गोव्यातील सुरुवातीचे दिवस

0
12
  • ज. अ. रेडकर

देमू गोवेकर यांच्या घराला लागून ओढा आणि ओढ्याच्या पलीकडच्या काठी मंडप म्हणजेच ही शाळा! एक पाय घरात आणि दुसरा शाळेत! राहण्याची सोय म्हणजे झोपायला बलकांव, आंघोळ उघड्यावर, प्रातर्विधी शेताच्या बांधावर किंवा जवळच्या ओढ्यावर!

१ जुलै १९६७ रोजी माझी प्राथमिक शिक्षकपदासाठी मुलाखत होऊन लगेच निवड झाली आणि माझी नियुक्ती बांध-अंजुना (बार्देस) इथल्या प्राथमिक शाळेत झाली. परंतु मुलाखतीनंतर लगेच नेमणूकपत्र हातात पडेल असे वाटले नव्हते, त्यामुळे इथे राहण्याच्या कोणत्याच पूर्वतयारीनिशी मी वेंगुर्ल्याहून पणजीला आलो नव्हतो. सोबत फक्त आणली होती शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे. त्यामुळे त्याच दिवशी नेमणुकीच्या ठिकाणी मला रुजू होणे शक्य नव्हते. शिवाय ज्या हायस्कूलमध्ये मी अर्धवेळ नोकरी करीत होतो तिथला राजीनामा देणे आवश्यक होते. शिवाय हायस्कूल सोडून प्राथमिक शाळेत नोकरी करावी का नको, हाही विचार डोक्यात घोळत होता. परंतु परिस्थिती माणसाला आपला गुलाम बनवते. नियुक्तीचे पत्र घेऊन मी माघारी वेंगुर्ल्याला आलो. आई आणि मोठ्या बहिणीशी बोललो. सर्वांचा विचार ठरला की, गोव्यात प्रेमळ काका-काकू आहेत, चुलत भावंडे आहेत, तेव्हा जायला हरकत नसावी. माझे कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिरोडकर यांचाही सल्ला घेतला आणि गोव्याला ७ जुलै १९६७ रोजी प्रस्थान ठेवले.

प्रथम नेमणूक ज्या बांध-अंजुना या शाळेत झाली त्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या निर्मला वागळेबाई! या मूळच्या सावंतवाडीच्या. ७ जुलै रोजी मी शाळा शोधत पोहोचलो आणि मला रडूच कोसळले. कारण ही शाळा चालत होती एका झोपडीवजा मंडपात. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणप्रसारासाठी वाड्यावाड्यांवर मराठी प्राथमिक शाळा सुरू करण्याचा सपाटा चालू केला होता. शाळेसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध होत नसेल तर भाड्याच्या खोलीत, तीही नसेल तर मंदिराच्या पुढील भागात किंवा एखाद्या मंडपात. मंडप म्हणजे गावातले धालो, श्रावण सप्ताह, शिगमोत्सव यासारखे उत्सव साजरे करण्याची जागा. हे मंडप म्हणजे यात मूर्तीपूजा वगैरे होत नाही, पण एखाद्या ठरावीक दिवशी गावचे स्थानिक लोक रात्रीच्या वेळी भजन करायला एकत्र येण्याची, दारे-खिडक्या आणि भिंती नसलेली झावळाच्या छपराची खुली जागा. इतर वेळी रिकामी राहणारी जागा. त्याचा उपयोग शाळेसाठी करायचा ही कल्पना.
ही उपाय-योजना केवळ तात्पुरती होती. शाळा इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली की इमारती बांधाव्यात, पण तोपर्यंत लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवणे योग्य नव्हे असे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना वाटत होते. मला मिळालेली अशी शाळा बघून मला काय वाटले हे मी शब्दांत सांगू शकणार नाही.

