दिल्लीतील दहशतवादी स्फोटाचे धागेदोरे राष्ट्रीय तपास संस्थेच्या आतापर्यंतच्या तपासात थेट तुर्कियेपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ह्या स्फोटाशी संबंधित डॉक्टर तुर्कियेला जाऊन आला होता आणि तेथेच कदाचित त्याची ह्या कटकारस्थानाच्या मुख्य पाठीराख्यांशी भेट झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे. एका आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा हा भाग आहे असे त्यामुळे अधोरेखित होते आहे. वरवर पाहता काश्मिरी डॉक्टरांचा हा ‘व्हाईट कॉलर दहशतवाद’ असल्याचे जरी दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते केवळ हस्तक असावेत. खरे सूत्रधार देशापलीकडेच बसले आहेत. पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ने जरब बसवल्यामुळे ह्यावेळी तुर्किये आणि कतारमधून ह्या कटाची सूत्रे हलली असावीत असा संशय आहे. खरे तर हा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे. पुढील तपासात अडथळे येऊ नयेत म्हणून अनेक गोष्टी तपासयंत्रणेने उघड केलेल्या नाहीत आणि ही गुप्तता आवश्यकही आहे. परंतु जी काही माहिती आतापर्यंत बाहेर आली आहे ती पाहिली, तर दिल्ली शेजारच्या फरिदाबादेत स्फोटकांचा प्रचंड साठा तपास यंत्रणेला सापडताच, आता आपलेही बिंग फुटेल ह्या भीतीनेच दिल्लीमधील स्फोट घाईघाईने घडविण्यात आला असावा असा तर्क मांडता येतो. मात्र, ह्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. स्फोट झाला त्या दिवशीचा संशयिताचा संपूर्ण दिवसाचा वावर जर पाहिला तर सकाळी दिल्लीत प्रवेशल्यानंतर तो दिल्लीच्या विविध भागांतून दिवसभर फिरत होता. दिल्लीच्या सहा विभागांतील बारा ठिकाणी तो जाऊन आला. शेवटी जामा मशिदीजवळ तीन तास थांबला. तीन तास त्याने तेथे वाहनातच बसून राहण्याचे कारण काय हा कळीचा मुद्दा आहे. कोणी त्याच्या मदतीला येणार होते का, जे न आल्याने त्याची वाट बघत तो थांबला होता? की त्याला दिलेले काम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संध्याकाळची गर्दी होण्याची वाट बघत तो बसला होता? की त्याचा स्फोट घडवावा की नाही ह्याबाबत निर्णय होत नव्हता? तपासयंत्रणेपुढे असे अनेक प्रश्न आहेत. मुळात हा स्फोट जेथे घडवला गेला तो सिग्नल हेच त्याचे लक्ष्य होते की दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हा स्फोट तो घडवणार होता हेही कळायला मार्ग नाही. स्फोट झालेले वाहन चालवणाऱ्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आल्याने निदान काही धागेदोरे तरी तपासयंत्रणेच्या हाती लागू शकले. अन्यथा जेवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या स्फोटकांचा स्फोट झाला तो पाहाता मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे हल्लेखोर कोण आणि बळी कोण हे सांगणे अवघड व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली असती. फरिदाबादेत पकडला गेलेला जवळजवळ तीन हजार लिटर ज्वलनशील पदार्थाचा साठा जर खरोखरच दिल्लीत त्यांना पेरता आला असता तर दिल्ली बेचिराख झाली असती. सुदैवाने वेळीच ह्या टोळीचा छडा लागला आणि एक मोठे कटकारस्थान उजेडात आले. अर्थात, अजूनही ते संपूर्णतः उजेडात आले आहे असे म्हणणे धाडसाचे ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल भूतानमधून परतताच थेट इस्पितळात जाऊन स्फोटातील जखमींची विचारपूस केली. ह्या कटाच्या सूत्रधारांना मोकळे सोडले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे आणि काल मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठकही पार पडली. खरोखरच दहशतवादाकडे सरकार अतिशय गांभीर्याने पाहत आहे हे आता दिसले पाहिजे. जे जे धागेदोरे गवसतील त्यांच्या मुळाशी जाऊन ह्या कटकारस्थानाची पाळेमुळे खणून काढली जाणे जरूरी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे जरब बसलेला पाकिस्तान आता देशांतर्गत हस्तकांच्या मदतीने भारतात घातपात घडविण्यास उतावीळ आहे. भारतीय हवाई दलाने थेट सीमा पार करून मुख्यालयांवर धडक देताच हादरलेल्या दहशतवादी संघटना सगळा धीर गोळा करून पुन्हा जमवाजमवीस लागल्या आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेवरून हालचाली करीत आहेत. जैश ए महंमदने महिलांचे सैन्य प्रशिक्षित करायला सुरूवात केली आहे. गझवा ए हिंदच्या नावाने भारताला जिहादची रणभूमी बनविण्याचे स्वप्न काही पाहात आहेत. काश्मिरींचे स्वातंत्र्ययुद्ध असल्याचे चित्र जगापुढे निर्माण करण्यासाठी व्यावसायिक चेहऱ्यांच्या पडद्याआडून पाकिस्तानने हे डावपेच लढवले आहेत ह्यात शंकाच नाही. फक्त ह्यासंदर्भातील पुरावे हवे आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही ह्याची जाणीव पुन्हा एकदा सीमेपलीकडच्या सूत्रधारांना करून देण्याची वेळ आली आहे. भारतात राहून, भारताचे अन्न खाऊन देशद्रोही कृत्ये करणाऱ्यांना काहीही दयामाया दाखवली जाऊ नये. शेवटी, बाहेरचा काय, आतला काय, शत्रू तो शत्रूच! ह्या घरभेद्यांचे चेहरे उघडे पाडण्यासाठी आता देशातील प्रत्येक नागरिकाने जागे राहणे नितांत गरजेचे असेल.

