– विष्णू सूर्या वाघ
लहानपणी मी वडिलांबरोबर अनेक ठिकाणी फिरलो. गोमंतकाची उत्सवी रंगभूमी किती समृद्ध आहे नि नाटकाचं वेड या मातीतल्या माणसांच्या अंगात कसं भिनलंय याचं मी जवळून दर्शन घेतलं ते याच काळात.
गोव्यातली नाट्यकला ही देव-देवतांच्या आशीर्वादाने बहरली. मंदिराच्या परिसरातच तिला खरा फुलोरा आला. नाटक हे तेव्हा केवळ स्वतःची हौस भागवणारं माध्यम नव्हतं. ती तर साक्षात भगवंताची सेवा होती. घरचं मंगलकार्य करीत असल्याच्या भावनेनं तेव्हा नाटक सादर व्हायचं. पैसाही आवडीनं खर्च केला जायचा. सग्या-सोयर्यांना निमंत्रणं जायची. ‘पहिला पार्ट’ असेल तर शिर्याची ताटं रंगपटात पाठवली जात. त्या नाटकाच्या आठवणींचा गंध मग वर्षभर दरवळत असायचा. अमाप हौसेनं नाटक करणारे असे अनेक लोक मी वडिलांसोबत पाहिले. एका अर्थी गोमंतकीय उत्सवी रंगभूमीचं प्रातिनिधिक दर्शन मला घेता आलं असं म्हणायला हरकत नाही. सावईवेर्याला अनंताच्या चरणी दरवर्षी सेवा रुजू करणारे व्यंकटेशबाब रायकर, मेरशी-वाडीसारख्या गावात महाराष्ट्रातील उत्तमोत्तम स्त्री-कलाकारांना आमंत्रित करून अभिजात संगीत नाटकांचे प्रयोग करणारे रघुवीर होबळे, डोंगरी-नावेलीचे सखाराम रावळ, अवेड्याला शांतादुर्गा चामुंडेश्वरीच्या चरणांशी कानेटकर- शिरवाडकरांसारख्या दिग्गजांची नाटके करणारे सूर्यकांत लोटलीकर, वास्कोचे शंकर बांदेकर अशी शेकडो माणसे मी पाहिली. त्यांची हौस होती म्हणून नाटक जगलं. दिग्दर्शकांना, कलाकारांना मान-सन्मान मिळाले.
ही हौस हल्ली कमी होत चालली आहे. जुन्या- जड नाटकांना हात घालायला कुणी जात नाही. तालमी व्यवस्थितपणे घेतल्या जात नाहीत. चांगल्या स्त्री-कलाकार मिळणं दुरापास्त झालंय. अलका वेलिंगकर, किशोरी हळदणकर, शशिकला नागेशकर, गुलाब मंगेशकर, नीता नावेलकर, शुभांगी कुंडईकर, भारती पानवेलकर, महानंदा आमोणकर या उत्सवी रंगभूमीवरच्या आघाडीच्या अभिनेत्री. त्यांची जागा भरून काढणार्या कलाकार अजून दिसत नाहीत. तातोबा वेलिंगकर, सुकडाराम आडपैकर, नरहरी वळवईकर, वामन कळंगुटकर, पांडुरंग फडते-बांदोडकर, सूर्या वाघ हे बुजुर्ग दिग्दर्शक जगाच्या रंगभूमीवरून अंतर्धान पावले.