पण मागचे दोर तर दैवाने केव्हाच कापून टाकले होते. त्यामुळे माघार घेणे शक्य नव्हते. त्यापूर्वी मी वेंगुर्ल्याच्या पाटकर हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. तिथे ८ वी ते ११ वीपर्यंतचे वर्ग, प्रत्येक वर्गाच्या पाच-पाच तुकड्या अशा हजार-दीड हजार विद्यार्थिसंख्या असलेल्या आणि सुसज्ज इमारत, भव्य पटांगण, चाळीस-पन्नास शिक्षक व इतर कर्मचारी असलेल्या शाळेतून मी एका झोपडीवजा शाळेतील पाहिली ते चौथीच्या पंचवीस-तीस पोरांना शिकवणार होतो. पहिली आणि तिसरी एका शिक्षकाकडे आणि दुसरी व चौथी दुसर्‍या शिक्षकाकडे आणि तेही एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच छपराखाली, एकाच मंडपात! (पाटकर हायस्कूलमध्ये मी ९ वीच्या मुलांना गणित विषय शिकवत होतो. एकाच वर्गाच्या पाच तुकड्या. एकेका तुकडीत ५०-६० मुले असायची आणि इथे? प्रसंग बाका होता, पण इलाज नव्हता!) ही झाली शाळेची स्थिती. राहायची काय व्यवस्था? तर तिथला जो गावपुढारी होता त्याच्या घरी. पेईंगगेस्ट या स्वरूपात. हा पुढारी होता देमू गोवेकर. याच्याच पुढाकाराने या शाळेची मुहूर्तमेढ रोवलेली. तो काळच असा होता की गावातील लहानसहान पुढारीदेखील मुख्यमंत्र्यांचा आपण उजवा हात असल्याचा आव आणायचा व गावातील नवीन नेमणूक झालेल्या शिक्षकावर प्रभाव पाडायचा प्रयत्न करायचा. शिक्षिका असेल तर अधिकच. सुसरबाई तुझी पाठ मऊ असे म्हणून दिवस काढावे लागत असत महाराजा!
तर अशा प्रकारे अस्मादिकांची राहण्याची व पत्रावळीची सोय श्रीमान देमू गोवेकर यांच्या घरी फक्त महिना पन्नास रुपयात झाली. त्यांच्या घराला लागून ओढा आणि ओढ्याच्या पलीकडच्या काठी मंडप म्हणजेच ही शाळा! एक पाय घरात आणि दुसरा शाळेत! राहण्याची सोय म्हणजे झोपायला बलकांव (ओसरी), आंघोळ उघड्यावर, प्रातर्विधी शेताच्या बांधावर किंवा जवळच्या ओढ्यावर! उघड्यावर शौच करण्याची मला सवय नव्हती. त्या लोकांना मात्र याचे काहीच वाटत नसे.

कसेबसे वर्ष निभावून नेले. याचवेळी आणखी एक गोष्ट चांगली घडली आणि ती म्हणजे, माझ्या कालापूरच्या काकीची बहीण साळगाव येथे दिली होती. म्हणजे माझ्या चुलतबंधूंची मावशी! तिचे यजमान कृष्णा साळगावकर, त्यांची पत्नी राधा म्हणजेच माझ्या चुलतबंधूची मावशी, त्यांचे दोन पुत्र- एक पांडुरंग ऊर्फ दादा, दुसरा विठ्ठल आणि दोन कन्या- एकीचे नाव कुमुद आणि दुसरी अनिला असा त्यांचा परिवार होता. शेती आणि बागायती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, तर पांडुरंग ऊर्फ दादा प्रवासी टॅक्सी चालवायचा. त्याच्याकडे दोन गाड्या होत्या- एक एम्बेसिडर आणि दुसरी परदेशी बनावटीची कॉन्सल! कॉन्सल ही गाडी फार देखणी व आलिशान होती. मला ती खूप आवडायची. आपण अशी गाडी कधी घेऊ शकू का? असा प्रश्‍न तेव्हा डोक्यात येऊन जायचा आणि हे शक्य होणार नाही असे तेव्हा वाटून मन विषण्ण व्हायचे. (परंतु निवृत्तीनंतर हे स्वप्न साक्षात उतरले, ही गोष्ट अलाहिदा!) पण निदान ड्रायव्हिंग शिकून घ्यावे असे वाटायचे. मी पांडुरंगदादाला म्हणालोदेखील की, मला गाडी चालवायला शिकव. पण माझे पोरवय, कृश प्रकृती पाहून दादा म्हणाला, गाडी चालवायची तर काळीज घट्ट असावे लागते, प्रकृती सुदृढ असावी लागते, उगाच कुणाला हे जमत नाही! आज शाळकरी मुले दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवताना बघून पूर्वीचे ते दिवस आठवतात. गंमत म्हणजे पुढे मी दुचाकी चालवायला शिकलो ते वयाच्या ३० व्या वर्षी आणि चारचाकी वाहन चालवायला शिकलो चक्क निवृत्तीनंतर वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यावर अगदी साग्रसंगीत ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन! गंमत म्हणजे, पेडणे येथील ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मी गाडी चालवायला शिकलो, त्या स्कूलचा संचालक होता (आणि अजून आहे) माझा उच्चमाध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आनंद सावळ-देसाई. आधी मी त्याचा प्रिन्सिपॉल होतो, आता तो माझा झाला होता.

