गोव्याच्या लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

0
120

अडवाणी, अभिताभ, दिलीपकुमारना पद्मविभूषण
देशाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. गोव्याच्या डॉ. लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांनाही यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.विविध क्षेत्रातील अन्य नामवंतांपैकी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, दिलीपकुमार आदींचाही पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समावेश आहे. या तिघांनाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी एकूण १०४ जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. त्यात ७५ जणांना पद्मश्री, २० जणांना पद्मभूषण व ९ जणांना पद्म विभूषण जाहीर झाला आहे. गोव्याच्या डॉ. लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांना त्यांच्या साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती भवनात लवकरच होणार्‍या एका सोहळ्यात मास्कारेन्हास यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. राज्यातील अग्रणी इंग्रजी दैनिक नवहिंद टाईम्सचे पहिले संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. अलीकडेच त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला होता. पद्मभूषण जाहीर झालेल्यांमध्ये डॉ. विजय भाटकर (विज्ञान व अभियांत्रिक) यांचा समावेश आहे. गतकाळातील दिग्गज चित्रपट अभिनेते स्व. प्राण यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.