गोव्याचा मुक्तीसंग्र्राम आणि पश्‍चिमी साम्राज्यवादी

0
90

– नागेश करमली

गोव्याच्या मुक्तीसंग्राम हा आता एक इतिहास बनला आहे. या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गोमंतकीय व त्यांच्या जोडीला गोमंतकीयेतर बांधवानी मिळून पोर्तुगीज सत्तेविरुद्ध दिलेला, भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा लढा. गोव्यातील समाजाच्या सर्व थरांतील व्यक्तीनी यात हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लीम सर्व आले. या लढ्यात समर्पित वृत्तीने भाग घेतला. याला काही अपवाद जरूर असतील. पण तेवढ्यासाठी, ज्यांच्या त्यागामुळे मुक्तीचा दिवस उजाडला, त्याचे महत्त्व कमी होत नाही. पुरुषांबरोबरच गोव्यातील महिलांनीही या लढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. पोर्तुगीजाच्या अमानुष छळाची पर्वा न करता दीर्घकाल तुरुंगवास भोगला आहे. शांत, सुशेगाद म्हटल्या जाणार्‍या गोव्यातील अनेक तरुणांनी धिरोदत्तपणे हौतात्म्य स्वीकारून या भूमीचे पांग फेडले आहे. सुमारे ८० पेक्षा अधिक हुतात्म्याच्या मालिकेत, गोमंतकीयाबरोबरच, गोव्याबाहेरच्या भारतातील इतर राज्यांतील तरुणांनी या भूमीच्या मुक्तीसाठी बलिदान केलेले आहे. सुमारे पंधरा वर्षे गोवामुक्तीचा हा संग्राम चालला. हजारो लोक यांत सहभागी झाले. या संग्रामात अधूनमधून बरेच चढ-उतार आले गेले. पण लढा थांबला नाही. लढा चालला होता तेव्हाच्या भारतातील सरकारने या संग्रामाच्या बाबतीत काय केले, कशा प्रकारचे धोरण स्वीकारले हा वादाचा मुद्दा असला तरी स्वातंत्र्यप्रेमी भारतीय जनतेने, गोव्याचा मुक्ती संग्राम हा आपला लढा मानला व त्याला सर्वतोपरी सहाय्य केले. सक्रीय पाठिंबा दिला. साम्राज्यवाद विरोधी जगानेही गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाला हार्दिक पाठिंबा दिला. परिणामी, आडमुठ्या पोर्तुगीजांना बळाचा वापर करून गोव्यातून हाकलून लावण्यासाठी भारत सरकारवरील दबाव वाढला. सदैव शांततामय वाटाघाटीद्वारेच गोवा मुक्तीची भाषा बोलणार्‍या पंडित नेहरूंनाही शेवटी, सैन्यबळाचा वापर केल्याशिवाय पोर्तुगीज गोव्यातून काढता पाय घेणार नाहीत ही वस्तुस्थिती मान्य करावी लागली. आणि अखेर १९६१ च्या १८ डिसेंबरला भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला व अवघ्या ३६ तासांत ‘‘आम्ही यँव करू आणि त्यंव करूं’’ असे म्हणणार्‍या पोर्तुगीजांना भारतीय सेनादलासमोर दांती तृण धरून शरणागती पत्करावी लागली.

गोवा मुक्त झाला. गोव्यासह सारा भारत हर्षभरीत झाला. खुद्द गोमंतकीयांना तर आपला पुनर्जन्म झाल्यासारखेच वाटले. साम्राज्यवाद्यांच्या पकडींतून मुक्त झालेल्या देशांनी पाकिस्तानसारखा अपवाद वगळता गोवामुक्तीचे हषोत्फुल्लपणे स्वागत केले. आंगोला, मोझांबीक व गिने सारख्या पोर्तुगीज वसाहतीतील जनतेला आपल्या मुक्तीचा मार्ग आता अधिक सुकर झाल्याचा साक्षात्कार झाला. पोर्तुगीजांवर होणार्‍या आघाताची ती प्रतीक्षाच करीत होती. या व्यतिरिक्त, जगात जेथे जेथे स्वातंत्र्यप्रेमी जनता होती, त्या सर्वांनी गोवा मुक्तीचे मुक्तपणे स्वागत केले. आफ्रिकेतील स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी झुंज देणार्‍या देशांतील स्वातंत्र्य योद्धांनी तर ‘आम्ही या क्षणाची वाटच पाहत होतो’ असे उद्गार काढले. परंतु गोवामुक्तीबद्दल अत्यंत लाजीरवाणा बदसूर जर कुणी लावला असेल तर तो पश्‍चिमेकडील साम्राज्यवाद्यांनी. या बदसुरांत, आपलाही एक हलकासा, संधीसाधू आवाज मिळविणारा आशियांतील एकमेव देश होता तो अगोदर उल्लेख केलेला शेजारी पाकिस्तान. कारण एकतर पाकिस्तानात सत्ता भोगणारे जे कोणी होते ते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी उभ्या आयुष्यात कधीच झुंजले नव्हते. भारतात स्वातंत्र्यलढा चालला होता, लोक लाठी काठी खात होते, तुरुंगात जात होते, हौतात्म्य पत्करीत होते तेव्हा हे पाकिस्तानी सत्ताधीश व त्यांचे पूर्वसुरी ब्रिटिशांचे पाय चेपीत बसण्यात धन्यता मानीत होते. ‘गाढवाला गुळाची चव’ म्हणतात त्याप्रमाणे या पायचेपूंना स्वातंत्र्य किंवा मुक्तीलढा याचे महत्त्व कसे कळणार! (त्यांना घर बसल्या स्वातंत्र्य मिळाले)
