गोव्यात दानधर्म; मुंबईत फसवणूक

0
14

गोवा पोलिसांना 31 लॅपटॉप दान केलेल्या व्यक्तीकडून 2.8 कोटींची फसवणूक

गोवा सरकारच्या पोलीस खात्याला 31 लॅपटॉप दान केलेल्या व्यक्तीला मुंबईतील एका सराफी व्यावसायिकाची सुमारे 2.8 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी 7 डिसेंबरला अटक केली आहे. वैभव ठाकर असे अटक केल्या व्यक्तीचे नाव आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकारी असल्याची बतावणी करून झवेरी बाजारातील सराफी व्यावसायिकाची 2.8 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वैभव ठाकर याला अटक करण्यात आली आहे.

वैभव ठाकरला गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) वैभव ठाकरला यापूर्वी 200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या व्यापार घोटाळ्यात अटक केली होती. गेल्या वर्षी त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर संशयित वैभव ठाकर याने एप्रिल 2025 मध्ये गोव्यात येऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि गोवा पोलिसांना 31 लॅपटॉप दान केले होते.
वैभव ठाकर याने सराफी व्यावसायिक शैलेश जैन यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि कस्टम्स लिलावातून सोने मिळवण्यासाठी त्याच्या संबंधांचा वापर करू शकतो हे पटवून देण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचे भासवले. जैनने अखेर जवळजवळ 3 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. वैभव याला 8 डिसेंबरला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.