उत्सवी रंगभूमीवर आज अनेक प्रशिक्षित तरुण व तरुण्या दिग्दर्शक बनल्या आहेत. महाबळेश्वर मणेरकर, सोनू नाटेकर, कृष्णा बांदोडकर, केशव वाघुर्मेकर, कमलाकर नाईक, बर्वे यांनी नेपथ्यकार म्हणून आपली स्वतंत्र ओळख स्थापित केली होती. आजकाल नेपथ्यकारांनाही फारसा भाव दिला जात नाही. परिणामी अनेकजणांनी नवे कपडे, नवीन सेट्स बनवायचं काम थांबवलंय. कासारपालचे सोमनाथ नाईक हे पडदे रंगवण्यात प्रवीण होते. त्यांच्या निर्वाणानंतर फार मोठी पोकळी निर्माण झालीय. तुकाराम फोंडेकर, रंगनाथ च्यारी, नरसिंह घाटवळ, नाना शिरगावकर, बाबय हडफडकर, मनोहर जुवेकर, सोमनाथ च्यारी, मदन नाईक, वामन गावणेकर यांनी गावोगावच्या उत्सवांतून संगीत नाटकं वाजवली. हजारो कलाकारांना गायला लावलं. आज संगीत रंगभूमीलाच अवकळा आली आहे. हे उदास चित्र पाहिलं की पूर्वीचे दिवस आठवू लागतात. रंगदेवतेच्या चरणी वर्षाकाठी दोन-अडीच हजार नाटकांची फुलं अर्पण करणारी उत्सवी रंगभूमी आज जर्जर का झाली हा प्रश्न मला अस्वस्थ करतो.
एकेकाळी नाटक हेच गोव्यात मनोरंजनाचं मुख्य साधन होतं. १९८० नंतर दूरदर्शनचा धुमाकूळ सुरू झाला. मध्ये व्हिडियोची लाट आली. आजचा जमाना केबलचा आहे. पाच-पन्नास वाहिन्यांचा ‘चॉईस’ लोकांना उपलब्ध झालाय. दूरचित्रवाणीच्या या आक्रमणामुळं रंगभूमीला जबरदस्त फटका बसला आहे. कित्येक गावात आज मराठी नाटकांऐवजी हिणकस, आचरट कोकणी नाटके केली जातात. दहा-पंधरा हजार रुपये खर्चून ऑर्केस्ट्रा वाजवले जातात. नवी पिढी नाटकांपेक्षा डिस्को नाईट आणि फॅशन शोमध्ये अधिक रस घेऊ लागली आहे. एखादी भूमिका उत्तम रीतीने वठवण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले पंधरा-वीस दिवस देईन ही समर्पणाची वृत्तीच कोमेजत चालली आहे. उत्सवी रंगभूमीला लागलेली ही वाळवी वेळीच नष्ट केली नाही तर एका फार मोठ्या सांस्कृतिक संकटाला सामोरे जाण्याची पाळी आपल्यावर आल्यावाचून राहणार नाही!
गरज एका समान सूत्राची!
कला अकादमीच्या नाट्यस्पर्धांतून कलाकार-दिग्दर्शकांची एक बुलंद फळी तयार झाली. त्यांचा अनुभव आणि कौशल्य यांचा वापर रंगभूमीच्या उत्कर्षासाठी करून घेणे शक्य आहे. डॉ. विजय थळी, डॉ. अजय वैद्य, परेश जोशी, प्रदीप तळावलीकर, गणपत व भालचंद्र कळंगुटकर, जीवन मयेकर, रविंद्र आमोणकर, अवधूत कामत, राजेंद्र तालक, श्रीधर कामत बांबोळकर, अजित केरकर, सतीश गावस, राजीव शिंदे, देविदास आमोणकर, ज्ञानेश मोघे, श्याम च्यारी, मधुकर जोशी, साईश देशपांडे, सोमनाथ नाईक, विजयकुमार नाईक, प्रमोद म्हाडेश्वर, प्रसाद गुरव, दिलीप देसाई, जय हळदणकर हे कल्पक दिग्दर्शक अवतीभवती असताना रंगभूमीच्या भवितव्याबद्दल साशंक व्हायचं कारण आहे असं मला वाटत नाही. गरज आहे ती या सर्वांच्या प्रतिभेचा वापर करून घेण्याची. यासाठी राज्यपातळीवरील एखाद्या समन्वयक संघटनेची गरज आहे. काही वर्षांपूर्वी राज्यभरातील कलावंतांनी एकत्र येऊन गोमंतक मराठी नाट्य महासंघाची स्थापना केली होती. व्यावसायिक रंगभूमीचे नवे पर्व सुरू करण्याची स्वप्ने महासंघाचे कार्यकर्ते तेव्हा पाहत होते. पण महासंघाचे पहिलेच पाऊल चुकीचे पडले आणि त्यानंतर त्याची वाटच हरवली. कोणतीच व्यावसायिक