गोव्यातील जत्रा ः उत्साहाची पर्वणी

0
76
  • पौर्णिमा केरकर

अंत्रुज महालातील मडकई व बोरीच्या नवदुर्गेच्या जत्रांद्वारे गोव्यातील जत्रांच्या मौसमाला प्रारंभ होतो. त्यानंतर गावोगावी जत्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचतो. गावागावांतील छोट्या-मोठ्या मंदिरातील जत्रा कालो, दशावतारी नाटकांनी समृद्ध होते.

मानवी मन हे उत्सवप्रिय मन आहे. त्यातही जत्रा म्हटली की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच मनात उत्साह संचारतो. गेले दीड वर्ष महामारीने ग्रस्त समाजमन घरात बसून बसून अगदीच मरगळल्यासारखे झाले होते. जत्रोत्सवासारख्या सामूहिक उत्सवात सहभागी होण्यावर आलेली बंधने पाहता हे सर्व साहजिकच होते.

यावर्षी मात्र नव्या उमेदीने गावागावांतील जत्रोत्सव साजरे करण्यात आले. बदललेल्या परिस्थितीची चाहूल येथे लागली असली तरीही आपल्या लोकदैवतावरील श्रद्धा या महामारीच्या कालखंडात त्यांना तारणारी ठरली. आपल्या संस्कृतीत असे अनेक सणउत्सव आहेत जे दिव्यांशी जोडले गेलेले आहेत. चातुर्मासाची समाप्ती झाल्यावर शेषशायी विष्णू जागृत होतात. देवतत्वाच्या चैतन्यमयी स्वरूपाच्या स्वागतासाठीच जणुकाही कार्तिक मास पूर्णपणे दीपप्रज्वलनाने उजळून गेलेला असतो. ग्रामीण कष्टकरी जीवाचे या महिन्याचे खास आकर्षण म्हणजेच दिवजोत्सव! दिवज मातीपासून तयार केलेला दीप. याच दीपाचे विलोभनीय रूप कार्तिक मासात घराघरांतून जाणवते. दिव्यांच्या साक्षीने सर्वांचा आनंद ओसंडून वाहत असतानाच दिवजांच्या वैविध्यपूर्ण जत्रा आगळ्यावेगळ्या वैशिट्यांसह गोव्यातील विविध गावात अभूतपूर्व आनंदात साजर्‍या केलेल्या दिसतात. या जत्रांसाठी सुवासिनी खास उपवास करतात. काही ठिकाणी नवीन लग्न झालेले जोडपे उपवास करते. पूर्वी मातीपासून तयार केलेली दिवजा घेऊनच दिवजांच्या जत्रा साजर्‍या केल्या जायच्या.

