गोव्यात लोकसभेसाठी विक्रमी ७६.८२ टक्के मतदान

0
72
गोव्याच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान काल झाले असून यापूर्वी १९९८ साली सर्वोच्च ६१ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत कालचे मतदान २१.५ टक्क्यांनी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रांपैकी पाळी – कोठंबीत ९४ टक्के मतदान झाले, तर कुर्टी – फोंडा येथे ९२.१३ टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदानाच्या वेळी आठ ठिकाणी मतदानयंत्रांत बिघाड झाल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.
सांगे येथे दोन, काणकोण येथे दोन, ताळगाव येथे दोन, पर्ये येथे एका यंत्रात बिघाड झाला. ही यंत्रे बदलावी लागली. ताळगावमधील एक व पर्ये येथील एका मतदानयंत्रात संध्याकाळी पाच नंतर बिघाड झाला.
निवडणूक आयोगाने यंदा तरूण मतदारांमध्ये मतदानाविषयी बरीच जागृती केली होती. तिचा फायदा झाला असावा असे मत कालच्या विक्रमी मतदानाविषयी केशव चंद्रा यांनी व्यक्त केले. यंदाच्या निवडणुकीत राज्यात २१६४६ मतदार होते असे ते म्हणाले.
उत्तर गोव्यातील मतदान यंत्रे आता पणजीतील बालभवनमध्ये, तर दक्षिण गोव्यातील मतदान यंत्रे मडगाव येथील कारे महाविद्यालयात ठेवण्यात आली आहेत. दोन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात  आला असून मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. 
उत्तर गोव्यातील बहुतेक मतदान केंद्रांवर काल मतदान सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासांतच वीस ते पंचवीस टक्के इतके उत्साही मतदान झाले होते. नंतर सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी तीस टक्क्यांच्या वर गेली होती, तर दुपारी एकच्या आसपास या टक्केवारीने अर्धशतक पार केले होते. मात्र, यावेळी मतदानाची वेळ व मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याने कोठेही मतदारांचा फारसा खोळंबा झाला नाही. मतदार आरामात येऊन मतदान करून जात असल्याचे दिसत होते. यावेळी निवडणूक आयोगाने छायाचित्र असलेल्या मतदार स्लीप्स वाटल्या होत्या, त्यामुळे ओळखपत्रे वा अन्य पुराव्यांची गरज न भासता मतदारांनी सुलभरीत्या मतदान केले. 
यापूर्वीच्या निवडणुकीत संपूर्ण गोव्यात १२०० मतदान केंद्रे असायची. यावर्षी ती वाढवून १६२४ करण्यात आली होती. त्यामुळे गर्दीत खोळंबा न होता मतदारांना व्यवस्थित मतदान करता आले. मतदानावर अलीकडे निवडणूक आयोगाचे काटेकोर लक्ष असते, त्यामुळे कोठेही मतदारांची ने – आण करण्यासाठी वाहनांचा वापर होताना दिसत नव्हता. 
संध्याकाळी साडे तीन वाजल्यानंतर मतदानासाठी महिलावर्ग बाहेर पडल्याचे दिसून आले. 
सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ होताच साडे नऊ वाजेपर्यंत वीस ते पंचवीस टक्के मतदान बर्‍याच ठिकाणी झाले होते. म्हापशातील काही मतदान केंद्रांवर सकाळी नऊ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले होते. सकाळी १० पर्यंत चोनसई पार्से येथे ३२ टक्के, देऊळवाडा कोरगाव येथे ३२ टक्के, मांद्रे येते अकरा वाजेपर्यंत ३२ टक्के, नादोडा येथे दुपारी १२ वाजेपर्यंत ४९ टक्के, होंडा – सत्तरी येथे दुपारी एक वाजेपर्यंत ५६ टक्के, सा – पेंद्र रायबंदर येथे दुपारी ३.३० पर्यंत सत्तर टक्के मतदान झाले होते.

