गोवा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
गोव्यात चित्रपटाला उद्योगाचा दर्जा मिळाला नसल्याने चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्नरत असलेल्या कलाकारांचे फार मोठे नुकसान होत असल्याचे माजी आमदार व मडगांवच्या रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी काल येथे गोवा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना सांगितले.
येथील संकल्पना या संस्थेने कला व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले होते. दामू नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या चित्रपटाचा समारोप आज संध्याकाळी होणार असून आज दिवसभर विविध चित्रपट व शॉर्ट फिल्मस दाखवण्यात येतील. यावेळी पुढे बोलताना दामू नाईक म्हणाले की, गोव्यात कलाकारांची कमतरता नाही. मात्र, त्यांना पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. गेल्या चार पाच वर्षांत सरकारी लालफितीमुळे येथील कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. चित्रपट निर्मिती करण्यास इच्छुक असलेले येथील कलाकार व तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन करावी व सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करावे, असे त्यांनी सुचविले. सर्वप्रथम संकल्पना या संस्थेचे अध्यक्ष साईनाथ परब यांनी स्वागत केले. महोत्सवाची सुरवात जो रोज दिग्दर्शित ‘मारियोला’ या चित्रपटाने झाली. नंतर बिपीन खेडेकर यांचा ‘शल्य’, सिध्देश बोरकर यांचा ‘सदाफुली’, सत्यवान पार्सेकर यांची ‘वन थॉट’ बबन भगत यांची ‘एके दर्या देगेरे, स्वप्निल साळकर यांची ‘चक्रव्ह्यू’ व राजेश भोसले यांची ‘कौन जिम्मेदार’ या शॉर्टफिल्मस दाखविण्यात आल्या.