बांध-अंजुनापासून साळगावचे अंतर मधल्या वाटेने पर्रामार्गे आठ ते दहा कि.मी. असेल. दर शनिवारी मी साळगावच्या या मावशीकडे सायकलने येत असे आणि सोमवारी सकाळी पुन्हा माघारी जात असे. ही मंडळीदेखील खूप प्रेमळ आणि मायाळू होती. वास्तविक पाहता माझे व त्यांचे तसे कोणतेच रक्ताचे नाते नव्हते, परंतु सख्ख्या नातेवाईकांसारखेच प्रेम या कुटुंबाने मला दिले आणि आजही त्यांची पुढची पिढी नातेसंबंध टिकवून आहे हे विशेष! त्यावेळची गोव्यातील माणसेच वेगळी होती. अगदी रसाळ फणसासारखी गोड आणि शहाळ्यातील पाण्यासारखी मधुर स्वभावाची! आपपर भाव त्यांच्यात नव्हता. तर म्हापसा येथील झोनल शिक्षण कार्यालयात नागवेकर नावाचे सद्गृहस्थ युडीसी पदावर होते, ते पांडुरंगदादाचे मित्र होते. त्यांच्या ओळखीने माझी बदली बांध-अंजुने येथून सावंतावाडा-कलंगुट येथील शाळेत झाली. कलंगुट समुद्रकिनार्‍यावरची ही शाळा! समुद्रकिनारा हा माझा जिव्हाळ्याचा विषय होता. कारण माझा जन्मच मुळी अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वेंगुर्ले येथे झाला होता. लहानपणी मी या समुद्रात आईला न सांगता गुपचूप पोहायला जात असे. सोबत माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला माझा मामेभाऊ मनोहर असायचा. आईला आम्ही पाण्यात बुडू अशी भीती वाटायची. आम्ही चोरून समुद्रावर गेलो हे कळले की घरी आल्यावर फटके खाणे ठरलेले असे. पण समुद्राची ओढ काही सुटली नाही.
सावंतावाडा-कलंगुट ही शाळा मात्र खूप सुंदर होती. कारण ती पोर्तुगीजकालीन सरकारी शाळा होती. इमारतीचं बांधकाम उत्तम दर्जाचं तर होतंच, पण सर्व सोईसुविधांनी युक्त इमारत होती. लाल कोबा केलेली जमीन, प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या, मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र खोली, स्टाफसाठी वेगळी खोली, स्वच्छता गृह (ज्याची व्यवस्था त्यावेळी अन्य शाळांमधून दुर्लभ होती), मुलांसाठी डेस्क व बेंच, शिक्षकांना लागणारे उत्तम फर्निचर, शाळा इमारतीच्या शेजारी असलेल्या विहिरीला पंप जोडून पाणीपुरवठा, प्रशस्त क्रीडांगण, बगीचा करण्यासाठी जागा, लोखंडी कुंपणाने बंदिस्त आवार अशा सर्व गोष्टी होत्या. अगदी आदर्श शाळा कशी असावी याचे ते उत्तम उदाहरण होते! अशा शाळा अगदी मोजक्याच ठिकाणी पोर्तुगीज सरकारने प्रत्येक तालुक्यात बांधल्या होत्या त्यांपैकीच ही एक! अशा शाळेतून अध्यापन करायला कोणत्याही शिक्षकाला नक्कीच आवडेल, त्याचा उत्साह वाढेल असेच वातावरण तिथे उपलब्ध होते! श्रीधर नाईक हे वयस्कर सद्गृहस्त तिथे मुख्याध्यापक होते. ते मूळचे कुडाळजवळच्या नेरूर या गावचे. गोवामुक्तीनंतर १९६२ साली जे शिक्षक म्हणून गोव्यात आले त्यांपैकी एक. शाळेजवळच्या शेजारीच ते आपल्या परिवारासह बिर्‍हाड करून राहायचे. त्यांच्याच बिर्‍हाडी माझी पेईंगगेस्ट म्हणून सोय झाली. त्यांचा थोरला मुलगा सूर्यकांत माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान होता आणि त्याच्या पाठोपाठच्या विमल आणि विठाई या दोन मुली. ही तिन्ही मुले कळंगुट येथील हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेणारी होती. मी त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून गेलो.

