Home बातम्या गोव्यात इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ नि:स्वार्थी सुसंस्कृतांनी रोवली

गोव्यात इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ नि:स्वार्थी सुसंस्कृतांनी रोवली

0

विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे

आपला अग्रलेख स्वागत आणि विरोधतसेच भारतीय भाषा सुरक्षा मंचला आपण दिलेला सल्ला यथायोग्यच आहे. मात्र या विषयाला आणखी एक आयाम आहे. आपल्या परवानगीने नवप्रभावाचकांशी त्याबद्दल सुसंवाद साधत आहे.

पणजीत लिसेंव्ह नॅशनल द अफॉन्स द अल्बुकर्क होते. इथे सेत्‌मान्हा म्हणजेच आर्ट, कॉमर्स आणि सायन्सचे पदवीपर्यंतचे शिक्षण मिळत असे, सेतमानिस्ट गोवा मेडीकलमध्ये पुढील शिक्षणासाठी आणि तेरसैरो ऑफिशियाल म्हणून नोकरी मिळवण्यास पात्र ठरत असे. क्विंटानिस्ट हा मॅट्रीकुलेट समकक्ष. तो ऍडज्युदान्त (एलडीसी) च्या नोकरीस पात्र ठरत असे. इतर काही कोर्स वकीलीच्या अभ्यासक्रमासह त्याला करण्याची मुभा होती. म्हापसा आणि मडगावमध्ये दोन सरकारी लिसेव्ह होते. त्यावेळी पर्रा इथे (पर्रीकरांचं मूळ गाव) एकमेव इंग्रजी शिक्षण घेणारी शाळा होती. माझे प्रिन्सिपॉल स्वर्गवासी गुंडू सीताराम, उपाख्य आपा आमोणकर हे या शाळेचे शिक्षक. माझे वडील आणि आतेकाका रघुनाथ परशुराम उपाख्य काका देशप्रभू हे त्यांचेच विद्यार्थी.

गोव्यात नोकर्‍यांचा दुष्काळ होता. हिंदूंना मुंबईला मनारेथा, चल त्या नगरीला, भूलोकीच्या अमरावतीला असे तेव्हा मुंबईचे वर्णन करीत असत आणि ख्रिश्‍चनांना मुंबई किंवा आफ्रिकेत नोकरीनिमित्त जाणे भाग होते. अंगोला आणि मोझांबिक सोडल्यास इतर ठिकाणी पोर्तुगीज भाषेचा काहीएक उपयोग नव्हता. साहजिक हिंदू आणि ख्रिश्‍चन इंग्रजी शिक्षणाकडे वळले. अनेक ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू झाल्या. आपांनी म्हापशात अँग्लो पोर्तुगीज इन्स्टिट्यूट सुरू केले. शॉर्टफॉर्म एपीआय (आपी) आपांच्या सौंना सर्वजण आदराने माई म्हणत असत. मात्र काही वात्रट विद्यार्थी एकजण स्वतंत्र गोव्यात शिक्षणमंत्री झाला, त्यांना आपी म्हणत. असो. बहुतेक शाळा या चर्चच्या होत्या. हिंदूंना इंग्रजी शाळा सुरू करण्याची परवानगी नव्हती. त्यांना चर्चच्या शाळा विकत घेऊन आपल्या गावी सुरू करता येत असत.

माझे प्राथमिक इंग्रजी शिक्षण झाले ते पेडण्यातील इश्कोला विस्कोंद दे पेरनेम आणि माध्यमिक शिक्षण घेतले म्हापशाच्या अँग्लो पोर्तुगीज इन्स्टिट्यूट मधून. हिंदू आणि ख्रिश्‍चन इंग्रजीकडे वळल्यामुळे म्हापसा आणि मडगावचे लिसेंव बंद पडले. लिसेंव्ह नॅशनल द अफॉन्स द अल्बुकर्कला घरघर लागली.

पोर्तुगीज सरकारने इंग्रजी शाळेत जाणार्‍यांवर प्रायमेरा ग्रॅनपर्यंतचे शिक्षण अनिवार्य केले. इंग्रजी चौथीपर्यंत प्रायमेरा ग्रॅन पास होणे अनिवार्य होते, नपेक्षा इंग्रजी पाचवीत प्रवेश देण्यास बंदी होती. मराठीतून तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकत होता. प्रायमेरा ग्रॅनची आवश्यकता नव्हती. मात्र पेडण्यापासून काणकोणपर्यंत सर्वच मराठी शाळांत सातवीपर्यंतच शिक्षणाची सोय होती. नंतर पुणे बोर्डाची व्हर्नाक्युलर परीक्षा द्यावी लागे किंवा शिरोडा (महाराष्ट्र) इथे पाचवीच्या वर्गात प्रवेश घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करावे लागे. प्रस्तुत पत्रलेखकाने इंग्रजी तिसरीतच प्रायमेरो ग्रान ऑप्टिमा हॅबिसितासांव म्हणजेच २० पैकी १९ मार्क मिळवून मला शेंबडो (नाक गळका), लुडबो (तोतरा), भेत्रो (घाबरट) म्हणाणार्‍या मातुल घराण्यातील सर्वांना जबरदस्त धक्का दिला.

थोडक्यात, गोवा मुक्तीपूर्वी हिंदू आणि ख्रिश्‍चन दोन्ही समाज इंग्रजी भाषेकडे व्यावहारीक ध्येय नजरेसमोर ठेवून वळले होते. तेव्हा शाळांना कुठल्याही प्रकारची सरकारी मदत मिळत नसे. पाद्रींच्या शाळांना देखील. मे महिन्यात माझ्या लहानपणी सारस्वत विद्यालयाचे स्व. पांडुरंग मुळगावकर हातात तांबडे पास्तआणि तोंडावर मोगाळ हास्य घेऊन आमच्या पार्से गावी येत असत. माझे चुलत आजोबा सारस्वत विद्यालयाचे संस्थापक सदस्य. पाठोपाठ आपा. आत्मोद्धारचे वर्दे वगैरे देणगीसाठी येत. त्यांना सन्मानाची वागणूक मिळे. ही वागणूक किती सन्मानाची होती हे मला एकदा कै. मुळगावकरांनी सांगितलं होते. देणगी अर्थातच कोणतीही कुरकूर न करता दिली जाई. कारण देणगी जमा करणे हे त्यांचे व्रत होते. आपला वेळ आणि पैसा खर्च करून संपूर्ण पेडणे तालुक्यातून ते देणग्या गोळा करीत. या देणग्या शाळेची डागडुजी, नवीन बाक वगैरे आणण्यासाठी वापरल्या जायच्या. स्वतःसाठी त्यांनी एकही पैसा खर्च केलेला नाही.

आजची इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ या निःस्वार्थी, सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांनी घातली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांनी त्यांना आर्थिक मदत केली. अनेकांनी विनामोबदला अनेक शाळांतून अध्यापन केले. पणजीतील एक श्रीमंत आसामी मोहन यशवंत राव (लालाबाब) हे पीपल्स हायस्कूलमध्ये अनेक वर्षे आपला वेळ खर्च करून विद्यादानाचे काम करीत असत.

पेडण्यात माझे आतेबंधू कै. रघुराज उपाख्य भाऊसाहेब व्हायकाऊंटमध्ये विनामोबदला भुगोल आणि नागरिकशास्त्र शिकवत असत. शिक्षकी पेशा हा तेव्हा अर्थार्जनाचे साधन मानले जात नव्हते. विद्यादान हे एक परम आणि पवित्र कर्तव्य मानले जात असे.

आज खेडोपाडी इंग्रजी केजीपासून महाविद्यालयांपर्यंत खाजगी शाळा आहेत. शिक्षण हा धंदा झालेला असून चांगल्या दुकानातून जशी खरेदी केली जाते, त्याचप्रकारे चांगल्या शाळेत भरगच्च देणगी देऊन आपल्या पाल्यांना शिक्षण आणि तेही केजीपासून उच्च माध्यमिकपर्यंत देण्यास पालक धन्यता मानतात. पर्रीकर गोवामुक्त पूर्वकाळातील विद्यार्थी. त्यांनी माध्यमासंदर्भात संपादकांनी म्हटल्याप्रमाणे मध्यममार्ग स्वीकारला. त्यांच्याविरोधात ओरड करणार्‍यांना मी एवढेच सांगेन जन हो, गेट वेल सून!