साखळीत 8.12 इंच पावसाची नोंद; अनेक भागांत पूरस्थिती; आज यलो अलर्ट जारी
राज्यात मागील चोवीस तासांत मान्सून हंगामातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक 6.38 इंच अशा पावसाची नोंद झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या पावसाने राज्यभर जोरदार हजेरी लावली. साखळी येथे सर्वाधिक 8.12 इंच पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे राज्यातील दुधसागर, वाळवंटी, म्हादई व इतर नद्यांतील पाण्याची पातळी वाढल्याने साखळी, फोंडा आदी भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यापूर्वी 2 जुलै 2025 रोजी सर्वाधिक 6.33 इंच पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणाखाली आली. येथील हवामान विभागाने शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात आत्तापर्यंत एकूण 109.22 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होते. बंगालच्या उपसागरातील ओरिसा किनारी भागातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंगळवारपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या, नाले यांच्यातील पाण्याची पातळीत वाढ होऊन अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. राज्याच्या काही भागांतील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. जोरदार पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक भागात झाडांची पडझड झाली.
गत चोवीस तासांत म्हापसा येथे 6.77 इंच, पणजी येथे 5.75 इंच, जुने गोवे येथे 6.39 इंच, साखळी येथे 8.12 इंच, फोंडा येथे 7.31 इंच, धारबांदोडा येथे 6,94 इंच, काणकोण येथे 6.09 इंच, दाबोळी येथे 3.65 इंच, मुरगाव येथे 3.75 इंच, केपे येथे 7.08 इंच, सांगे येथे 7.48 इंच पावसाची नोंद झाली. वाळपई, पेडणे, मडगाव येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.
8 विभागांत पावसाचे इंचांचे शतक
राज्यात आत्तापर्यंत धारबांदोडा विभाग पावसाच्या नोंदणीमध्ये आघाडीवर होता; मात्र आता सांगे विभाग पावसाच्या नोंदणीमध्ये आघाडीवर आला आहे. सांगे येथे आतापर्यंत 143.62 इंच पावसाची नोंद झाली आहे, तर धारबांदोडा येथे 143.53 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 14 विभागांपैकी 8 विभागांनी पावसाचे इंचाचे शतक ओलांडले आहे. त्यात सांगे, धारबांदोडा यांच्याबरोबरच केपे (134.14 इंच), वाळपई (131.46 इंच), फोंडा (116.48 इंच), साखळी (113.10 इंच), काणकोण (105.50 इंच) आणि जुने गोवे (103.51 इंच) या ठिकाणी 100 इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