मूल्ये नसलेली ‘तुघलक’सारखी बोजड नाट्यकृती महासंघाने निवडली आणि अवघ्याच प्रयोगांनंतर महासंघावर पडदा टाकावा लागला. गोमंतक नाट्य लेखक कलाकार संघाने मराठी नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संस्थांना एका सूत्रात गुंफण्याची जबाबदारी काही वर्षे निभावली, पण नंतर हा संघही फुटला. गोमंत विद्या निकेतन, हंस संगीत नाट्य मंडळ, ऍमेच्युअर्स ड्रॅमेटिक असोसिएशन, नवरंग स्टार्स, गोमंतक मराठी भाषा परिषद, रुद्रेश्वर युवक संघ, रुद्रेश्वर पणजी, सुयोग नाट्यदर्पण, श्रीकृष्ण सांगाती, यंग स्टार्स पर्वरी, नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य मंडळ, वरदांबिका कला संघ, सरस्वती वाचनालय वेलिंग, पार्से युवक संघ, पांडुरंग प्रासादिक नाट्य मंडळ, कला शुक्लेंदु, कला उन्मेष यांसारख्या अनेक संस्थांनी रंगभूमीची सेवा आजही चालवली आहे. त्या सर्वांना एका व्यासपीठावर आणून मराठी रंगभूमीची सशक्त चळवळ उभारणं कठीण नाही. गावागावांतील उत्सवांतून प्रयोग करणार्या छोट्या छोट्या संस्थांनाही या प्रवाहात सामील करून घेण्याची गरज आहे.
गोव्याची मुंबई न झालेली बरी!
गोव्यात व्यावसायिक रंगभूमी नाही असा निराशेचा सूर नेहमीच लावला जातो. गोमंतकीयांची मानसिकता व्यावसायिक रंगभूमीला पोषक नाही असं माझं प्रांजळ मत आहे. ख्रिश्चन बांधवांनी तियात्राची जोपासना पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून केली. असा दृष्टिकोन गोमंतकीय मराठी रंगभूमी ठेवू शकली नाही. तिकिट काढून नाटक पाहावं ते केवळ मुंबईच्या संस्थेचं, अशी गोमंतकीयांची धारणा आहे. गोव्यातले कलाकार नाटक करतात ते तिकिट काढून पाहण्याच्या लायकीचं नसतं अशी खूणगाठच आमच्या प्रेक्षकानं मनात बांधली असावी. शंभर शंभर रुपयांची तिकिटं काढून आमचा प्रेक्षक मुंबईचं नाटक बघायला जाईल. पण एखाद्या स्थानिक संस्थेनं प्रचंड परिश्रम घेऊन दर्जेदार नाट्यनिर्मिती केली असली तरी वीस रुपयांचं तिकिट घेताना त्याची घालमेल होते. सार्वजनिक गणेशोत्सवात आमची मंडळे तीस-पस्तीस हजार रुपये फेकून व्यावसायिक नाटकं आणतात. पंधरा-वीस हजारांची उधळपट्टी करून ऑर्केस्ट्रा ठेवतात. पण इथल्या संस्थांचे उत्तमोत्तम प्रयोगही आठ-दहा हजाराच्या आत करण्याचा त्यांचा आग्रह असतो. ही वृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत व्यावसायिक रंगभूमीची बीजं रुजणं कठीण आहे. गोव्याची मुंबई झाली तर हे शक्य होईल, पण आपलं गोंयकारपण टिकवून ठेवण्यासाठी गोव्याची मुंबई कधीच होऊ नये अशीच माझी प्रार्थना असेल. व्यावसायिक रंगभूमीचा परिघ सध्या खूपच मर्यादित आहे. एखादी नामवंत संस्था वर्षाला एखादं नाटक बसवते आणि आठ-दहा हजारांच्या मोबदल्यात देवस्थानातील उत्सवांची निमंत्रणं स्वीकारते. गावातील नाट्यमंडळं हळूहळू मोडीत निघू लागल्यामुळे देवस्थान समित्यांना अशी ‘तयार’ नाटकं हवीच असतात. सादरकर्त्या संस्थांना यातून फारसा लाभही होत नाही. नेपथ्य, प्रवास, ध्वनियंत्रणा यांवरच तीन-चार हजारांचा चुराडा होतो. आठ-दहा कलाकार नाटकात असले तर एकेकट्याच्या वाट्याला जेमतेम शंभर रुपयांचं मानधन येतं. अशी आहे आमची तथाकथित व्यावसायिक(!) रंगभूमी!
