गोव्याच्या गावांतील पावसाळी पर्यटन

0
5
  • पौर्णिमा केरकर

पावसात गोव्याच्या खेड्यापाड्यांत फिरलो तर इथल्या ग्रामीण परिसराचे एक वेगळेच दर्शन घडते. एखाद्या प्रदेशाची ओळख होते ती तेथील नैसर्गिक वैभवशाली वारशामुळे. माणसांच्या मोकळ्या स्वभावामुळे आणि एकंदरीत सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक संचितामुळे. गोव्याच्या बाराही तालुक्यांना हे असे संचित लाभलेले आहे. त्यात जर पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटन करायचे असेल तर त्यासाठी सत्तरी, सांगे, काणकोण, धारबांदोडासारख्या तालुक्यांतील ग्रामीण भागांना आणि निसर्गरम्य परिसराला भेट द्यायलाच हवी!

प्रवास नेहमीच मानवी मनाला खुणावत आलेला आहे. प्राचीन काळात प्रवासाची कोणतीही साधने नसताना देशोदेशीच्या पर्यटकांनी चालत प्रवास केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. प्रवास त्यांच्या नसानसांत भिनला होता. आपल्या प्रवासाच्या नोंदीही त्यांनी नमूद करून ठेवल्या. त्यातून एका सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्ताऐवजाची निर्मिती झाली. कितीही प्रवास केला तरी तो संपता संपत नसतो. अलीकडे जीवनशैली धावपळीची झालेली आहे. त्यामुळे फिरण्याची आवड असली तरीदेखील सवड मिळणे मुश्कील होऊन जाते. असे असले तरी प्रवासाची तीव्रता कमी झालेली नाही, किंबहुना तिच्यात अधिक चोखंदळपणा आलेला आहे. पावसाळी पर्यटन ही संकल्पना तर अलीकडे अधिकाधिक लोकांच्या पसंतीस पडू लागली आहे. गोवा म्हटला की नजरेसमोर येतो तो अथांग पसरलेला अमर्याद अरबी सागर आणि आकाशाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा.

वैविध्यपूर्ण बांधणी असलेली चर्च आणि मंदिरे, अन्‌‍ वर्षाचे बाराही महिने परिसराला सळसळते चैतन्य बहाल करणारी कुळागरे…! ऋतुमानानुसार आपला सभोवताल सतत बदलत असतो. या बदलात त्या-त्या परिसराचे सौंदर्य अनुभवणे ही एक अनोखी पर्वणी असते. पावसाळ्यात केलेले पर्यटन तर निसर्गाच्या भव्यदिव्यतेचे दर्शन घडविते. गोव्यात अशा बऱ्याच जागा आहेत जिथे संवेदनशील मने सजगतेने या अशा सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतात. गोव्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षण वाटते ते उसळत्या लाटांचे,सागरकिनाऱ्यांचे. म्हणूनच दिवाळीनंतर पर्यटकांची पावले वळतात ती उधाणलेल्या समुद्राकडेच. या कालखंडात शांत, संयत असलेले त्याचे रूप पावसाळ्यात मात्र रौद्रभीषण होते. त्याला तसे अनुभवणे हेसुद्धा एक लावण्य असते. सागराच्या धीरगंभीर, तेवढ्याच भीषण रूपाचा आस्वाद घेताना मनाची स्थिरता महत्त्वाची. सौंदर्याची अनुभूती घेण्याची ओढ एवढी तीव्र असते की तिथला आनंद लुटताना देहभान विसरायला होते. परिणामी जीवावर बेतण्याची स्थिती निर्माण होते. अशावेळी सावध होऊन पर्यटक लाटांची गाज आणि सागराचे आगळेवेगळे रूप डोळ्यात साठवू शकतात.

पावसात गोव्याच्या खेड्यापाड्यांत फिरलो तर इथल्या ग्रामीण परिसराचे एक वेगळेच दर्शन घडते. एखाद्या प्रदेशाची ओळख होते ती तेथील नैसर्गिक वैभवशाली वारशामुळे. माणसांच्या मोकळ्या स्वभावामुळे आणि एकंदरीत सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक संचितामुळे. गोव्याच्या बाराही तालुक्यांना हे असे संचित लाभलेले आहे. त्यात जर पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटन करायचे असेल तर त्यासाठी सत्तरी, सांगे, काणकोण, धारबांदोडासारख्या तालुक्यांतील ग्रामीण भागांना आणि निसर्गरम्य परिसराला भेट द्यायलाच हवी! सत्तरी तालुक्यातील सुर्ल गाव हे गोव्याचे माथेरान म्हणून संबोधले जाते. समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर स्थित असलेला हा गाव तसा लहान. मातीच्या भिंतींची छोटी-छोटी कौलारू घरे. वर्षाचे बाराही महिने थंड हवामान. प्रत्येक घरात परसो (शेकोटी) धगधगायची. तिन्हीसांजेला गावात प्रवेश केला की तव्यावर खरपूस भाजलेल्या नाचणीच्या भाकरीचा खमंग वास यायचा. सर्वत्र दाट धुके… धूरकट सुगंध सर्वत्र पसरलेला. गुडूप अंधारात सर्वत्र शांतता पसरायची. एखाद दुसऱ्या घरात लहान मूल रडण्याचा आवाज यायचा. गाव जागा असल्याची ती खूण होती. या गावात ज्यांनी माणसं जोडून ठेवली, त्या घरात भाकरी खाऊन पर्यटकांची पावले वळायची ती पायकाच्या विस्तीर्ण पसरलेल्या सड्यावर. सुर्ला गावचे हे चित्र आहे जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीचे. आता गाव बदलला आहे, मात्र पायकाच्या सड्याने आपले सौंदर्य आजही राखून ठेवले आहे. हा सडा पावसात चिंब भिजून अनुभवायचा. सर्वत्र छोटीमोठी कातळे… जागोजागी छोटी-छोटी पाण्याने भरलेली डबकी… त्यांत सभोवतालच्या हिरवाईचे, आभाळाचे प्रतिबिंब पडलेले… झुबक्या झुबक्यांनी. आणि जिथे माती मिळेल तिथे उगवलेले गवत. चतुर्थीच्या आगेमागे तर हा सडा रंगीबेरंगी रानफुलांनी सजतो. तिथे जवळच असलेली नैसर्गिक गुंफा अभ्यासकांचे, संशोधकांचे लक्ष वेधून घेते. सड्याच्या टोकाला उभे राहून दरीत न्याहाळताना पलीकडे धो-धो कोसळणाऱ्या लाडकेच्या वझराचा विहंगम नजारा दिसतो. हा धबधबा धुक्याचा पदर ओढून घेत जणू काही आपालीपाचा खेळ खेळत असतो. चोरला, कणकुंभी, सुर्ला, मान, हुळंद आणि पारवाड ही कर्नाटक राज्यातील गावे. या गावांचे पावसाळ्यातील पाणी कळसा नदीच्या विविध प्रवाहांद्वारे एकत्रित येऊन बाराजण धबधबा व पुढे लाडकेच्या वझराद्वारे प्रवाहित होतो. भर पावसात या धबधब्यांचा अनुभव घेणे हे निसर्गाच्या अतितरल भव्यतम रूपाचा साक्षात्कार घडण्यासारखेच आहे. पावसाचा स्पर्श धरित्रीला
झाला रे झाला की पठार सजिवंत होतो. विविध प्रकारचे नेचे, आमरी पुष्प, सीतेची-द्रौपदीची वेणीसारखी ऑर्किड, सरपटणारे प्राणी, जीवजंतू, अस्वले, गवेरेडे यांचे एक अनोखे विश्व निसर्गप्रेमी संशोधकांना खुणावत असते.

जून ते ऑगस्ट या कालावधीत दृष्टीस पडणारे मलाबार ग्लायडिंग फ्रॉग म्हणजे हवेत विहरणारे बेडूक या परिसराची शान आहे. तळवाचा सडा हा गोवा व कर्नाटक राज्यांच्या जैवविविधतेच्या वैभवात मानाचा तुराच मनावा लागेल. मॉन्सूनच्या धुवांधार कोसळणाऱ्या पावसाचे पाणी सर्व बाजूंनी अनिर्बंध प्रवाहित होते. वाहताना जागोजागी असलेल्या खोल भागात साठून राहाते. तळवाचा सडा अशा असंख्य छोट्या-मोठ्या तळ्यांनी भरलेला आहे. शब्दांत वर्णन करण्यापलीकडचे विलोभनीय असे या सड्याचे सौंदर्य पावसाळ्यात खुलून येते. सडा म्हटले की मनात कोरडेपणा, रुक्ष अशा परिसराचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते. इथे तर सौंदर्याचा आगळावेगळा आविष्कार अनुभवायला मिळतो. पट्टेरी वाघ, बिबटे, मलाबार पिट वायपर, बांबू पिट वायपर, तरस, भेकर आणि अपोनोजेटी, नटेशीसारख्या दुर्मीळ वनस्पतींनी हा पठार जिवंत होऊन उठतो. पूर्वी सुर्ला गावातील लोक इथल्या तलावातील माती गणपतीची मूर्ती घडविण्यासाठी वापरत असत. त्याचबरोबर या परिसरात असलेल्या दुडंग वृक्षाच्या लाकडापासून रामायण- महाभारतकालीन लाकडी मूर्ती घडवून त्या गणेशमूर्तीच्या शेजारी पूजेला लावायची परंपरा होती. गोव्यातील सत्तरी तालुक्याला जोडून असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात भर पावसाळ्यात पन्नासपेक्षाही अधिक धबधबे धबाधबा कोसळत असतात.

सांगे तालुक्यातील नेत्रावळीच्या परिसरात पावसाळ्यात जायचे ते येथील उंचच उंच घनदाट वृक्षवेलींनी भरलेल्या देवराया अनुभवण्यासाठीच! देवाच्या नावाने हे राखून ठेवलेले पवित्र जंगल. वेर्ले गाव त्यासाठी महत्त्वाचा. भुईपान्न, जैतापान्न यांचे सौंदर्य पावसाळ्यात खुलते. नेत्रावळीतील मैना पी, सावरीचा- काणकोणचा बामणबुडो हे धबधबे पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतात. तांबडी सुर्लाचे रगाडो नदीच्या काठावर असलेले मंदिर म्हणजे हिरव्या कोंदणातील काळ्या पाषाणात कोरलेले आध्यात्मिक संचित. सर्व ऋतूंत या मंदिराचे लावण्य खुलत असते. पावसाळ्यात, खासकरून श्रावण महिन्यात तर त्याला भक्ती-प्रीतीचे अद्वैत प्राप्त होते. दुथडी भरून वाहणाऱ्या रगाडो नदीच्या प्रवाहाच्या आवाजानेच हृदयात धडकी भरते. तरीही या नदीचे पावसाळ्यातील अल्लड, खोडकर, प्रसंगी रौद्ररूप अनुभवल्याशिवाय मंदिरापर्यंत पोहोचताच येत नाही. हे मंदिर चोहोबाजूंनी जंगलाने वेढलेले आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने झाडन्‌‍ झाड ओथंबून गेलंय. नदीचा, पावसाचा, जंगलाचा आवाज एकरूप झालाय आणि आपण मंदिराच्या छोट्या कोंदणात बसून अध्यात्म आणि निसर्ग यांच्या अद्वैताची अनुभूती घेत आहोत…
पावसाळ्यात न चुकता भेट द्यायची ती सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या छोट्या-छोट्या गावांना. त्यांनाही आता शहराची ओढ लागली आहे हे अगदी खरे असले तरी त्यांनी गावपण अजूनही राखून ठेवलेले आहे. वाफाळलेला कोरा चहा आणि कुरकुरीत कांदा भजी, कौलांनी आच्छादन केलेले लहानसेच चहाचे दुकान व ती माणसांची आपुलकीची ऊब पुरेशी असते. हिरवेगार शेतमळे, त्यांत राबणारी माणसे… अनोळखी कोणी गावात आले तरी त्यांना हटकणारे चेहरे… हे चित्र पाहणेसुद्धा नेत्रसुख देते.
पावसाळ्यात नदी, नाले, ओहोळ, विहिरी दुथडी भरून वाहतात. जून महिन्याच्या 24 तारीखला ख्रिश्चनांचा सांजाव भर पावसात साजरा होतो. येथे तवशाचे, कणसाचे, पातोळेचे फेस्त यांचा आनंद लुटता येतो. सांस्कृतिक पर्यटनाचे वेगळे अंग त्यानिमित्ताने बघता येते.

पावसात धारित्रीला जणूकाही पान्हाच फुटतो. छोटे-मोठे जलप्रपात सर्वच तालुक्यांत आहेत. सोयीची वेळ ठरवून, सौंदर्याची नजर बाळगून त्यांचा आपणास आस्वाद घेता येतो. पावसाळ्यात गोव्याच्या ग्रामीण भागांना भेटी दिल्या तर भावनिक ओलाव्याची ऊब प्राप्त होते. काही वर्षांपूर्वी सांगे, धारबांदोडा परिसरात खाणींचे प्राबल्य होते. त्यावेळी निसर्ग मातीमोल झाला होता. आज खाणी बंद असल्याने चित्र पालटले आहे.

अलीकडे लोक मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतात. अर्ध्या कपड्यांनी, हातात दारूच्या बाटल्या घेऊन भर रस्त्यात नंगानाच करतात. धबधब्याच्या ठिकाणीच दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक कचऱ्याचा ढीग पडलेला असतो. बरेचसे धबधबे अभयारण्यात येतात. तिथेही हीच परिस्थिती असते. मग तो देश-विदेशातील पर्यटक भेट देतात तो दूधसागर धबधबा असो वा इतर धबधबे… पर्यटकांची पावसाळी पर्यटनाकडे बघण्याची दृष्टी बदलत नसेल तर हे नैसर्गिक धन संकटग्रस्त होईल यात शंका नाही. पाऊस सर्जकतेचे कोंब फुलविणारा ऋतू. त्याचे असणे सभोवतालाला पुलकित करते, चैतन्य बहाल करते. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात पाऊस हिरवाई घेऊन येतो. तो रुजवतो, फुलवतो, बहरवतो, चराचराला आनंदित करतो. पर्यटनाच्या नावावर आक्रस्ताळेपणा न करता, त्याला न ओरबाडता शांतपणाने त्या अनाकलनीय तत्त्वांचे स्मरण करून शरण जात संयत, संयमी वृत्तीने निसर्गाची भव्यतम रूपे न्याहाळली तरच निसर्गाचे काव्य उलगडेल.