धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात हिमाचलने गोव्याविरुद्ध दुसर्या दिवशी ४ बाद ३५६ धावांचा डोंगर उभा केला आहे. हिमाचलचा संघ १०१ धावांनी आघाडीवर असून त्यांचे ६ गडी शिल्लक आहेत. प्रियांशू खंडुरी (११७ धावा, २५१ चेंडू, १५ चौकार, १ षटकार) व अंकुश बैन्स (१४३ चेंडू, २१६ चेंडू, २४ चौकार) यांनी हिमाचलला २३७ धावांची सलामी दिली. गोव्याचा पहिला डाव पहिल्या दिवशी २५५ धावांत संपला होता. पहिल्या दिवशीच्या बिनबाद २ धावांवरून काल पुढे खेळताना अंकुश व प्रियांशू यांनी गोव्याच्या मध्यमगती व फिरकी गोलंदाजांचा सहज सामना केला. सुमीत वर्मा व पारस डोग्रा स्वस्तात परतले. दिवसअखेर निखिल गंगटा व अमितकुमार अनुक्रमे ३२ व ९ धावा करून नाबाद होते. गोव्याचा अनुभवी फिरकीपटू शदाब जकातीला आपली दिशा राखता आली नाही. ६१ धावा मोजून त्याला बळी मिळविता आला नाही. यातुलनेत दर्शन मिसाळने चांगली गोलंदाजी केली. गोव्यातर्फे मध्यमगती गोलंदाज फेलिक्स आलेमाव याने २ तर सौरभ बांदेकर व ऋतुराज सिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
गोवा पहिला डाव सर्वबाद २५५
हिमाचल प्रदेश पहिला डाव ः प्रियांशू खंडुरी पायचीत गो. ऋतुराज ११७, अंकुश बैन्स झे. अमोघ देसाई गो. फेलिक्स १४३, सुमीत वर्मा झे. दर्शन मिसाळ गो. फेलिक्स ८, पारस डोग्रा झे. फेलिक्स गो. बांदेकर २१, निखिल गंगटा नाबाद ३२, अमितकुमार नाबाद ९, अवांतर २६, एकूण ९२ षटकांत ४ बाद ३५६
गोलंदाजी ः ऋतुराज सिंग २२-३-७९-१, सौरभ बांदेकर २०-४-७४-१, फेलिक्स आलेमाव १७-२-८३-२, शदाब जकाती १८-१-६१-०, अमोघ देसाई २-०-१२-०, दर्शन मिसाळ १३-०-३१-०