संख्या वाढली, पण दर्जा कुठं आहे?
बरं, अशाप्रकारे सादर होणार्या नाटकांमुळे रंगभूमीचा दर्जा सुधारायला मदत होते का? तर तीही नाही. यातली बहुतेक नाटकं फार्सिकस धाटणीची असतात. त्यातही बेडरूम फार्सना अधिक प्राधान्य. उच्च कलात्मक दर्जाची नाटकं अभावानंच होतात. गोमंत संगीत संघानं ‘सौभद्र’सारखं अभिजात नाटक गोव्याच्या खेडोपाडी नेलं. रसिकांनी त्याना चांगली दाद दिली. हल्लीच कला शुक्लेंदुनं ‘महानिर्वाण’सारखं वैचारिक नाटक त्याची धाटणी बदलून लोकप्रिय बनवलं आहे. रुद्रेश्वरनं माझ्या ‘तुका अभंग अभंग’चे अनेक प्रयोग केले आहेत. पण अशी नाटकं अपवादात्मकच असतील. एरवी सरसकटपणे ‘घोळात घोळ’, ‘लफड्यात पाय’, ‘देखणी बायको दुसर्याची’ अशाच थाटाचे प्रयोग होत असतात. दोन तास करमणूक एवढाच या नाटकांचा हेतू. तंत्र, अभिनयाच्या दृष्टीनं सगळा ठणठणाटच. अशी चटपटीत नाटकं आज लोकांना हवीहवीशी वाटतायत. हे आपल्या ढासळत चाललेल्या अभिरुचीचं द्योतक आहे.
नव्या प्रयोगाचं स्वागत होण्याची गरज
यझशेश्रिश सशीं ींहश र्ॠेींशीपाशपीं ींहशू वशीर्शीींश’ अशी एक इंगजी म्हण आहे. लोकांना त्यांच्या लायकीनुसार राज्यकर्ते प्राप्त होतात असा तिचा अर्थ. याच म्हणीत थोडा फेरफार करून म्हणता येईल की झशेश्रिश सशीं ींहश ींहशरींीश ींहशू वशीर्शीींश. भोवतालचा समाज जसा असेल, त्याच पातळीवर त्या समाजाची रंगभूमी राहील. समाज सेवाव्रती होता तेव्हा रंगभूमीही सेवाव्रतीच होती. लोकमानस अभिरूचीसंपन्न असते तेव्हा रंगभूमीही तशीच बनते. याउलट समाजात थिल्लरपणा माजतो, आदर्शांचे दीपस्तंभ कोलमडून पडतात तेव्हा रंगभूमीलाही अवकळा प्राप्त होते. आपल्या सभोवताली आज थिल्लरपणा माजला आहे. ‘स्वान्तसुखाय’ जगण्याची प्रवृत्ती वाढते आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर्वत्र बजबजपुरी माजलेली असताना कुठूनसुद्धा निषेधाचा, संघर्षाचा सूर ऐकू येत नाही. त्यामुळे आपलं नाटकसुद्धा आज कणाहीन व शामळू बनत चाललंय. कलेमध्ये रंजकता जरूर असावी, पण रंजन हाच तिचा एकमेव हेतू ठरू नये. गोवा पारतंत्र्यात होता तेव्हा सखाराम बर्वेनी ‘जळता गोमंतक’ लिहिलं. रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांनी दीपाजी राणेंची शौर्यगाथा नाटकातून मांडली. त्याकाळी हे प्रयोग तसे नवेच होते. पण त्यांचं स्वागत रसिकांनी केलंच ना? मग आजच आम्ही का म्हणून असे चेतनाहीन व निस्तेज झालो आहोत? प्रतिभेच्या स्फुल्लिंगांचं दर्शन आज दुर्मीळ का बनलंय? कला अकादमीच्या स्पर्धांतून सादर होणार्या नाटकांचाही आता एक साचा बनून गेला आहे. ही बंदिस्त तटबंदी भेदणारे लेखक-दिग्दर्शक कुठं गडप झाले आहेत? ‘आधे-अधुरे’, ‘अंधा युग’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हीच नाटके पुन्हा पुन्हा का केली जातात? सप्तपुत्तुलिका, मायाळू, सुतक यांसारखी कठीण नाटकं ताकदीनं अविष्कृत करणारा अवधूत कामत अभावानंच का दिसतो? अभिनय आणि तंत्र यांचा सुरेख मिलाफ व्हायलाच हवा असा आग्रह धरणारा किशोर बोरकरांच्या तोडीचा द्रष्टा दिग्दर्शक आज कुठं बघायला मिळतोय?
