भारत सरकारच्या टपाल विभागाकडून नियमांत दुरुस्ती
भारत सरकारच्या टपाल विभागाने गोव्यात ग्रामीण डाकसेवक भरतीच्या नियमामध्ये दुरुस्ती केली आहे. ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी दहावीपर्यंत कोकणी किंवा मराठी भाषेचे शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र असतील. तथापि, कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य केले आहे. ज्या अर्जदाराने दहावीपर्यंत केवळ मराठी भाषेचे शिक्षण घेतले आहे, त्याला गोवा कोकणी अकादमी किंवा राज्य सरकारने अधिकृत नियुक्त केलेल्या संस्थेकडून कोकणी भाषेचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, असे दुरुस्ती नियमामध्ये म्हटले आहे.
टपाल खात्याचे संचालक रवि पाहवा यांनी या दुरुस्तीबाबतची एक कार्यालयीन सूचना 7 ऑक्टोबर रोजी जारी केली आहे. गोवा विभागाचे टपाल अधीक्षक रमेश पाटील यांनी आदेशाची प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काल सादर केली.
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोवा टपाल विभागातील ग्रामीण डाकसेवक भरतीचा मुद्दा उपस्थित करून या पदासाठी कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टपाल खात्याच्या गोवा विभागात ग्रामीण डाकसेवक पदासाठी कोकणी अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्वागत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टपाल खात्याच्या सुधारित नियमांचे स्वागत केले आहे. गोवा टपाल विभागात ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी स्थानिक भाषा म्हणून कोकणी आणि मराठीला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. ज्याने कोकणी भाषेचे शिक्षण घेतले नाही. त्याला तत्सम संस्थेकडून कोकणी भाषेचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या महत्त्वाच्या सुधारणेमुळे गोव्यातील स्थानिकांना भरतीमध्ये प्राधान्य मिळेल. राज्यात टपाल सेवेचे वितरण अधिक मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

