गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी केंद्राने पावले उचलावीत ः राज्यपाल

0
177

>> अमित शहांना लिहिलेल्या पत्रात विनंती

 

राज्यातील एक प्रमुख उद्योग असलेल्या खाण उद्योगापाठोपाठ आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दुसरा प्रमुख असलेला पर्यटन उद्योगही बंद पडल्याने गोव्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी केंद्राने पावली उचलावीत अशी विनंती गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका पत्राद्वारे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

राज्यातील खाण उद्योग बंद पडल्यामुळे राज्याला २ हजार कोटी रुपये एवढ्या महसुलाला मुकावे लागत असून या बंदीचा फटका खाण उद्योगावर अवलंबून असलेल्या दीड लाखांपेक्षा जास्त असलेल्या लोकांना बसला असल्याचे दि. २८ एप्रिल रोजी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

आता कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पर्यटन व्यवसायही पूर्णपणे बंद पडलेला असून त्यामुळे राज्याची आर्तिक स्थिती अत्यंत कठीण असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती दयनीय बनल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परमल राय यांची राजभवनावर भेट घेतली होती. त्यावेळी बंद पडलेला खाण उद्योग सुरू करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेतच कायदा करून त्याबाबत तोडगा काढायला हवा. याबाबत मुख्यमंत्री, मुख्यसचिव व आपले एकमत झाल्याचे राज्यपाल मलिक यांनी शहा यांना लिहिलेल्या या पत्रात नमूद केले आहे.