प्रयोगशीलता हा रंगभूमीचा प्राण आहे. प्रयोगशीलता संपते तिथं नाटक मरतं. अकादमीच्या स्पर्धेत आता बर्याच संस्था फार्स करण्यावर भर देऊ लागल्या आहेत. काही संस्थांनी केवळ एन.एस.डी. च्या पठडीतही नाटकं करण्यात धन्यता मानली आहे. या स्पर्धांनी आता खास आपला प्रेक्षकवर्ग तयार केल्यामुळे प्रयोगशीलतेला सतत नवनवीन धुमारे फुटत रहाण्याची गरज असते. नाहीतर प्रेक्षक एका जागीच थांबतो. नाट्यकलेचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले तरुण रंगकर्मी माझं हे आवाहन ऐकतील अशी माझी अपेक्षा आहे.
संगीत रंगभूमी जगली पाहिजे
प्रयोगशीलता खुंटली की कला कोमेजते याचं उत्तम उदाहरण म्हणजे संगीत रंगभूमीचा र्हास. एकेकाळी संगीताने रंगभूमी गाजवली. पण नंतर संगीताचाही अतिरेकी झाला आणि रंगभूमीला अवकळा आली. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, गडकरी यांच्या युगाचा अस्त झाला. रंगभूमीला मरणकळा लागली. तेव्हा मो. ग. रांगणेकर, भा. वि. वरेरकर, आचार्य अत्रे, विद्याधर गोखले, पुरुषोत्तम दारव्हेकर इत्यादी नाटककारांनी नव्या तंत्राचा, नव्या रूपाचा अवलंब केला. कानेटकर व शिरवाडकरांनी संगीत नाटकाला आपल्या भाषेचा बाज चढवला. पं. जितेंद्र अभिषेकींसारख्या कल्पक संगीत-दिग्दर्शकामुळे रंगभूमीलाही ऊर्जितावस्था आली. पण आता पुन्हा एकदा एक असह्य पोकळी जाणवू लागली आहे. थिल्लर फिल्मसंगीताच्या वेडानं झपाटलेली तरुण पिढी भविष्यकाळात संगीत रंगभूमीकडे वळेल का हा प्रश्न मनाला अस्वस्थ करतो. संगीत रंगभूमी येणार्या काही वर्षांत केवळ आपल्या दिवाणखान्यातला एक ‘अँटीक पीस’ होऊन कोनाड्यात तर पडणार नाही ना? या आशंकेचं झाकोळ आज रंगमंचाला वेढून टाकू लागलंय. पूर्वीची संगीत नाटकं आज पुन्हा निर्माण होऊ शकणार नाहीत. पण बदलत्या काळाला अनुरूप अशा नव्या संगीतानं नटलेलं नाटक अवतीर्ण व्हावं ही माझी अंतरींची इच्छा आहे. असा एखादा प्रयोग गोव्याच्या भूमीत घडून आला तर संगीत नाटकाना नवं वळण देणार्या पं. अभिषेकीबुवांना ती सार्थ श्रद्धांजली ठरेल. (क्रमशः)