दक्षिण गोव्यात ७५.४८ टक्के मतदान

दक्षिण गोव्यात काल लोकसभा निवडणुकीत ७५.४८ टक्के मतदान झाले. दहा मतदान केंद्रांतील मतदान यंत्रे बॅटर्‍या कमी दाबाच्या असल्याने बंद पडली. तेथे दुसरी मतदानयंत्रे आणून बसवण्यात आली. सांगे मतदारसंघात ८२.२६, सावर्डे – ८२.२५, शिरोडा – ८०.३३, मडकई – ८१.५८ टक्के मतदान झाले. बाणावलीत सर्वांत कमी म्हणजे ६८.७५ टक्के मतदान झाले. दवर्ली येथील पंचवीस क्रमांकाच्या मतदान केंद्रात निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेले मतदार ओळखपत्र स्वीकारण्यास नकार देऊन मतदान करू दिले गेले नाही. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. सहायक निवडणूक अधिकार्‍यांना त्या केंद्रावर रवाना करण्यात आले. फातोर्डा येथील बांधकाम खात्याच्या केंद्राजवळ तृणमूल कॉंग्रेसच्या पिएदाद नरोन्हा मतदारांना अमूक उमेदवारास मतदान करा असे सांगत असल्याची तक्रार आमदार विजय सरदेसाई यांच्याकडे काहींनी करताच त्यांनी तेथे जाऊन नरोन्हा यांना निवडणूक अधिकार्‍यांकरवी बाहेर पिटाळले. कॉंग्रेस व तृणमूल कॉंग्रेसच्या कित्येक केंद्रांवर कार्यकर्ते नव्हते असे चित्र दिसत होते. वास्को व मडगावात काही मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना परत जावे लागले. नुवे येथे आपले मतदार ओळखपत्र शेजारच्या घरी ठेवल्याबद्दल मतदान केंद्रावरच सरकारी कर्मचार्‍याला फैलावर घेतले. 

काणकोणमध्ये विक्रमी मतदान

दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार निवडीसाठी काणकोणमध्ये काल ७६.९५ टक्के मतदान झाले. एकूण ३२९७६ पैकी २५३७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक ८८ टक्के मतदान खोतीगाव पंचायतीमध्ये झाले. त्या खालोखाल गावडोंगरी – ८५ टक्के, श्रीस्थळ ८१.६ टक्के, नगरपालिका क्षेत्र – ७५.४ टक्के, पैंगीण – ७३.६९, लोलये – ७३ टक्के आणि आगोंद पंचायतीत ७१ टक्के मतदान झाले. पैंगीण पंचायतक्षेत्रातील मार्ली केंद्रावर ९८ टक्के मतदान झाले. महिलावर्गाची संख्याही लक्षणीय होती. काणकोण मतदारसंघात सकाळच्या सत्रातच साठ टक्के मतदान झाले होते. ५२ केंद्रांवर भाजपाचे पोलिंग एजंट होते, मात्र अनेक केंद्रांवर कॉंग्रेसचे पोलिंग एजंटही नसल्याचे दिसून आले.
आगोंद धवळखाजन केंद्रावरील मतदानयंत्रात बिघाड झाल्यावर दुसरे यंत्र मागवण्यात आले. 

मुरगाव तालुक्यात ७४ टक्के मतदान

मुरगाव तालुक्यात काल ७४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान मुरगाव मतदारसंघात (७६.३० टक्के) तर सर्वांत कमी मतदान वास्को मतदारसंघात (७१.३५ टक्के) झाले असे निवडणूक अधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी सांगितले. कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. बाळकृष्ण साळगावकर या अपक्ष उमेदवाराला काहींनी धमक्या दिल्याचा आरोप आहे. यावेळी तेथे तैनात निमलष्करी दलाच्या जवानांनी धमक्या देणार्‍यांना पिटाळून लावले. मुरगावात २०२९२ पैकी १५४६३ मतदारांनी मतदान केले. वास्को मतदारसंघात ३२४२१ पैकी २४०६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दाबोळीत ७५.३५ टक्के मतदान झाले. कुठ्ठाळीत ७२.७० मतदान झाले. एकूण चारही मतदारसंघांतील मतदानाची सरासरी ७४ टक्के होती.

