दोन वाजल्यानंतर पहाडात तुमचे काही खरे नसते. वादळ, वारा यांचेच साम्राज्य. अलमोडा, कौसानी, जिम कार्बेट नॅशनल पार्क ही येथील प्रेक्षणीय स्थळे.
दिल्लीहून पुढे गेलात तर कालकाला चला. तेथे सिमल्याला जाणारी टॉय ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रवास खूप मनोरंजक आहे. ही ट्रेन सबंध दिवस प्रवास करते नि हिमालयाच्या विविध रूपांचा साक्षात्कार घडवते. सिमल्याहून नंतर मनालीलाही जाता येते.
चंदिगडमार्गे खाफीयार, डलहौसी या हिमालयातल्या अन्य काही ठिकाणांना भेटी देता येतात. पठाणकोटहून धरमशाला या बौद्ध भिक्षूंच्या फार मोठ्या गावाला भेट देता येईल. इकडे बौद्धविहार/मठ आहेत.
दिल्लीहून हरिद्वारला जाता येते. येथे गंगेची आरती, दीपदान वगैरे करून ऋषिकेशला जाता येते. ऋषिकेशला डॉ. कलामांना स्वामी शिवानंद भेटले होते. त्यांनी त्यांना येथे प्रेरणा दिली होती. येथून डेहराडूनला जायचे. डून हे मोठे खोरे आहे. येथे ब्रिटिश काळात नावारूपाला आलेल्या मोठ्या शिक्षणसंस्था आहेत.
मी मसुरीत पायाचे तुकडे पडेपर्यंत चालले. मसुरी, सिमला ही प्रवासी आणि दुकाने यांनी किड्यांनी बुजबुजलेली ठिकाणे असल्यासारखी वाटतात. शिलॉंग हे एक प्रेक्षणीय स्थळ. उंच उंच पहाडांतून जाणारा रस्ता. रवींद्रनाथ टागोरांना शिलॉंग खूप आवडायचे. तेथे ते महिनोगणती मुक्काम करायचे. बंगल्यात राहायचे. लेखन करायचे. शिलॉंगच्या निसर्गसौंदर्याची अनुभूती त्यांच्या लेखनातून वारंवार जाणवते. शिलॉंगहून पन्नास-साठ किलोमीटरवर चेरीपुंजी आहे. जुन्या काळात तेथे सर्वात जास्त पाऊस पडायचा. शेवटच्या टोकावर काळे कातळ नि वाळलेल्या पिवळ्याधमक गवताचा गलिचा दिसेल. येथे पाऊस सहस्रधारांनी कोसळत असेल तेव्हा आसमंत कसा दिसत असेल याची उन्हाळ्यात कल्पना करवणार नाही. चेरीपुंजीला ठिकठिकाणी धबधबे आहेत. ते दुरूनच पहा.
या उन्हाळ्यात आसामला गेलात तर काझिरंगा अभयारण्याला भेट देता येणार नाही. कारण उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने ब्रह्मपुत्र नदीला पूर येतो नि अभयारण्यात पाणी साचते.
गोव्याहून मुंबईला जायचे. तेथे पहिले विमान पहाटे सहा वाजता पकडायचे. कलकत्त्याचा स्टॉप धरून तीन तासात गोहाटीला पोचाल. कलकत्ता ते गोहाटी या विमानप्रवासात बर्फाच्छादित डोंगररांगा दिसतात. त्या पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. तुम्हाला या उन्हाळ्यात विमानाचे तिकीट उपलब्ध होत असेल तर शिलॉंगसाठी जरूर फ्लाय करा.
तुम्हाला जर भारताच्या पूर्वेला असलेल्या सिलीगुडीला जाता आले तर असंख्य ठिकाणांना भेटी देता येतील. सिलीगुडीहून तुम्ही भूतानला जाऊ शकता. जयनगर हा भारताचा बॉर्डरवरील गाव आहे. पोटो, थिम्पू ही ठिकाणे दोनतीन दिवसांत पाहून होतात. पण भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी फोटो आयडेंटीटी लागते. नेपाळला जाण्यासाठीदेखील फोटो आयडेंटीटी लागते. पण तेथे भारतीय चलनातल्या हजार-पाचशेच्या नोटा स्वतःजवळ बाळगता येत नाहीत. त्यासाठी तुरुंगवासाची सजा आहे. सिलिगुडीहून सिक्कीमला जाता येते. येथे चायना बॉर्डरवरच्या छांगू लेकचे दर्शन घेता येते. येथून दार्जिलिंगला जाता येते. येथील नदीत चाललेले धोकादायक राफ्टिंग पाहता येते. 
आपण समशितोष्ण कटिबंधात राहतो. उन्हाळा जवळ आला की मन आणि शरीर गारव्यासाठी आसुसते. म्हणून सगळ्यांना हिलस्टेशन्सचे वेध लागतात. यातले काहीही न जमल्यास एखाद्या खेड्यातल्या घरात चला. शांत वातावरण अनुभवा. प्रदूषणमुक्त वातावरणात काही दिवस घालवा. ताजा स्वयंपाक करून जेवा नि नव्या उमेदीने कामाला जुंपून घेण्यासाठी हजर व्हा. प्रवासाला निघणार्‍या सर्व लोकांना ‘शुभास्ते पंथानः’ म्हणते.