गोव्याची ‘आइस्क्रीम’ संस्कृती

0
27
  • शरत्चंद्र देशप्रभू

मुक्तीपूर्व काळातील पणजीत आइस्क्रीम मिळण्याची वानवा. तेव्हा आइस्क्रीम सर्वव्यापी झाले नव्हते. आता आइस्क्रीम लोकमान्य झाल्यामुळे आरोग्यवर्धक पदार्थ मार्केटमधून अस्तंगत होताना दिसताहेत. आइस्क्रीम खाण्यात आरोग्याच्या फायद्या-तोट्याचा विचार करायला कुणालाच सवड नाही. पूर्वी उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सहसा आइस्क्रीमचा आस्वाद घेत असत; आता तिन्ही त्रिकाल आइस्क्रीमने पेटपूजा चालवली आहे.

मुक्तीपूर्व काळातील पणजीत आइस्क्रीम मिळण्याची वानवा. तेव्हा आइस्क्रीम सर्वव्यापी झाले नव्हते. आता पणजीत खास आइस्क्रीमचे असे आकर्षक वातानुकूलित ‘आइस्क्रीम पार्लर’ दिसून येतात. शिवाय रेस्टॉरंट, दुकाने, स्टोअर्समध्ये पण आइस्क्रीमची उपलब्धता विनासायास दिसून येते. लग्न समारंभ, घरगुती पार्ट्याच कशाला, तर सरकारी अन्‌‍ खाजगी आस्थापनात कुणाचा वाढदिवस असो, बढती असो किंवा बदली असो- आइस्क्रीमची रेलचेल असते. आइस्क्रीम विक्री अन्‌‍ सेवन करण्यासाठी ऋतू, मोसम यांचे निर्बंध पण नाहीत. पावसाळा असो किंवा हिवाळा- आइस्क्रीम भक्षणात फरक नाही. उन्हाळी मोसमात कदाचित उलाढाल वाढतही असेल. परंतु त्याचा संबंध पर्यटकांशी, मोसमाशी नाही.

आइस्क्रीमने आज खराखुरा समाजवाद जोपासल्याचे दिसत आहे. उच्चभ्रू समाजात, कष्टकरी समाजात आइस्क्रीमने आपली मुळे खोलवर रुजवली आहेत. आइस्क्रीम हा आज आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे. विविध कंपन्यांची विविध रंगाची, विविध फ्लेवरची आइस्क्रीम हातोहात खपताना दिसतात. त्यांचे विविध आकार छोटे अन्‌‍ मोठे, कागदी तसेच प्लास्टिक कप, फॅमिली-पार्टी पॅक, तसेच कोन पण. आज आइस्क्रीमने सर्वस्तरांतील लोकांच्या जीवनात अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. खायला काळ-वेळ नाही. मुले न्याहारीपूर्वीही आइस्क्रीम चाखतात. काही लोक रात्रीच्या जेवणानंतर मुखशुद्धीसाठी आइस्क्रीमचा प्रयोग करताना दिसतात. आइस्क्रीम लोकमान्य झाल्यामुळे आरोग्यवर्धक पदार्थ मार्केटमधून अस्तंगत होताना दिसताहेत. आइस्क्रीम खाण्यात आरोग्याच्या फायद्या-तोट्याचा विचार करायला कुणालाच सवड नाही. पूर्वी उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सहसा आइस्क्रीमचा आस्वाद घेत असत. आता तिन्ही त्रिकाल आइस्क्रीमने पेटपूजा चालवली आहे. उपवासाच्या दिवशी पण थोडेतरी आइस्क्रीम चाखलेच पाहिजे हा खवय्या बाणा अन्‌‍ जन्मसिद्ध हक्क.

