Home बातम्या गोव्यात गुंजारली गझल…

गोव्यात गुंजारली गझल…

0

अजय बुवा

शनिवार १४ जानेवारी व रविवार १५ जानेवारी हे दोन्ही दिवस रसिक गोवेकरांसाठी मंतरलेले व भारलेले होते. कलारसिक गोंयकारदोन्ही दिवस शब्दालंकारांच्या झुल्यावर तन्मयतेने डोलला. एका बाजूला निरंतर येणार्‍या मांडवीच्या लाटा आणि दुसर्‍या बाजूला शेरशायरीच्या आस्वादक लाटा…. एका बाजूला मदमस्त डोलणारी नारळाची झाडे तर दुसर्‍या बाजूला गझलीच्या प्रत्येक शब्दांना दाद देण्याकरिता डोलणार्‍या मानासगळेच कसे विहंगम अन् मंत्रमुग्ध करणारे…. कारण होते सहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन!

गझल सागर प्रतिष्ठानने सदर संमेलन गोव्यात आयोजित करून गोमंतकीयांवर उपकारच केले. वाटत होते की हे संमेलन गोव्याच्याच गझलप्रेमींचे आहे. मराठीकोंकणी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत गोव्याच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत असे जाणकार का म्हणतात याचा प्रत्यय यावेळी आला.

फुलझाडांनी सजवलेले आकर्षक व्यासपीठ व त्या रंगसंगतीला उजाळा देणारी पार्श्‍वभूमी यामुळे गझलेला पूरक असे वातावरण अगोदरच तयार झाले होते. मोजकीच पण अभ्यासू, आलंकारिक शब्दांनी भरलेली अन् तेवढीच काळजाचा ठाव घेणारी अशी भाषणे, यामुळे कुठेच रसभंग झाला नाही. जणू एक आनंदोत्सवच या ठिकाणी साजरा होत असल्याचा भास वारंवार होत होता. गोपाळराव मयेकर म्हणतात

या आनंदाच्या वेळी, मी गीत कोणते गाऊ

त्या अनंत अज्ञाताला नजराणा कुठला देऊ

मी रिताच झालो होतो, जाणार रित्या हातांनी

मज दान कसे हे पडले भरलेले पानोपानी

ही कृतज्ञता हृदयीची शब्दांत कोणत्या ओऊ

त्या अनंत अज्ञाताला नजराणा कुठला देऊ

नक्षत्र फुलांच्या गावी हा चाफा एक फुलू दे

त्या प्रकाशगंगे माजी नावेसह सर्व बुडू दे

या विना तुझ्या दाराशी मी दीप कोणता लावू

त्या अनंत अज्ञाताला नजराणा कुठला देऊ….

उद्घाटकच नव्हे तर प्रत्येकजण भारावला होता, त्याचे प्रतीक म्हणजेच मयेकरांची ही कविता

मयेकरसरांनी यावेळी भीमराव पांचाळेंची तुलना भीमराव आंबेडकरांशी केली. ते म्हणाले, ‘‘एका भीमरावाने सर्वांना घटनेच्या समानतेच्या सूत्रामध्ये बांधून टाकले, तर या भीमरावाने गझलेच्या गर्भरेशमी अशा धाग्यांमध्ये सगळे विश्‍वच बांधायला घेतले आहे…’’

मुळात गझलहा वाङ्‌मयीन प्रकार गोमंतकातील साहित्यिकांनी कधी गांभीर्याने घेतलाच नाही. बा. . बोरकरांसारख्या प्रतिभावंतानेही गझललेखन केले नाही. त्यामुळे गझल या साहित्यप्रकारात आम्ही दिसण्यासारखे ठसठशीत असे काहीच करू शकलो नाही. तसे बघायला गेलो तर गोव्याच्या समुद्राच्या लाटांमध्ये गझलेचा आनंदकल्लोळ आहे, तर परतणार्‍या लाटांमध्ये न संपणारा विरह आहे. अन् समुद्राच्या खोलपणात दर्द भरून राहिला आहे, जी ही गझलेची वैशिष्ट्ये आहेत. पण तरीसुद्धा गोव्यात गझल म्हणावी तशी रुजली नाही. ‘गोव्याच्या मातीत गझलेची पदचिन्हेया परिसंवादात वक्त्यांनी या विषयावर चांगलाच प्रकाश टाकला. नाही म्हणायला नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणार्‍या गोमंतकीयांच्या काही कवितांमध्ये गझलेचे बीज आढळते म्हणून आम्ही त्यांना गझलसदृश्य कविता म्हणू शकतो. परंतु या संमेलनाच्या निमित्ताने गोव्यात गझलेची बिजे रोवण्यात आली असे नक्कीच म्हणता येईल.

गोव्यातील कवींना गझल या प्रकाराचा मंत्र गवसणे आवश्यक आहे. एकदा का हा मंत्र गवसला की मग त्यांना तंत्र आपोआपच अवगत होईल व तंत्राकडून परत मंत्राकडे जाण्याचे मार्ग आपोआपच चोखाळले जातील असे मत यावेळी डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी व्यक्त केले.

कोंकणी भाषेसंदर्भात बोलायचे झाल्यास, कोंकणी भाषेच्या नवायतीबोलीत या काव्यप्रकाराच्या पहिल्यावहिल्या पावलांचा ठसा नजरेस पडतो, अशी अभ्यासपूर्वक माहिती राजय पवार यांनी परिसंवादात दिली.

