गोव्यातील मल्टिप्लेक्समध्येही ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन

0
121

राज्यातील आयनॉक्स, ओसिया व इतर सिनेमागृहात रविवारपासून संजय लीला भन्साळी निर्मित ‘पद्मावत’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास सुरूवात झाली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी सिनेमागृहाच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सिनेमामध्ये वादग्रस्त काहीच नसल्याची प्रतिक्रिया सिनेमा पाहिलेल्या अनेक सिने रसिकांनी व्यक्त केली.

भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटाचे सुरूवातीला ‘पद्मावती’ असे नाव होते. या चित्रपटाला आक्षेप घेण्यात आल्याने निर्माता भन्साळी यांना चित्रपटात आवश्यक बदल तसेच चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर भन्साळी यांनी चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ असे केले. देशभरात २५ जानेवारीला ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. गोव्यासह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशमधील मल्टिप्लेक्स संघटनेने ‘पद्मावत’ हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, गोव्यातील वास्को, फोंडा येथील सिनेमागृहातून ‘पद्मावत’चे कोणत्याही अडथळ्याविना प्रदर्शन करण्यात आले. आयनॉक्सने सुरक्षेच्या कारणास्तव पद्मावतचे प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारच्या ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाच्या वेळी सुध्दा विरोध करण्यास कुणीही पुढे आले नाही. पणजीसह इतर भागात सुध्दा सिनेमाचे प्रदर्शन करण्यात आले. सिनेमागृहाच्या आवारात सावधगिरीचा उपाय म्हणून पोलीस तैनात करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.