पणजीत त्याकाळी आइस्क्रीम मिळण्याची फक्त दोन प्रमुख स्थाने. नॅशनल थिएटरच्या उजव्या बाजूला गोल टेबलावर रंगीत कापडाच्या छत्र्या बसवल्या जात. येथे एप्रन घातलेल्या कॅथलिक मुली आइस्क्रीम सर्व्ह करीत. गोलाकार काचपात्रात आइस्क्रीमचा गोळा. याच्यावर बहुधा मक्याच्या कणसाच्या पीठाचे चौकोनी आकाराचे, तसेच वर्तुळाकार पोकळी असलेले बिस्कीट खोचलेले असे. या जागेला छत नसल्यामुळे आइस्क्रीमचे हे उघड्या जागेवरचे आस्थापन पावसाळ्यात बंद असायचे. विविध फ्लेवरचे आइस्क्रीम मिळत असत की काय ते मात्र आता आठवत नाही. परंतु ते तिरंगी असायचे. हे आइस्क्रीमचे आस्थापन राव कुटुंबीय चालवत की कंत्राटी पद्धतीवर दिले होते याची कल्पना नाही. परंतु संध्याकाळच्या समयी येथे उच्चभ्रू आइस्क्रीम शौकिनांची तुरळक उपस्थिती असे. सिनेशौकीन पण इथल्या आइस्क्रीमची लज्जत चाखण्यात धन्यता मानीत. याव्यतिरिक्त आरस कुटुंबाचे आस्थापन असलेल्या जुन्या सचिवालयाच्या मागच्या बाजूने चर्चकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला चिंचोळ्या जागेत आइस्क्रीमचे तत्कालीन तथाकथित पार्लर कार्यरत होते. येथे पण शिस्तीत आइस्क्रीम सर्व्ह केले जात असे. पद्धत तीच, गोलाकार काचपात्रे, आइस्क्रीमचा बिस्कीट खोचलेला गोळा. त्याकाळी त्याला ‘सोरव्हेत’ असे संबोधत. हे चाखायला मिळणे म्हणजे स्वर्गसुखच.

आजोबांसमवेत कितीतरी वेळा आम्ही हा स्वर्गीय आनंद उपभोगला. याशिवाय बर्फ तयार करण्याच्या छोट्या-मोठ्या कारखान्यांत पण आइस्क्रीम वितरणासाठी तयार होत असे. हे तयार आइस्क्रीम खास अशा हातगाड्यांनी किंवा सायकल-रिक्षाने जत्रा, फेस्तच्या दिवसांत विकले जात असे. बहुधा गुलाबी रंगाच्या या आइस्क्रीम विक्रेत्यांची मुख्य गिऱ्हाइके म्हणजे मध्यंतराच्या वेळी बाहेर येणारे शाळांचे विद्यार्थी. कोर्तिमच्या रस्त्यावर डाव्या बाजूला एक बर्फाचा कारखाना होता. येथे या प्रकारचे आइस्क्रीम बनवले जात असे. बहुधा देसाई कुटुंब. रेडकर चाळीतले ते आमचे शेजारी. काही का असेना, या हाताने यंत्राला गती देऊन केलेल्या आइस्क्रीमला आताच्या आइस्क्रीमची चव नसेल; परंतु रासायनिक प्रक्रिया नसल्यामुळे आरोग्याला ते घातक नव्हते हे निश्चित!
आइस्क्रीम ज्यांना अप्राप्य असे त्यांना आइसफ्रूटवर आपली आवड भागवावी लागे. आइसफ्रूटचे थर्माससारखे भलेमोठे डबे सायकलीस अडकवून आइसफ्रूट विक्रेते रस्त्यावरच फिरताना दिसत. यांचे मुख्य गिऱ्हाईक शाळांतील विद्यार्थी. पायलट, टॅक्सी ड्रायव्हर, कामिज्यांव कर्मचारी. भाजी व मासळी विक्रेत्या पण यांचे ठरलेले गिऱ्हाईक. या आइसफ्रूटच्या कांड्या लंबाकृती डब्यात ओळीने एकावर एक अशा विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या असत. अखंड कांडीची मागणी. तुकडा उडालेली कांडी विक्रेत्याने स्वतः खावी किंवा वितळू द्यावी. यास्तव या कांड्या कसोशीने जपल्या जात. आइसफ्रूट विक्रेत्यांची एक विशिष्ट हेल असणारी ललकार, हा पण त्याकाळच्या जीवनशैलीचा एक अनोखा आविष्कार.

कालांतराने या कांड्याचे आकार बदलले, रंग बदलले. मुलांना आकर्षित करण्यासाठी कांड्या गोलाकार झाल्या. पिवळ्या-गुलाबी रंगांनी नटू लागल्या. एक मजबूत परंतु चपट्या कांडीवर बर्फ प्रेस करून, साखरेच्या रंगीत पाकात बुडवून आइस्क्रीम बनवले जात असे. यासाठी विविध प्रकारचे साचे वापरले जात. या आइसफ्रूटसाठी वापरलेले बर्फ, रंग यांचा दर्जा आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक असायचा. कारण ‘देलेगाद द साउद’ म्हणजे आरोग्य खात्याचे अधिकारी तसेच ‘कामरा’ म्हणजे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दराराच जबरदस्त. ‘मुल्त’ म्हणजे दंडाची कारवाई झाली तर आयुष्यातून उठण्याची शक्यता! आइसफ्रूटप्रमाणे बर्फाचे थंड, लाल, मधुर गोळे विकणाऱ्या हातगाड्या पण तुरळकपणे दिसत. हातगाड्यावर बसवलेल्या किसणीवर बर्फ किसून एका स्वच्छ ओल्या फडक्यात एका चपट्या लाकडी काडीच्या साहाय्याने तो बर्फाचा चुरा प्रेस करून गोळा बनवला जात असे अन्‌‍ लाल मधुर द्रव्यात बुडवून मुलांना दिला जात असे. याला लहान लाडू असे पण संबोधले जात असे. आता हे आइसफ्रूटवाले पणजीतून गायबच झाल्याचे प्रतीत होत आहे. आज कुठले पालक आपल्या मुलांना हे आइसफ्रूट चाखायला देणार? असंख्य प्रश्न समोर तरळणार. आइसप्लान्ट सुरक्षित असेल का? पाणी शुद्ध असेल का? वापरलेले खायचे रंग रसायनमुक्त असतील का? मुख्य म्हणजे विक्रेता रोगग्रस्त असेल का? अशा शंका मनाला भेडसावणार. यामुळे ही आइसफ्रूट संस्कृती लयास गेली असे म्हणावे लागेल.

मुक्तीपूर्व पणजीतील थंडपेये म्हणजे लिंबू-सोडा अन्‌‍ रासबेरी सरबत. लिंबाच्या रसात भरपूर साखर अन्‌‍ गोळ्याच्या बूच असलेल्या बाटलीतील फसफसणारा सोडा. अमृततुल्य पेय. जत्रा, फेस्त उत्सवात ही पेये विकली जात. यासाठी काचेचे ग्लास वापरले जात. क्वचितच प्रसंगी स्टील, स्टेनलेस किंवा ॲल्युमिनियमचे पेले. पियूष हे पण त्याकाळचे लोकप्रिय पेय. गुजरात लॉज व कॅफे रिआलमध्ये हे उपलब्ध असे. कदाचित ‘कॅफे भोसले’त पण मिळत असेल, कल्पना नाही. घरी लिंबूपाणी अन्‌‍ ताक पिणे सर्रास. मोसमात कोकमचे पन्हे.

मुक्तीनंतर लगेच बाटलीतील थंड पेयांचा प्रवेश झाला नाही. ‘गोल्ड स्पॉट’ने पहिल्यांदा चंचुप्रवेश केला. नंतर ‘कोका कोला’चा झंझावात आला. या वावटळीत स्थानिक पारंपरिक पेये लयास गेली. ‘कोका कोला’ने दशकभर सम्राटासारखे राज्य केले. स्पर्धक शक्तीहीन. डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या बोरी येथील प्रकल्पात संप झाल्यावर ‘कोका कोला’च्या विक्रीस थोडाफार पायबंद बसला. या दरम्यान अन्य ब्रॅण्डची पण चलती सुरू झाली. ‘फँटा’, ‘लिमका’, ‘पेप्सी’, ‘सोसयो’ अन्‌‍ अलीकडची ‘सिट्रा.’ जनता पार्टीच्या शासनव्यवस्थेत कॉ. जॉर्ज फर्नांडिस यांच्या अतिरेकी धोरणामुळे ‘कोका कोला’ गोव्यातच नाही तर भारतात पण नामशेष झाल्याचे प्रतीत होत होते. जागतिकीकरणामुळे यांचे अन्य रूपात आगमन झाल्याचे दिसते. गोव्यात ‘थम्सअप’ने काही काळ धुमाकूळ घातला होता. आता तर ही पेये विविध आकारात काचेच्या बाटल्यांत तसेच टीनमध्ये उपलब्ध आहेत. दीड-दोन लीटरच्या बाटल्या पण कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाजारात आणल्या गेल्या. या साऱ्यामुळे पारंपरिक पेये, आइसफ्रूट पडद्याआड नव्हे तर स्मरणातून पण बाहेर फेकले गेल्याचे संकेत मिळताहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या पेयांचा तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे. कुठली पेये आरोग्यवर्धक याची तर्कसंगती लागणे कौटुंबिक अन्‌‍ सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक.