घरपोच आरोग्यसेवेसाठी लवकरच ‘स्टेट केअर’ उपक्रम : आरोग्यमंत्री

0
11

आरोग्य खाते लवकरच ‘स्टेट केअर’ उपक्रम सुरू करणार असून, त्याद्वारे काही आरोग्य सेवा घरपोच मिळणार आहेत. परिणामी राज्यातील आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल केले. काल बांबोळी येथे गोमेकॉत एनटीपीसीच्या उद्योजकांची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) या योजनेखालील निधीतून मिळालेल्या 19 नव्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.

राज्यातील रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा मिळावी हे उद्दिष्ट ठेवून येत्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी 100 रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल करून घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वजीत राणे यांनी दिली. रुग्णवाहिकांची संख्या वाढल्यानंतर जलदगतीने रुग्णांपर्यंत पोचण्यास मदत होणार असून, पर्यायाने रुग्णांना विनाविलंब उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेला बळकटी देऊन त्यात सुसूत्रता आणण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारच्या ‘स्टोमी सेवा’, ‘स्टेट केअर’ यासारख्या सेवांमुळे राज्यातील आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळणार असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी लोकार्पण करण्यात आलेल्या वाहनांच्या ताफ्यात सहा नव्या बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, आठ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, हृदयविकाराच्या रुग्णांसाठीच्या दोन रुग्णवाहिका व औषध वाहतुकीसाठीची तीन वाहने यांचा समावेश आहे, असेही राणे यांनी नमूद केले.

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी 100 रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून, त्यापैकी 40 निश्चित झाल्या आहेत, अशी माहिती राणे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला एनटीपीसीच्या पश्चिम विभागाच्या प्रादेशिक मानव संसाधन प्रमुख वंदना चतुर्वेदी यांच्यासह आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.