पश्‍चिमी साम्राज्यवादी हे तर वसाहतवादाच्या बुनियादीवर उभे राहूनच सुसमृद्ध बनलेले लोक. यात ब्रिटीश आले, फ्रेंच आले, डच आले, स्पॅनिश आले, पश्‍चिम युरोपमधील जवळ-जवळ सर्वच प्रमुख देश आले. भारताने गोव्यात लष्कर पाठविले तेव्हा या सार्‍यांनी सालाझारशाहीच्या सुरांत सूर मिळवीत ‘भारताने गोव्यावर आक्रमण केले. त्यांना थोवा’ असा एकच गलका सुरू केला होता. साम्राज्यवादी मनोवृत्तीच्या वृत्तपत्रांनीही ‘भारत आक्रमक, भारत आक्रमक’ हा सूर लावला होता. पंडित नेहरूना या वृत्तपत्रीय माध्यमाने शांततावादाच्या बुरख्याखाली दडलेला युद्धखोर असे म्हणण्यापर्यंत माजल मारली होती. युरोप पेक्षा अमेरिका वेगळी असे आम्ही समजत होतो. कारण त्यांनाही त्याच्या गोर्‍या बांधवाकडून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा द्यावा लागला होता. परंतु सुमारे दोनशे वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळवून सार्वभौम बनलेली युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आपला तो स्वातंत्र्याचा इतिहास बासनात गुंडाळून ठेवून समृद्ध व सामर्थ्यशाली बनल्यामुळे, आता नवसाम्राज्यवादी बनली आहे. ते लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादींचा जयघोष करीत असले तरी त्यांना स्वतः व्यतिरिक्त जगातील अन्य पिडितांची व पारतंत्र्यात लोळणार्‍याची पर्वा नाही. गोव्यात भारतीय सेना शिरल्यानंतर ‘भारतीय आक्रमण’ ‘भारतीय आक्रमण’ असा गलका करणार्‍या पश्‍चिम युरोपपेक्षा अमेरिकेने काही वेगळे केले नाही. त्यावेळी जॉन एफ केनेडी हे तुलनात्मकदृष्ट्या उदारमतवादी गृहस्थ अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी मागचा पुढचा काही एक विचार न करता पंडित नेहरूंविरुद्ध अक्षरशः गरळ ओकण्यास सुरुवात केली होती. हा कसला शांतीदूत म्हणून त्यांची हेळणीही केली होती. असे करताना, गेली पंधरा वर्षे गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध फार मोठा जनसंग्राम चालला होता व त्याची परिणती म्हणूनच गोव्यात भारतीय लष्कराला प्रवेश करावा लागला. या कशाचीच जाण ठेवली नव्हती. केनेडींचे वक्तव्य हे त्यांच्या प्रतिष्ठेला मुळीच शोभणारे नव्हते. एका क्षणात केनेडी हे आमच्या दृष्टीने एक अत्यंत मामुली माणूस वाटायला लागले होते. केनेडींचे संयुक्त राष्ट्रांतील (युनो) दूत ऍडलाय स्टिवन्सन यांनी तर कहरच केला होता. अमेरिकी अध्यक्षपदासाठी दोनदा निवडणूक लढवून, जनरल आयसेनहॉवर यांच्याकडून पराभूत झालेले स्टिवन्सन यांनी युनोत सुरक्षा मंडळाच्या बैठकीत, गोव्यातील भारतीय लष्करी कारवाईबद्दल बोलताना, भारतासह पंडित नेहरूंची ज्या प्रकारे निंदा केली ती विचारात घेता, अमेरिकेला खुद्द पोर्तुगालपेक्षाही अधिक दुःख झाल्याचे जाणवत होते. भारताबद्दल निंदास्पद वक्तव्य करताना पोर्तुगीजांच्या आडमुठेपणावर व सालाझारच्या फॅसिस्ट वृत्तीवर आपण पांघरुण घालीत आहोत, हे ते विसरले होते. पश्‍चिमी आधिपत्यावर जेव्हा आघात होतो. अधिक स्पष्टपणे बोलायचे झाल्यास गोर्‍यांच्या सत्तास्थानाला जेव्हा धोका पोहोचतो तेव्हा पश्‍चिम युरोपीयन काय किंवा अमेरिकन काय सारेच अगदी चवताळून उठतात. अजूनही ही वृत्ती बदलेली नाही. युनोच्या सुरक्षा समितीत, स्टिव्हन्सनने अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या वतीने, भारताने गोव्यातील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी व सेनेला माघारी बोलवावे असा ठराव आणला होता. परंतु गोवा मुक्तीला जोरदार पाठिंबा देणार्‍या त्यावेळच्या सोविएत युनियनने (रशिया) या ठरावाविरुद्ध नकाराधिकार (व्हेटो) वापरून तो फेटाळून लावला होता. ही बातमी जेव्हा गोव्यात पोचली होती त्यापूर्वीच खर्‍या अर्थाने सारा गोवा मुक्त झाला होता. शस्त्रे खाली टाकून पोर्तुगीज इकडून तिकडे पळत सुटले होते. त्यांचे नीतिध्यैर्य कधीच खचले होते. ‘शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू’ अशी वल्गना करणारे पोर्तुगीज पहिल्याच क्षणी गलितगात्र होऊन पडले होते. भारतीय सेनेशी गाठ पडण्यापूर्वीच त्यांनी नांगी टाकली होती.
