गोव्यातून मजुरांना घेऊन रेल्वेचे मध्यप्रदेशात प्रस्थान

0
145

लॉकडाऊनमुळे गोव्यातील अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील ११९६ मजुरांना घेऊन कोकण रेल्वेची खास पहिली श्रमिक रेल्वेगाडी थिवी येथील रेल्वे स्थानकावरून ग्वाल्हेर – मध्यप्रदेशला काल शुक्रवारी रवाना झाली.

तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आल्याने परराज्यातील कामगारांना मूळ गावी सोडण्यास मान्यता देण्यात आली आहे. परराज्यातील सुमारे ८० हजार मजुरांनी घरवापसीसाठी सरकार दरबारी नोंदणी केली आहे. राज्य सरकारने उत्तर भारतात जाणार्‍या मजुरांच्या सोयीसाठी दोन रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्याची घोषणा केली होती. त्यातील पहिली श्रमिक रेल्वेगाडीतून मजुरांना परत पाठविण्यात आले आहेत.

राज्य प्रशासनाने पहिल्या श्रमिक रेल्वेतून प्रवास करण्यासाठी निवडलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना पेडे येथील क्रीडा संकुलात गुरूवारी नेऊन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी थिवी स्थानकावर खास रेल्वेगाडीचे आगमन झाल्यानंतर पेडे क्रीडा संकुलातील कर्मचार्‍यांना थिवी रेल्वे स्थानकावर कदंब बसगाड्यांतून नेण्यात आले.

रेल्वे गाडीत मजूर बसताना गर्दी होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मजुरांना सामाजिक अंतराचे पालन, मास्कची सक्ती करण्यात आली होती. कदंब बसगाडीतून उतरल्यानंतर रेल्वेतून प्रवास करणार्‍या मजुरांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. त्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, नोडल अधिकारी कुणाल, पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य, पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून व इतर अधिकारी उपस्थित होते.

क्वारंटाईन शुल्काबाबत नवा आदेश
राज्य सरकारने क्वारंटाईऩ शुल्काबाबत नव्याने आदेश जारी केला आहे. बिगर गोमंतकीयांना प्रतिदिन २५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. परराज्यातून गोव्यात प्रवेश करणार्‍या व्यक्तीची कोविड तपासणीसाठी प्रथम सरकारी क्वारंटाईन केंद्रात रवानगी केली जाणार आहे. कोविड तपासणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर सदर व्यक्तीला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईऩ केले जाणार आहे.
गोमंतकीय असल्याचा दस्तऐवज सादर करणार्‍याकडून क्वारंटाईन शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, जेवण, खाद्यपदार्थासाठी शुल्काची आकारणी केली जाणार आहे. या काळात व्यक्ती स्वतः जेवणाची व्यवस्था करू शकतो, असे आदेशात म्हटले आहे.

परदेशातून गोव्यात येणार्‍यांना
सक्तीचे सशुल्क क्वारंटाईन
राज्यात देशाबाहेरून विमान, जहाजाने येणार्‍यांना १४ दिवस सशुल्क क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. गोमंतकीय खलाशांचे शुल्क कंपनीकडून वसूल करण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका (आयएएस) यांनी काल जारी केला.