पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारने सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाची दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विट संदेशाद्वारे गोवा सरकारच्या सौर ऊर्जेचा वापर आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हाती घेतलेल्या नवीन उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गेल्या 31 मार्च 2023 रोजी सोलर रूफटॉप वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारने शाश्वत विकास आणि सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला वेब पोर्टल हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
हे पोर्टल गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने बनवले असून त्यासाठी नवीन आणि अक्षय ऊर्जा आणि वीज खात्याने सहकार्य केले आहे. हे पोर्टल ज्या नागरिकांना रूफटॉप सोलर बसवून वीज निर्मिती करायची आहे. त्यांच्यासाठी उपयोगी आणि लाभदायी ठरणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी दोन वर्षात पणजी शहर स्मार्ट सिटीबरोबर सोलर सिटी बनविण्यात येणार आहे, अशी घोषणा केलेली आहे. पणजी शहरात सौर ऊर्जा निर्मितीवर भर दिला जाणार आहे. सरकारी इमारतीसह लोकांना घरांवर सोलर पॅनल बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. पणजी शहरामध्ये सौर ऊर्जेद्वारे सुमारे 80 मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर केलेले आहे.