नौदलाच्या वेळ मर्यादेसह अनेक मागण्या
गोव्यात येणार्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी ई-व्हिसा दिल्या जाणार्या देशांची संख्या वाढवण्यात यावी, चार्टर धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जाव्यात, विमानतळावरील महागडे शुल्क कमी केले जावे, दाबोळी विमानतळावर नागरी विमानांसाठी नौदलाने वेळेची जी मर्यादा घालून दिलेली आहे ती नाहीशी केली जावी, केंद्राने गोवा पर्यटन खात्याला पर्यटनाच्या मार्केटिंगसाठी आर्थिक सहाय्य द्यावे, दाबोळी विमानतळासाठी खुले आकाश धोरण जाहीर करावे, केंद्रीय पर्यटन खात्याच्या विविध योजनाखाली गोव्याला पर्यटनासाठी अर्थसहाय्य द्यावे आदी विविध मागण्या आपल्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा व नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गणपती राजू यांच्याकडे केल्याची माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
ई-व्हिसा किंवा देशात येताच व्हिसा विविध देशातील नागरिकांना देण्यात येतो. त्यात भर घालताना ब्रिटन, पोलंड, डेन्मार्क व स्वीडन या देशांतून येणार्या पर्यटकांनाही वरील सुविधा देण्याची सोय केली जावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.खुले आकाश धोरण हवे
खुले आकाश धोरण जाहीर करून विदेशातून थेट गोव्यात येणार्या विमानांची संख्या वाढवल्यास राज्यात येणार्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकेल. कारण थेट विमानसेवा नसल्याने पर्यटकाना मुंबई किंवा अन्य शहरातून गोव्यात यावे लागते. पुन्हा मायदेशी परततानाही त्यांना विमान पकडण्यासाठी गोव्यातून अन्य शहरात जावे लागते. त्यासाठी त्यांना ५० ते ६० हजार अतिरिक्त मोजावे लागतात. त्यामुळेही गोव्यात येणार्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागलेली आहे.
नौदलाच्या निर्बंधाचा परिणाम
नौदलाने वेळेचे निर्बंध घातलेले असल्याने दाबोळी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी २४ तास खुला ठेवता येत नाही. त्यामुळेही विदेशातून येणार्या व विमानांची संख्या घटू लागली आहे.
गोव्यातील किनार्यांवर भरती रेषेपासून २०० मीटरच्या अंतरापर्यंत बांधकामे करता येणार नाहीत असा जो कायदा आहे तो शिथिल केला जावा व भरती रेषेपासून २०० मीटरऐवजी १०० मीटर पर्यंत बांधकामे करता येणार नाहीत अशी दुरुस्ती केली जावी अशीही मागणी करण्यात आली असल्याचे परुळेकर म्हणाले. पर्यटनाच्या विकासासाठी किनारपट्टीवर आणखी विकास होणे आवश्यक आहे, असे दिसून आल्याने ही मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. पर्यटन खात्याने गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी केलेल्या वरील सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन केंद्राने दिले असल्याचे यावेळी परुळेकर यांनी सांगितले. यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल हेही उपस्थित होते.

