इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2027 हंगामासाठीचा खेळाडू लिलाव गोव्यात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी बुधवारी याची पुष्टी केली. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी लिलावासाठी 15 आणि 16 डिसेंबर या संभाव्य तारखा सांगितल्या आहेत. अंतिम तारीख लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. हा मिनी लिलाव असल्याने तो एका दिवसाचा असण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांत आयपीएलचे लिलाव दुबई, जेद्दा आणि अबुधाबी येथे झाले होते. त्यामुळे तीन वर्षांनंतर आयपीएलचा लिलाव भारतात परतणार आहे. या लिलावाचे ठिकाण म्हणून गोव्याची निवड झाल्याने राज्याच्या क्रीडा पर्यटनाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी संबंधित उपक्रमांना चालना मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल फ्रँचायझींचे प्रतिनिधी, खेळाडू आणि क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज या निमित्ताने गोव्यात दाखल होतील.