गोवा विमोचनानंतर गोवा सरकारने खेड्यापाड्यांत प्राथमिक शाळा सुरू केल्या खर्‍या, पण त्यासाठी गावातील देवालयांचा पुढचा भाग तर कुणाच्या तरी घराची उपलब्ध पडवी अशा स्वरूपाच्या त्या शाळा होत्या. गोवा विमोचनानंतर मात्र सरकारने स्वतंत्र इमारती बांधण्याचा धडाका लावला, पण पोर्तुगीजकालीन सरकारची दृष्टी त्यात नव्हती असे खेदाने म्हणावे लागेल. दोन खोल्यांची इमारत बांधली, खडू-फळा दिला, मास्तर नेमला की झाली शाळा! ना त्यांत स्वच्छतागृहाची सोय, ना शिक्षकांना स्वतंत्र खोली, ना पिण्याच्या पाण्याची सोय! क्रीडांगण म्हणून जवळचे कुणाचे तरी पडीक शेत वापरायचे! सगळेच दुर्भिक्ष आणि गैरसोय! असे असूनदेखील कोकणपट्टीतून आलेले शिक्षक मनापासून अध्यापनाचे काम करायचे, विविध स्पर्धांसाठी मुलांना तयार करायचे. पुढे पुढे चांगल्या सुसज्ज इमारती सरकारने बांधल्या खर्‍या, परंतु शिक्षणधोरण व्यापक झाले आणि खाजगी संस्था आपल्या हायस्कूलला प्राथमिकवर्ग जोडण्यासाठी पुढे सरसावल्या. परिणामी, सरकारी शाळा ओस पडू लागल्या! आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व सोईनीयुक्त सुसज्ज इमारती आहेत, परंतु पटसंख्या नाही अशी स्थिती झाली आहे. पूर्वीच्या गजबजलेल्या शाळा पटसंख्येअभावी आता बंद पडू लागल्या आहेत. खाजगी शाळेकडे लोकांचा ओढा वाढला. कारण त्या इंग्रजी माध्यमाच्या होत्या! आपली मुले सुरुवातीपासून इंग्रजी माध्यमातून शिकली तर पुढे त्यांचे उत्तम करिअर बनेल अशा भ्रामक समजुतीतून पालकांचा कल या खाजगी शाळांकडे वळला! (अर्थात या सरकारी शाळांतून नंतरच्या काळात जे शिक्षक नेमले गेले तेदेखील या गोष्टीला काही अंशी जबाबदार आहेत हे नाकारून चालणार नाही. कारण हे शिक्षक स्वतःच्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करू लागले, मग पालकांचा तरी सरकारी मराठी शाळांवर विश्वास कसा राहील?) (क्रमशः)