गोव्यातील समुद्र हद्दीत येऊन ‘बुल ट्रॉलिंग’ पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परराज्यांतील मच्छिमारी बोटींवर आता ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जात असल्याची माहिती काल मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत दिली. तसेच या बोटी ताब्यात घेण्यासाठी किनारी पोलिसांची मदत घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी एका उपप्रश्नावर दिली.
काल प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांसह शेजारच्या अन्य राज्यांतील मच्छिमारी बोटी गोव्यात येऊन गोव्यातील समुद्र हद्दीत बुल ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करीत असतात. परिणामी गोव्याच्या समुद्र हद्दीतील मत्स्यसंपदेवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे रेजिनाल्ड यांनी सांगितले. गोव्याच्या समुद्र हद्दीत येऊन बुल ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणाऱ्या परराज्यातील मच्छिमारी जहाजांवर कारवाईत गोव्याला अपयश येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र, हा आरोप फेटाळून लावताना मंत्री नीळकंठ हळर्णकर हे म्हणाले की, आता परराज्यांतून येणाऱ्या अशा बोटींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याने अशा बोटी गोव्याच्या हद्दीत येताच खात्यातील अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बसलेल्या ठिकाणी या बोटींची माहिती मिळत असते. त्यामुळे अशा बोटींवर तात्काळ कारवाई करता येते.
बोटी आल्याचे कळल्यावर तुम्ही त्या ताब्यात कशा घेता आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करता, असा प्रश्न यावेळी रेजिनाल्ड यांनी उपस्थित केला. त्याचे उत्तर देताना हळर्णकर म्हणाले की, त्यासाठी खात्यातील लोकांसह किनारी पोलिसांचीही मदत घेण्यात येत असते. आणि बोट ताब्यात घेतल्यानंतर बोटीतील मासळीचा लिलाव करण्यात येतो. लिलावातून जेवढे पैसे मिळतात, त्यांच्या पाचपट दंड या बोटमालकाला ठोठावण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोटीवरील मच्छिमारांना ताब्यात घेऊन तुरुंगात टाकण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