डिचोलीतील मये गावाची माल्याची जत्रा, शिमगोत्सवात येणारी काणकोण गावडोंगरीची दिंड्या जत्रा, लोलयेची महामाया कुडतरकरणीची दिवजा जत्रा, सत्तरीतील कोपार्डे गावची ब्राह्मणी मायेची दिवज जत्रा, चोपडे, पालये तसेच इतरही अनेक गावात दिवजांच्या जत्रा होतात. हातात किंवा डोक्यावर पेटलेले दिवज घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतानाचे दृश्य स्वर्गीय भासते. या जत्रेसाठी कडक उपवास ठेवला जातो. पेटलेले रसरशीत इंगळे न्हाण्याची परंपरासुद्धा दिवजोत्सवात दिसते. मयेची माल्याची जत्रा खूप प्रसिद्ध असलेली जत्रा असून ‘दिवज’ हे ‘माले’ म्हणून लोकमनात प्रचलित आहे. जत्रेच्या दिवशी हेच माले प्रज्वलित करून ते डोक्यावर ठेवून नाचवले जातात. मातीपासून दिवज तयार करण्याचे कसब कुंभार समाजाचे. त्या प्रतीची कृतज्ञता म्हणून की काय या जत्रेत कुंभार समाजातील भाविकाला हा सन्मान प्राप्त होतो. माल्याच्या जत्रेमधील पेटते मोठे दिवज हेच खास आकर्षण. ते तयार करण्यासाठी कुंभार समाज खास पथ्य पाळतो. दिवज करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो त्यावेळात दिवज करण्यार्‍या कारागिराला एकवेळच जेवण घ्यायचे असते.
काणकोणची दिंड्या जत्रा अशीच आगळीवेगळी. शिगमोत्सवाच्या कालावधीत इथे मलकाजणाच्या सांनिध्यात दिंड्या जत्रा होते. त्यावेळी लग्न न झालेली पुरुष मंडळी हातात दिण्याची काठी घेऊन, तर कुमारी मुली दिवज घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात. दिवज पेटविण्यासाठीचे साहित्य त्या कुमारिका मुलींना त्यांच्या मामाकडून मिळालेले असते. आदिवासी समाजातील प्रत्येक मुलीने लग्नापूर्वी हाती दिवज घेऊन मंदिर प्रदक्षिणा केल्यावरच त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होतो असा येथे रिवाज आहे. याच तालुक्यातील लोलये महामाया कुडतरकरणीची दिवज जत्रा जेथे मातीच्या दिवजांचा वापर न करता त्या जागेवर निवडुंगाचा वापर केला जातो.

कोपर्डेच्या ब्राह्मणी मायेचे जागृत देवस्थान देवराईत वसलेले आहे. विविध औषधी वनस्पतींच्या गुणधर्माने युक्त असलेली ही जागा या जागेतील बारामाही वाहणार्‍या झर्‍यामुळे लोकमनात अढळ स्थान प्राप्त करून आहे. या झर्‍याचे पाणी प्राशन केल्याने, त्या पाण्याने आंघोळ करण्याने सर्व प्रकारचे चर्मरोग नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे. याच श्रद्धेने चर्मरोगाने पीडित असंख्य भक्तगण इथे येतात, या निसर्गरम्य परिसरात मोकळेपणाने मनस्वी श्रद्धेने राहतात, प्रचिती आली की नवस फेडून विश्वासाने आपआपल्या घरी निघून जातात. कार्तिकातील अमावस्येच्या पाडव्याला ही जत्रा होते. सुवासिनी उपवास धरून दारातील तुळशीवृंदावनासमोर दिवज पेटवितात. घरातील दिवंगत सुवासिनीच्या नावाने दिवज पेटविले जाते. त्यानंतर सर्वजणी आपापले दिवज घेऊन मंदिरात जाऊन बसतात. दिवजात तेल ओतीत संपूर्ण रात्र जागवून पहाटे पहाटे मंदिराला प्रदक्षिणा घालून व्रताची सांगता केली जाते. सर्व भाविकांना शिजवलेल्या भाताचा प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद करण्याची एक खास परंपरा आहे. मानकरी या दिवशी उकड्या आणि सुरय तांदळापासून भात शिजवतात. त्या भाताची रास करून मंदिरात ठेवली जाते. रात्रीच्या वेळी नागीण रूपातील देवी ब्राह्मणी माया त्या भाताच्या राशीवरून फिरते व भक्तगणांना आशीर्वाद देते असा संकेत आहे. हा प्रसाद गावाबरोबरीनेच दूरदूरच्या नातेवाईक, मित्रमंडळींनाही पोहोचविला जातो. वर्षभरासाठी आशीर्वाद म्हणून राखूनही ठेवला जातो.