मराठी गझल ः सुरेश भटांनंतरया परिसंवादाने गझल अभ्यासकांची वैचारिक भूक भागवली असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादात डॉ. अशोक पवळेकर, नीता भिसे यांनी भटांनंतरसुद्धा मराठी गझल कशी सक्षम होत आहे याचा सुंदर व अभ्यासपूर्ण आलेख घेतला.

निर्धार आज पक्का केला असा मनाचा

घेणार जन्म नाही केव्हाच मानवाचा

आणि इतुका जरूर आहे सारांश जीवनाचा

देऊन दुःख गेले धक्का मला सुखाचा

की बाहेर शिंपल्याचा मोती असा निघाला

साधासुधा न होता तो थेंब आसवाचा

अशा दर्दभरी गझल मुशायर्‍यांनी शनिवारची संध्याकाळ मंत्रमुग्ध करून टाकली. महाराष्ट्रीयन मराठी गझलकार किती ताकदीच्या गझला लिहू लागले आहेत याची झलक गोवेकरांना मिळाली. त्यांच्या तुलनेत आपण कुठे बसतो याचे मोजमापही यावेळी गोवेकरांनी केले, ही गोष्ट गोव्यातील गझलेला निश्‍चितच सुखावणारी आहे.

कधी वीणेतून आलो, कधी टाळातून आलो

तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो

तुकोबा संपली वारी, निघू का रे घरी आता

तुला माहीत आहे मी मुलाबाळांतुनी आलो

साध्या विचारातून किती प्रगल्भ गझल बनू शकते याची प्रचीती गोव्यातील कवींना सतीश दराडे यांनी करून दिली.

याची फुले करू की ठिणग्या करू प्रिये

डोळ्यांत दोन अश्रू जमले तुझ्यामुळे

चौर्‍याऐंशी लक्षवेळा जन्मून वारलो

हे चक्र जीवघेणे चुकले तुझ्यामुळे

झालो कसा विदेही गझले तुझ्यामुळे

देहाशिवाय जगणे जमले तुझ्यामुळे

यासारखी गझल गोमंतकीयांना प्रेरणा देऊन गेली. अभ्यास, वाचन, मनन व सातत्य या गोष्टींमुळे गोव्यातही गझल रुजू शकते याची प्रचीती रसिकांना यावेळी आली.

याअगोदरची पाच गझल संमेलने महाराष्ट्राच्या विविध भागांत संपन्न झाली. त्यामुळेच तिथे मराठी गझलेची श्रीमंती वाढली. गेली पाच वर्षे मराठी कवी गझलेच्या प्रांगणात आहे. सुरेश भटांनी वैभवशाली केलेल्या गझलसम्राज्ञीला वैभवात कसे ठेवायचे याचा ध्यास सदर संमेलनांनी जागृत ठेवला आहे.

गोव्याला आत्ता कुठे नवी ऊर्जा मिळाली आहे. एक प्रारंभ तर झाला आहे. गझल अजूनही गोव्यात तरी पर्यटकम्हणूनच वावरते आहे. गझलेचे पदचिन्ह उमटले आहे. उमटत आहेफक्त त्याची मळवाट होणे गरजेचे आहे. एकदा का मळवाट झाली की मग त्यावर कवीचा वावर वाढेल. त्यासाठी गझल प्रतिष्ठानसारखी संस्था गोव्यातही सुरू होणे आवश्यक आहे. गझल मुशायरे, गझल कार्यशाळा, गझल गायन मैफली व गझलविषयी अनेक उपक्रम गोमंतकात आगामी वर्षांत होणे गरजेचे आहे. गझलकवींना दाद मिळणेही तितकेच आवश्यक आहे. जे नवोदित आहेत, त्यांना या संमेलनाच्या निमित्ताने विश्‍वास मिळाला आहे. बीजारोपण तर झालेले आहे, आता त्यामधून वटवृक्ष होणे गरजेचे आहे.

आणि एकदा का गझलसम्राज्ञी गोव्यात नांदावयास आली, की मग गोमंतकाच्या प्रतिभेचे दर्शन संपूर्ण भारताला व्हायला वेळ लागणार नाही. गझल हा विषय मुळात गणितासारखा आहे. वरवर किचकट व अवघड वाटला तरी एकदा का त्याची गोडी लागली की मग प्रत्येक शब्द हृदयस्पर्शी होऊन जातीलहवा फक्त आत्मविश्‍वास व गझलेवर प्रेम!

सहाव्या संमेलनात एकूण तीन मुशायरे सादर झाले. प्रत्येक गझलेने रसिकांवर राज्य केले. काही गझलांनी अस्वस्थही केले. त्यातीलच ही एक

जीवनाला वेगळे परिमाण देऊया चला

दूरच्या स्वप्नगावी आज जाऊया चला

वादळे अन् पावसाची अनुभवायला तीव्रता

झोपडीच्या आसर्‍याने रात काढूया चला

स्वप्ननगरीच्या नभातील चंद्र होण्याऐवजी

ज्योत होउनी वंचितांचे घर उजेडूया चला

आणि

तोडगा वादावरी वेडा मी सांगतो तुम्हाला

मंदिरी रब आणि मशिदी राम ठेवूया चला