थिवीतील घटना; संशयित युवकाला अटक
थिवी-बार्देश येथील एका व्यक्तीच्या घरातून तब्बल 1 कोटी 85 लाख रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी फिर्यादीच्या नातीच्या मित्रानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कबीर प्रधान (रा. बागा-बाळंगुट) या पूर्व भारतातील युवकाला अटक केली आहे.
ही घटना सोमवारी उघडकीस आली. घरातील पावणे दोन कोटी रुपयांची रक्कम गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. संशयित कबीर प्रधान हा फिर्यादीच्या नातीसोबत अधूनमधून त्यांच्या घरी येत असल्यामुळे त्याला घरातील मोठ्या रकमेची माहिती होती. त्यामुळे त्यानेच आपल्या एका मित्राच्या मदतीने ही चोरी आखली होती, असे पोलीस तपासात समोर आले.
फिर्यादी कुटुंबीय घराबाहेर असताना संशयिताने संधी साधून आत प्रवेश केला आणि घरातील सर्व रोख रक्कम पळविली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख रुपये जप्त केले असून, उर्वरित चोरीची रक्कम त्याने विविध ठिकाणी गुंतविल्याचे समोर आले आहे. ती रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संशयिताच्या अन्य साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू असून, पुढील तपास पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, उपअधीक्षक व्हिल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर करत आहेत.