डिचोलीत शांततापूर्ण मतदान

डिचोली तालुक्यात काल लोकसभेसाठी ८३.२७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात ८४.८७ टक्के झाले. तेथे २४,९८२ मतदारांपैकी २१,१७० मतदारांनी मतदान केले. डिचोली मतदारसंघात ८२.६१ टक्के, मये मतदारसंघात ८२.४७ टक्के मतदान झाले. मये येथे एका मतदान केंद्रातील यंत्र नादुरुस्त झाल्याने एक तास मतदान बंद राहिले. मात्र, मतदानाची वेळ वाढविण्यात आली नाही.
डिचोली तालुक्यातील मये, डिचोली, साखळी या मतदारसंघांतील १२८ मतदान केंद्रांवर काल सकाळपासून संथगतीने पण शांततापूर्ण मतदान झाले. मतदान केंद्रांची संख्या व मतदानाची वेळ यावेळी वाढवण्यात आल्याने कोठेही मतदारांना फार वेळ खोळंबून राहावे लागले नाही.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व विजयादेवी राणे यांनी विठ्ठलापूर – साखळी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.  मोदींचे वलय गोव्यात चालणार नसल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. डिचोली तालुक्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये भाजपा आघाडी घेणार असल्याचा दावा उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत आदी भाजपा नेत्यांनी केला आहे, तर यावेळी कॉंग्रेसला मोठ्या संख्येेने मतदान झाल्याचा दावा माजी आमदार प्रताप गावस यांनी केला. तपोभूमीचे पद्मनाभ संप्रदायाचे पीठाधीश ब्रह्मेशानंद यांनी शिरसई या आपल्या मूळ गावी मतदान केले.

पेडण्यात मतदानास उत्साह

पेडणे तालुक्यात काल लोकसभा निवडणुकीत उत्साही मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर चांगली उपस्थिती दिसून येत होती. भाजपाच्या बाजूने मतदान व्हावे यासाठी त्या पक्षाचे कार्यकर्ते बरेच सक्रिय दिसून येत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर एकेका वयोवृद्ध, आजारी मतदारांनीही मतदान करावे यासाठी प्रयत्न चालल्याचे दिसत होते. किनारपट्टीतील गावांत सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. सीआरझेडच्या विषयात भाजपाने स्थानिकांना संरक्षण देण्याची ग्वाही दिल्याने आपल्या उमेदवाराच्या बाजूने मतदान झाल्याचा दावा भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. पेडणे तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

पर्वरी परिसरात शांततापूर्ण मतदान

पर्वरी विधानसभा मतदारसंघात काल लोकसभेसाठी शांततापूर्ण मतदान झाले. पेन्ह द फ्रान्स, साल्वादोर द मुंद व सुकूर या तिन्ही पंचायतक्षेत्रांतील १२ मतदानकेंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी उपस्थिती लावली. सकाळी पंचवीस टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत पंचावन्न टक्के व मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात ७३ टक्के मतदान झाले होते. सकाळी पुरूष मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले, तर संध्याकाळी महिलांची संख्या लक्षणीय होती. कोठेही ताणतणाव दिसून येत नव्हता. पोलीस आणि केंद्रीय जवानांचा बंदोबस्त चोख होता.

माशेल भागात सकाळपासून रांगा

लोकसभेच्या निवडणुकीसाठी माशेल – खांडोळा पंचक्रोशीतील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला, पण तत्पूर्वी पहाटे साडे सहा वाजल्यापासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांनी रांगा लावल्याचे दिसून आले. प्रत्येक केंद्रावर सकाळी नऊ वाजेपर्यंत पंधरा ते अठरा टक्के मतदान झाले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत काही केंद्रांवर ३९, तर काही ठिकाणी ४२ टक्के मतदान झाले होते. त्यात महिलांपेक्षा पुरूषांची संख्या अधिक होती.

गोव्यात विक्रमी ७६.८२ टक्के मतदान

सकाळी अकरानंतर मतदानाचा ओघ कमी झाला. संध्याकाळी चार वाजल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. यावेळी महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. काही मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार स्लीप्स स्वीकारल्या गेल्या, तर काही केंद्रांवर मतदारांकडून मतदार ओळखपत्रे मागण्यात येत होती. सहकारमंत्री दीपक ढवळीकर जातीने या भागात फिरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.

