– शशांक मो. गुळगुळे
बँक ग्राहकांना वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मिळत असलेली बँकिंग सेवा व सध्या मिळत असलेली बँकिंग सेवा यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. हा फरक पडण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकांचे झालेले संपूर्ण संगणकीकरण! पूर्वीच्या बँकिंग व्यवसायाच्या व्याख्येनुसार बँकांनी जनतेकडून ठेवी स्वरूपात पैसे घेणे, ते पैसे गरजवंतांना कर्ज स्वरूपात देणे, पैशांची गुंतवणूक करून बँकेचे उत्पन्न वाढविणे, त्या उत्पन्नातून ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर व्याज देणे व त्यांच्या ठेवी मागणीप्रमाणे परत करणे, एवढेच बँकिंग व्यवहाराचे स्वरूप होते.
लोकांचा बँक व्यवस्थापनावर जेवढा विश्वास अधिक, त्याप्रमाणात बँकेच्या ठेवीत वाढ होते. वाढीव ठेवीमुळे बँकेचा कर्जव्यवहार व गुंतवणुकीचे प्रमाण वाढू शकते. वाढीव व्यवसायामुळे बँकेच्या उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे एकंदरीत बँकेचा पाया अधिक मजबूत होतो. बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक व्याजदरांच्या ठेवी योजना सादर करीत असतात. बँका सामान्यपणे चालू खाते, ठेव खाते, आवर्ती खाते व मुदत ठेव खाते या प्रकाराने ठेवी गोळा करीत असतात.
चालू खाते सामान्यपणे व्यापारी, व्यावसायिक व कॉर्पोरेट्स यांच्यासाठी असते. चालू खात्यावर व्याज दिले जात नाही. काही बँका ०.५० टक्के दराने व्याज देतात. या खात्यावर व्याज दिले जात नसल्यामुळे बँका नफ्यात वाढ व्हावी म्हणून या प्रकारची खाती मोठ्या प्रमाणावर उघडण्यासाठी प्रयत्नशील असतात. आवर्ती खात्यात दरमहा ठरावीक रकमेचा हप्ता ठरवीक मर्यादेकरिता गोळा केला जातो. छोट्या गुंतवणूकदारांसाठी आवर्ती खाते योजना अतिशय उत्तम आहे. मुदत ठेव खात्यासाठी एकरकमी ठेव ठरावीक मर्यादेसाठी गोळा केली जाते व त्यावर दरमहा, तिमाही, सहामाही किंवा मुदतपूर्वीनंतर व्याज दिले जाते.
बचत ठेव खाते सर्वसामान्य व्यक्ती बँकेत उघडतात. आता हे खाते ऑनलाईनही उघडता येण्याची सुविधा बर्याच बँकांनी दिली आहे. यामुळे ग्राहकाला पूर्वीसारखे शाखेत जाऊन खाते उघडण्याची गरज नाही. नोकरदार, पगारदार व्यक्ती, रोजंदारी करणार्या व्यक्तींसाठी बचत ठेव खाते सोयीचे पडते. बचत खातेदार आपल्या सोयीनुसार आपल्या खात्यात रोख किंवा धनादेशाद्वारे पैसे जमा करू शकतो, गरजेनुसार पैसे काढू शकतो. बचत खात्यात ज्यांच्याकडे चेकबुक नाही अशांसाठी ५०० रुपये व जे चेकबुक वापरतात अशांसाठी किमान १ हजार रुपये खात्यात ठेवणे गरजेचे होते व या रकमेपेक्षा खात्यातील शिल्लक रक्कम कमी झाल्यास बँक खातेदाराला दर तीन महिन्यांनी दंड आकारीत असे.
रिझर्व्ह बँकेने नुकताच एक ग्राहककेंद्रित निर्णय देऊन, यापुढे किमान शिल्लक नसेल तर ग्राहकांना दंड लावू नये असा फतवा काढून दिलासा दिला आहे. आर्थिक समावेशनासाठी अधिकाधिक लोकांना बँकिंग व्यवसायाचा लाभ व्हावा म्हणून रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकांना ‘नो फ्रिल अकाऊंट’ही उघडावे लागतात. ही खाती शून्य रकमेनेही उघडता येतात. आता बहुतेक कॉर्पोरेट्स, कंपन्या व आस्थापने आपल्या कर्मचार्याला रोख रकमेत पगार देण्याऐवजी कर्मचार्यांच्या बचत खात्यांत पगार जमा करणे अधिक पसंत करतात. कर्मचारी या सुविधेचा फायदा घेऊन, आपल्या सोयीच्या ठिकाणी आपला पगार खात्यावर जमा करू शकतात. यामुळे कर्मचारी आपल्या सोयीनुसार व आपल्याला हवी तेवढीच रक्कम केव्हाही काढू शकतात व खात्यात जी शिल्लक रक्कम राहते त्यावर व्याजही मिळते.
रिझर्व्ह बँकेच्या आणखीन एका ग्राहककेंद्रित धोरणानुसार, आता दैनंदिन शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते. बचत खात्यावरील व्याजदरात आता रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नाही, पण किमान दरसाल दरशेकडा ४ टक्के दराने व्याज द्यावेच लागते. रिझर्व्ह बँकेने नियंत्रण काढल्यानंतर सार्वजनिक उद्योगातील बँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली नाही, पण खाजगी क्षेत्रातील काही बँका मात्र ६ टक्के ते ७ टक्के दराने व्याज देत आहेत. काही बँकांत मुदतठेव खात्याशी संलग्न बचत खाते उघडण्याची सोय आहे. यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी किमान दहा हजार रुपयांवर बचत खात्याच्या व्याजदराने व्याज मिळते व प्रत्येक दिवसाच्या अखेरीस दहा हजार रुपयांहून जितकी जास्त रक्कम खात्यात असेल त्या रकमेवर मुदत ठेव योजनेच्या दराने व्याज मिळते. ज्यांच्या खात्यात नेहमी अधिक रक्कम शिल्लक असते अशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
सध्या ग्राहकाला घरासाठी म्हणा किंवा गाडीसाठी म्हणा किंवा अन्य काही कारणासाठी म्हणा- कर्ज घ्यावे लागते. या कर्जाचा हप्ता नियमितपणे भरावा लागतो. जर कर्ज घेतलेल्या बँकेतच बचत खाते असेल तर बँकेला दर महिन्याला अमुक रकमेचा कर्जाचा हप्ता बचत खात्यातून वसूल करा अशा ‘स्टॅण्डिंग इन्स्ट्रक्शन्स’ देता येतात.
