गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (79) यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांना 3 नोव्हेंबर 2019 ला गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गोव्यासह जम्मू-काश्मीर आणि मेघालय यासारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले होते.
दीर्घकाळापासून सत्यपाल मलिक हे मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने 11 मे रोजी त्यांना दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सत्यपाल मलिक यांना मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे आणि मूत्रपिंड निकामी होण्याच्या गुंतागुंतीमुळे अतिदक्षता विभागात ठेवण्यात होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर काल दुपारच्या सुमारास रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास समाजवादी पक्षामधून सुरू झाला होता, ते काही काळ भाजपमध्येही कार्यरत होते. 1974 मध्ये बागपत येथून विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. अशा महत्त्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती. सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर आणि लडाख असे भाग करण्यात आले होते.
पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकावर गंभीर आरोप केले होते. जवानांना हेलिकॉप्टर देण्याऐवजी बसने पाठविण्यात आल्याचे सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्यांच्या या आरोपानंतर ते देशभरात चर्चेत आले होते.
मलिक यांना गोवा विधानसभेत श्रद्धांजली
गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना काल गोवा विधानसभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. आमदार विजय सरदेसाई यांनी मलिक यांचे निधन झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर एक मिनिट शांतता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.

