घरे, मंदिर परिसरात खनिज उत्खननास परवानगी नाहीच

0
9

>> खाण व्यावसायिकांकडून प्रतिज्ञापत्र घेणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातील खाणपट्टे लिलावात विकत घेतलेल्या कंपन्यांना धार्मिक स्थळे आणि निवासी घरांच्या परिसरात खनिज उत्खनन करण्यास मान्यता दिली जाणार नाही. डिचोली तालुक्यातील शिरगाव, मुळगाव परिसरातील खाणपट्ट्यांतील मंदिरे, घरांचे सर्वधन केले जाणार आहे. खाण व्यावसायिकांकडून मंदिरे, घरांच्या संवर्धनाबाबत प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यातील खाण व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे खाण व्यवसाय पुन्हा सुरू झाला पाहिजे. पर्यावरण जपून खाण व्यवसाय सुरू केला जाणार आहे. डिचोली तालुक्यातील खाणपट्ट्ट्यांतील मंदिरे, घरांचे संरक्षण केले जाणार आहे. खाणपट्ट्यांतील घरे, मंदिरांबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. डिचोली तालुक्यात वेदांता या एका कंपनीला खाण सुरू करण्यासाठी पर्यावरण दाखला मिळालेला आहे. खाण व्यावसायिकांकडून खाणपट्ट्यांतील घरे, मंदिरांच्या संवर्धनाबाबत प्रतिज्ञापत्र घेऊन ते न्यायालयात सादर केले जाणार आहे. खाणपट्ट्यातील घरे, धार्मिक स्थळांबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. निवासी घरे, मंदिरे वगळून इतर भागात खोदकाम करण्यास मान्यता दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य सरकारने नव्याने लिलाव केलेल्या खाणपट्ट्यांत निवासी घरे, मंदिरे, शिक्षण संस्था, व्यावसायिक आस्थापनांचा समावेश असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. आपला खाण व्यवसायाला विरोध नाही; मात्र त्या भागात कित्येक वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे, मंदिरे वाचविण्याची गरज आहे, असे आमदार डॉ. शेट्ये यांनी लक्षवेधी सूचनेवर बोलताना सांगितले.