बँकेतील ठेवींशिवाय शेअर, डिबेंचर किंवा कंपनी ठेवी या योजनांमध्येही गुंतवणूक केली जाते. अशा गुंतवणूकदाराने आपल्या बँकेचा तपशील जर इतरत्र गुंतवणूक केलेल्यांना दिला तर गुंतवणुकीवरील व्याज, लाभांश वगैरे बँकेच्या बचत खात्यात थेट जमा होऊ शकतात व जमा झालेल्या तारखेपासून या रकमेवर बँकेकडून व्याजही मिळते. कोणत्याही बँकेतील एकूण ठेव रक्कम व्याजासहित फक्त एक लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच ‘डिपॉझिट इन्शूरन्स क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन’च्या ठेव विमा योजनेअंतर्गत सुरक्षित आहेत. त्यामुळे सार्वजनिक उद्योगातील बँकांशिवाय इतर बँकांत जास्त रक्कम ठेवणे अडचणीचे ठरू शकते. वेगवेगळ्या बँकांत जर ठेवी ठेवलेल्या असतील तर प्रत्येक बँकेत बचत खाते उघडणे गरजेचे नाही. आपले जेथे खाते आहे तेथे ठेव असलेली बँक व्याजाची किंवा मूळ रक्कम आरटीजीएम किंवा एनईएफटी प्रणालीद्वारे मूळ बचत खात्यात ट्रान्स्फर करू शकते. रिझर्व्ह बँकेने मार्च २०१४ पासून प्रत्येक बँकेस एसबीएस प्रणाली अनिवार्य केली आहे. ‘एटीएम कार्ड’ हे डेबिट कार्ड आहे. हे वापरून वर्षाच्या ३६५ दिवसांत कोणत्याही आपल्या खात्यातून पैसे काढता येतात. हे कार्ड वापरून खरेदीही करता येते. काही सेवा उपभोगता येतात. पण यासाठी खात्यात तेवढी रक्कम असणे आवश्यक आहे. एटीएम कार्ड आपल्या बँकेच्या एटीएमशिवाय अन्य बँकांच्या एटीएमवर पण वापरता येते. एटीएम कार्डाच्या साहाय्याने आपल्या खात्यात पैसे जमा करणे, पैसे काढणे, खात्याचा उतारा मिळविणे (शेवटच्या ५ ऐन्ट्रींचा), खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, धनादेश पुस्तिका मागविणे, धनादेश खात्यात जमा करणे, युटिलिट बिलांचे पैसे भरणे इत्यादी सेवा मिळविता येतात. मोबाईल बँकिंग ही सेवा वापरून मोबाईलवरून बँकिंग सेवांचा फायदा घेता येऊ शकतो. इंटरनेट बँकिंग असल्यास तुमच्या खात्याचे पूर्ण ‘लेजर’च तुमच्या पुढ्यात तुम्ही उघडू शकता. तसेच याद्वारेही बँकिंग सेवांचा लाभ संगणकाच्या पुढ्यात बसून घेऊ शकता.
क्रेडिट कार्ड मात्र डेबिटकार्डसारखे सर्रास देण्यात येत नाही. कारण क्रेडिटकार्ड देताना बंकांना जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणार्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच क्रेडिट कार्ड दिले जाते.
अनेक बँका डिमॅट अकाऊंट सुविधाही पुरवितात. त्यामुळे खातेदारांना आपले शेअर गुंतवणुकीचे व्यवहार बँकांमार्फत तसेच बँकांच्या मार्गदर्शनाखाली करणे सोयीचे झाले आहे. खातेदारांस हवे असलेल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करणे, विक्री करणे आता सहज शक्य झाले आहे. हे डिमॅट अकाऊंट खातेदाराच्या बचत खात्याशी जोडलेले असतात. खातेदाराचे शेअर्स विकल्यावर खातेदाराच्या खात्यात पैसे जमा करणे, शेअर खरेदी केल्यावर खात्यातून पैसे काढणे त्यामुळे शक्य होते. खातेदाराला यासाठी सेवाशुल्क आकाराले जाते. पण बँकेच्या तज्ज्ञांचा सल्ला व अनुभवाचा फायदाही गुंतवणूकदारास मिळतो. त्याशिवाय पारंपरिक बँकिंगखेरीज, आपले उत्पन्न वाढावे म्हणून बँका आपल्या ग्राहकांना जीवन विमा तसेच सर्वसाधारण विमा योजनांच्या पॉलिसीही विकतात. तसेच म्युच्युअल फंडांच्या योजनाही विकतात. बँकेत कोणताही व्यवहार खातेदाराने केल्यास त्याचा तपशील तात्काळ खातेदारास ‘एसएमएस’ने कळविला जातो. तसेच बँकांना ग्राहकांना काही माहिती द्यायची असल्यास तीही तात्काळ एसएमएसने कळविली जाते. अशी दिवसेंदिवस बँकिंग सेवा ग्राहककेंद्रित होत चालली आहे.

