गोव्यातील महामार्गांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करून त्यांच्या उभारणीचा सर्व खर्च उचलण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन ही मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला गोव्याला मिळालेली भेट म्हणावी लागेल. नितीन गडकरी यांनी केंद्रातील पुनर्रचित रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर जी तीन कामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली आहेत, त्यामध्ये देशभरातील महामार्गांचे जाळे बळकट करणे हे एक होते. देशातील जवळजवळ १८९ महामार्ग प्रकल्पांची सुमारे एक लाख ऐंशी हजार कोटींची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत, त्यांना चालना देण्याचा मनोदय नितीन गडकरींनी मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ ची गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण वाताहत झालेली आहे. उत्तर कोकणात या महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत, त्यामुळे आजकाल मुंबई – गोवा बसगाड्याही या जुन्या मार्गाने येण्याऐवजी सातारा – कोल्हापूरमार्गे गोव्यात येत असतात. या जुन्या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून आणि कोकणच्या किनारपट्टीच्या विकासासाठी सागरी महामार्गाचा प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वी मांडला गेला होता. मात्र, हा सागरी महामार्ग काही भागांचा अपवाद वगळता अद्याप कागदावरच तयार झालेला आहे. पर्यावरणवाद्यांनी अडथळे आणल्याने आणि भूसंपादनाच्या प्रश्नांमुळे कोकणातील अनेक खाड्यांवर पूल उभे राहू शकलेले नाहीत. त्यामुळे हा सागरी महामार्ग एकसंध होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेही महाराष्ट्राचेच असल्याने त्यांनी प्राधान्यक्रमाने महाराष्ट्राच्या रस्त्यांसंबंधीच्या मागण्यांकडे लक्ष पुरवले आणि मुंबई ते सावंतवाडी महामार्गाच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या प्रस्तावास गती मिळाली. कोकणात दरवर्षी प्रचंड पाऊस होत असल्याने डांबरी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडतात. त्यांची डागडुजी केली, तरीही ती प्रचंड वाहतुकीमुळे कुचकामी ठरते. डांबर हे उन्हात तापत असल्याने आकुंचन – प्रसरण तत्त्वामुळे या रस्त्यांची उन्हाळ्यातही वाताहत होत असते. आपल्या देशातील हवामानाच्या विविधतेमुळे सर्वत्र अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे नव्या सरकारने पारंपरिक डांबरी सडकांऐवजी सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांची निर्मिती करण्याचे धोरण आखले आहे. डांबरी रस्त्यापेक्षा अशा सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्याची उभारणी अधिक खर्चिक जरी असली, तरी दीर्घकालीन विचार करता डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंटच्या रस्त्याचा देखभाल खर्च खूपच कमी असतो. त्यामुळे सिमेंट कॉंक्रिट रस्त्यावरील गुंतवणूक जरी दहा – पंधरा टक्क्यांनी अधिक लागत असली, तरी एखाद्या रस्त्याचा वीस वर्षांचा कालावधी गृहित धरला तर शेवटी सिमेंटचा रस्ताच अधिक किफायतशीर पडतो, असे हे एकंदर गणित आहे. शिवाय डांबर हे विदेशातून आयात केले जाते. याउलट रस्त्यांसाठी सिमेंटचा वापर झाल्याने देशातील सिमेंट उद्योगाला मोठी चालना मिळेल. सात मीटर रुंदीच्या व एक किलोमीटर लांबीच्या सिमेंटच्या रस्त्यासाठी एक हजार टन सिमेंट लागते. सरकार या सिमेंट कंपन्यांशी थेट कंत्राट करणार असल्याने सरकारला ते कमी दराने उपलब्ध होऊ शकेल असे गडकरी यांना वाटते. रेल्वे मंत्रालय जसे तेल कंपन्यांकडून थेट डिझेल खरेदी करीत असते, तसाच हा व्यवहार असेल. यातून उभे राहणारे सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते अधिक टिकाऊ असतील आणि कोणत्याही हवामानात खराब होणार नाहीत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गोव्यासारख्या वर्षाला एकशे वीस इंच पाऊस होणार्या राज्यामध्ये सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांची खरोखरच गरज आहे. हे काम खर्चिक जरी असले तरी केंद्र सरकार खर्चाचा वाटा उचलणार असल्याने आणि जागतिक बँक केंद्र सरकारला रस्त्यांसाठी निधी पुरवणार असल्याने गोव्याला ती चिंता करावी लागणार नाही. मात्र, या रस्त्यांच्या अनुषंगाने इतर विकासकामांनाही गती राज्य सरकारलाच द्यावी लागेल. जुवारीवरील पुलासाठी केंद्र सरकार मदत करील अशी आशा गडकरींनी जागवली आहे, पण इतर पुलांचे काम रेटावे लागेल. इतर आनुषंगिक कामांना चालना द्यावी लागेल. रस्ते हे शेवटी कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचे महामार्ग असतात. चांगल्या दळणवळण सुविधा ही मूलभूत बाब आहे आणि तिचा आग्रह धरला गेलाच पाहिजे.