गोव्यात वर्षभर ठिकठिकाणी जत्रोत्सव उत्साहात संपन्न होतात.
अंत्रुज महालातील मडकई व बोरीच्या नवदुर्गेच्या जत्रांद्वारे गोव्यातील जत्रांच्या मौसमाला प्रारंभ होतो. त्यानंतर गावोगावी जत्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचतो. गावागावांतील छोट्या-मोठ्या मंदिरातील जत्रा कालो, दशावतारी नाटकांनी समृद्ध होते. पाहुणे मंडळी, लग्न करून दिलेल्या मुलींनी, छोट्या मंडळींनी घरे अगदी उत्साहाने उतू जात असतात. पूर्वी पावसाळ्यानंतर वायंगणी शेती केली जात असे. जत्रा सुरू होण्यापूर्वी भात पिकून तयार झालेले असायचे. घरात धनधान्यरुपी आलेली सुबत्ता तृप्तता द्यायची. त्यातूनच जत्रेत गावठी सुरय तांदळाच्या पिठापासून तयार केलेली सान्ना, शिरवळ्यो, फुगीचे पोळे हे जत्रांचे खास आकर्षण होते. माहेरवाशीण मुलींना मंदिरात जाऊन ओटी भरण्याची घाई तर लहान मुलांना जत्रेतील खेळण्यांचे आणि मुलींना तर रिबिनी, नेलपॉलिशचे आकर्षण ठरलेलेच होते. पाया पडून, मनसोक्त खरेदी केली की लहानगी अगोदरच दशावतारी नाटकासाठी अडवून ठेवलेल्या चटईवर झोपून जायची. जुनीजाणती काचेच्या ग्लासमधील चहा आणि गरमागरम भजी यांचाच आस्वाद घेण्यात मग्न, ती तर जागीच असायची कालो आणि नाटकासाठी. रेड्यांची जत्रा, कावळ्यांची जत्रा, गड्यांची जत्रा, टक्यांची जत्रा, मालनी पुनवेची जत्रा, पेठेची जत्रा, माशांची जत्रा, आजोबाची जत्रा, बोडगिणीची जत्रा, जायाची जत्रा अशा कितीतरी जत्रा गोमंतकीय लोकमनाच्या उत्सवप्रिय जीवनाची जाणीव करून देतात.

जत्रोत्सवातील अभूतपूर्व उत्साहाची पर्वणी आणि सर्व लहानमोठ्या जत्रोत्सवांवर कळस म्हणजे शिरगावच्या लइराईची जत्रा. वैशाख शुक्ल पंचमी म्हणजे लइराईच्या जत्रोत्सवाचा दिवस. भात पिकांची सुबत्ता घरात आलेली असता ही जत्रा येते. लहानमोठ्या जत्रा सर्वत्र होतात. त्या जत्रांना गर्दी असली तरी बर्‍याच ठिकाणी जातिभेद पाळले जातात, मात्र लईराइच्या जत्रेत या सर्व मर्यादा, भेदाभेद गळून पडतात. ही जत्रा सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत उदाहरण बनून समोर येते. रसरशीत इंगळ्यावरून अनवाणी पायांनी चालून, धावून स्वतःच्या निराहार व्रतस्थपणाचा पुरावा देत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच सहभागी होत श्रद्धाभक्तीचा उत्कट आविष्कार प्रकट करतात.

शिरगावची लईराइच्या आणि म्हापशाची अवर लेडी ऑफ मिलाग्रीस यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. मीराबाई म्हणजे मिलाग्रीसच्या फेस्ताच्या दिवशी शिरगावहून अबोलीचे गजरे पाठविले जायचे. तर लइराईच्या जत्रेला मोगरीच्या कळ्यांच्या माळा पाठविल्या जायच्या. लइराईला मोगर्‍या कळ्यांचे भारी वेड. ही धोंडांची जत्रा. देवीचे हे भक्तगण निखार्‍यावरून चालताना गळ्यात मोगरी कळ्यांची माळा परिधान केल्याशिवाय इंगळ्यावरून धावणार नाहीत. देवीवरील अफाट श्रद्धेपोटीच लोकसमूह भारावलेल्या अवस्थेत निखार्‍यावरून धावतात.

नवदुर्गेच्या जत्रेने गोव्यातील जत्रांची सुरुवात होते तर हा शिगेला पोहोचलेला उत्साह लईराइच्या जत्रेतील अभूतपूर्व सहभागाने जत्रांचा हा मौसम समाप्त होतो.