सावर्डे-कुडचड्यात मोठ्या प्रमाणात मतदान

सावर्डे – कुडचडे व सांगे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांत सकाळी मोठ्या प्रमाणात मतदान झाले. सकाळी साडे नऊ पर्यंत पंचवीस टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे दिसून आले. सावर्डे मतदारसंघातील आंबेउदक या मतदान केंद्र क्र. ३२ वरील निवडणूक अधिकारी जिप्सीन मिरांडा याने पत्रकारांना अपशब्द वापरल्याने पत्रकारांनी निषेध केला व त्यावर कारवाईची मागणी केली आहे. 
काले पंचायतक्षेत्रातील वल्डंव येथील लोकांना सुमारे पाच कि. मी. अंतरावर काले येथे जाऊन मतदान करावे लागल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. आमच्या गावात मतदान केंद्राची सोय करावी अशी मागणी करूनही निवडणूक आयुक्तांनी दखल न घेतल्याचे तेथील मतदारांनी सांगितले. माजी सरपंच सत्यवान गावकर यांनी त्याला दुजोरा देताना आपणही सदर केंद्रासाठी प्रयत्न केले होते असे सांगितले. दुपारी एक वाजेपर्यंत या भागांत पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.

सत्तरीत मतदानाला चांगला प्रतिसाद

सत्तरी तालुक्यातील पर्ये व वाळपई या दोन्ही मतदारसंघांत लोकसभेसाठी झालेल्या मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यात एकूण ८२.८३ टक्के मतदान झाले. सत्तरी पर्ये व वाळपई या दोन मतदारसंघात मिळून ५५५१४ पैकी ४५९८० मतदारांनी मताधिकार बजावला. वाळपई मतदारसंघात ८२.२६ टक्के मतदान झाले. तर पर्येमध्ये ८३.३६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
 सकाळी धिम्या गतीने मतदान सुरू होते, पण दुपारी बारापर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी चार वाजेपर्यंत सत्तर टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे दिसून आले. सत्तरीतील सर्व पंचायतींत शांततेने मतदान झाले. सध्या काजूचा मोसम असल्याने सत्तरीतील महिलांना दुपारनंतर काजू गोळा करण्यासाठी जावे लागत असल्याने या भागात दुपारी बाराच्या आधीच महिलांची मतदान केंद्रांवर हजेरी होती. 
कॉंग्रेस आणि भाजपा या राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते मतदान मोठ्या संख्येने व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. वाळपईचे आमदार विश्वजित राणे, भाजपाचे सत्यविजय नाईक, भाजपाचे विश्वजित कृष्णराव राणे, नगराध्यक्ष रामदास शिरोडकर हे सर्वत्र वावरत होते.
 

अनेक मतदानयंत्रांत बिघाड

काल मतदानावेळी काही मतदान 
केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड होण्याचे प्रकार घडले. उत्तर व दक्षिण गोव्यातील अनेक मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रे बिघडल्याने नवे यंत्र आणावे लागले. त्यामुळे मतदानात खंड पडला. या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मतदान यंत्राची बॅटरी नीट काम करीत नसल्याने यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान यंत्रे बिघडण्याचा प्रकार यंदा पहिल्यांदाच दिसून आला. 

कॉंग्रेस व ‘आप’ची तक्रार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेसबुकवरून प्रचार केल्याचा आरोप करून गोवा प्रदेश कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भाजपा सरकारशी हातमिळवणी असून कॉंग्रेसच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे संघटन सचिव दुर्गादास कामत यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाने निवडणूक अधिकार्‍यांनी मतदारांना ‘टोपी’ वापरण्यास मज्जाव केल्याचा आरोप केला आहे. मतदान यंत्रावरील बॅटरी टॉर्चचे चिन्ह आणि आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू यांमध्ये कमालीचे साम्य होते व त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला असा दावाही आम आदमी पक्षाने केला आहे.