चंपत राय, अनिल मिश्रांचा राजीनामा मंजूर

0
2

राम मंदिर दान चोरी प्रकरण; कृष्ण मोहन यांची प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्ती; दानातील सगळ्या वस्तू पूर्णपणे सुरक्षित

अयोध्येतील श्री राम मंदिरातील दान आणि दान केलेल्या वस्तूंची चोरी झाल्याचे आरोप होत असताना राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची काल महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. चंपत राय यांच्या जागी निवृत्त आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच ट्रस्टची बैठक राम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली होती. ट्रस्टची बैठक दुपारी तीन वाजता रामजन्मभूमी संकुलातील विश्रामगृहात सुरू झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्यासह नऊ स्थायी सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित होते.

ही बैठक 11 जुलै रोजी होणार होती. मात्र, सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच 6 जुलै रोजी घेण्यात आली.
या बैठकीत कृष्ण मोहन यांच्याकडे राम मंदिर ट्रस्टचे प्रभारी सरचिटणीस म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी ट्रस्टची 22 जून रोजी पुन्हा बैठक होईल.
बैठकीनंतर ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी संपूर्ण वादावर आपली भूमिका मांडली. मंदिरात दान करण्यात आलेल्या सगळ्या वस्तू पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचे सामान गायब झालेले नाही. याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असे गोविंद देव गिरी म्हणाले. पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्यांनी सगळ्या वस्तू दाखवल्या. ज्या ज्या वस्तू गायब झाल्याचे, चोरीला गेल्याचे आरोप झाले, त्या त्या वस्तू जाहीरपणे दाखवण्यात आल्या. सोन्याचे रामचरितमानस, प्रभू रामाचे चरण चिन्ह, हार आणि काकभुशुंडी पत्रकार परिषदेत दाखवण्यात आल्या.

माजी आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायण यांनी मंदिर ट्रस्टवर जाहीरपणे गंभीर आरोप केला होता. एप्रिल 2024 मध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टला दिलेला आणि सोन्याचा मुलामा असलेला रामचरितमानस ग्रंथ गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांवर गोविंद देव गिरी यांनी मंदिर प्रशासनाची बाजू मांडली. दान केलेल्या सगळ्या वस्तू ट्रस्टकडे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

सीईओ निवडीसाठी समिती स्थापन
कालच्या बैठकीत ट्रस्टसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निवडण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत आणि अणुशास्त्रज्ञ जनरल सुरेश हावडे यांचा समावेश आहे. ही समिती आता सीईओची निवड करणार आहे.

अंतिम एसआयटी अहवालानंतर 22 जुलैला पुढील बैठक
राम मंदिर ट्रस्टची पुढील बैठक 22 जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अंतिम आणि सविस्तर अहवाल येण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत त्या अहवालावर चर्चा करण्यात येणार असून, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, नवीन विश्वस्तांची निवड तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.