२०११ च्या जनगणनेनुसार गोव्यात ५ लाख ७६ हजार ५८२ घरांची नोंदणी झालेली असून पैकी १ लाख २५ हजार ५०३ घरे बंद आहेत. त्यामुळे ही घरी स्थलांतरितांची असून ‘सेकंड होम’ म्हणून ठेवण्यात आली असावीत. एकूण २१.८ टक्के घरे बंद असल्याची नोंद वरील अहवालात आहे.
राज्यातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य वर्गातील लोकांना सध्याच्या स्थितीत शहरात किंवा शहरानजीक असलेल्या गावांमध्येही फ्लॅट खरेदी करणे किंवा भूखंड खरेदी करणे अशक्य झाले आहे. अन्य भागातील धनिक गोव्यात ‘होलिडे होम’ या संकल्पनेतून घरे घेवून ठेवण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढले असून भविष्यकाळात मूळ गोमंतकीयांच्या अस्तित्वावरच त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.वेगवेगळ्या भागात पुलांचे बांधकाम झाल्याने ग्रामीण भागातून शहराकडे येऊन स्थायिक होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही म्हणणे आहे. सराकरकडे स्थलांतरितांची पूर्ण आकडेवारी उपलब्ध नाही. त्याचा अभ्यास करण्याची सरकारने तयारी ठेवली आहे. गोव्याला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सादर केलेल्या निवेदनातही वरील परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे.