राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्री व भाजपचे आमदार व कार्यकर्ते असा लवाजमा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेला असून या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तेथे प्रचारकाम हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १३ रोजीपर्यंत हे सर्व नेते तेथे प्रचार कार्य करतील.
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर हे अलिबाग, मुरुड आदी परिसरात प्रचार कार्य करीत आहेत. त्यांच्याबरोबर सुमारे ४५ कार्यकर्त्यांची फौज आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते अलिबाग परिसरात आहेत. वीजमंत्री मिलिंद नाईक हे आपल्या कार्यकर्त्यांसह पनवेल परिसरात प्रचार करीत आहेत. तर उद्योगमंत्री महादेव नाईक हे कणकवली परिसरात प्रचाराचे काम पाहत आहेत. आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे सावंतवाडीत तळ ठोकून असून तेथील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परवा मुंबईत प्रचारकार्यात भाग घेतला होता. तर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी वाशी-मुंबई येथे प्रचार कार्य केले होते. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री गोव्यात परतले आहेत.