गोवा मुक्तीच्या निमित्ताने पश्‍चिमी राष्ट्रातील अहंगंडाने पछाडलेल्या साम्राज्यवादी वृत्तीचे जे किळसवाणे दर्शन घडले त्याला तोड नाही. पश्‍चिम युरोपातील ब्रिटन किंवा फ्रान्स या राष्ट्रांच्या काही वसाहती स्वतंत्र झाल्या होत्या. काहींची स्वातंंत्र्याकडे वाटचाल चालू होती. मुक्ततेसाठी वसाहतींतून चाललेले लढे त्यांनी पाहिले होते. वसाहतींतील जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्के ते मान्य करीत होते. परंतु सालाझारचे पोर्तुगीज आपल्याजवळ वसाहती नाहीत. जे देश आपल्या सत्तेखाली आहेत ते पोर्तुगालचेच अभिन्न भाग आहेत. पोर्तुगालचे विस्तारीत प्रदेश आहेत असे जगाला सांगत असत. हे अजब तर्कट होते. तरी देखील ब्रिटन वा फ्रान्स पोर्तुगालविरुद्ध एक ब्र काढीत नसत. हे देश, गोव्यासह पोर्तुगालच्या इतर वसाहतींतून चाललेल्या लोकसंग्रामाला मुळीच महत्त्व देत नसत. ते तेथील साम्राज्यवादी वृत्तीने पछाडलेली वृत्तपत्रेही स्वातंत्र्योत्सुक जनतेची पाठराखण करण्याऐवजी पोर्तुगालच्या फॅसिस्ट राजवटीची तळी उचलून धरण्यातच धन्यता मानीत असत. याला काही क्षुल्लक असे अपवाद होते. उदाहरणार्थ इंग्लंड व फ्रान्समधील काही डाव्या विचारणीची वर्तमानपत्रे. अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रेही स्वातंत्र्यलढ्याच्या बाबतीत विशेष आत्मियता दाखवित नसत. न पेक्षा गोवा मुक्तीच्या वेळी या वृत्तपत्रांनी पंडित नेहरू व भारता विरुद्ध ‘आक्रमक आक्रमक’ असे म्हणत ज्या प्रकारे विषवमन केले ते मुळीच केले नसते. गोवा स्वातंत्र्य लढा १९५४ नंतर ऐन भरात आलेला असताना, अमेरिकन अध्यक्ष आयसेव्होवर यांचे विदेश मंत्री जॉन फॉस्टर डलस यांनी तर कसलाही विचार न करता उघडपणे गोवा हा पोर्तुगालचा अविभाज्य भाग असल्याचे निवेदन करून मूर्खपणाचा कळस गाठला होता. भारतीय संसदेत यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.
साम्राज्यवादी वृत्तीच्या अमेरिकेसह पश्‍चिमी राष्ट्रांची अहंगड व श्रेष्ठत्वाची भूमिका आजही बदललेली नाही. गोव्यासारख्या प्रदेशाच्या मुक्तीसाठी अजूनही ते ‘मुक्ती’ हा शब्द वापरीत नाहीत. गोवा भारताने ‘काबीज केला’ हाच शब्दप्रयोग आजही वापरल जातो. आता आपण लोकशाहीवादी झालो आहोत असे ढोल बडण्यार्‍या पोर्तुगाललाही ‘गोवा मुक्ती’’ हा शब्द आवडत नाही. गोव्यात स्वातंत्र्यसंग्राम झाला होता या इतिहासाला ते महत्त्व देत नाहीत. पोर्तुगीजांनी गोव्यासह आंगोला, मोझांबीक व अन्य ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांवर अनन्वित अत्याचार केले होते. हा भाग ते मुद्दाम लपवितात व साळसूदपणे संस्कृतीच्या संवर्धनाच्या बढाया मारतात. कसली संस्कृती? आमच्यांतील काही निर्लज्जपण याला सहजपणे बळी पडतात. याचेच अत्यंत दुःख वाटते.
इतिहास बदलता येत नाही व विसरताही येत नाही. गोवा मुक्ती मागचा इतिहास साम्राज्यवादी प्रवृत्तीच्या पश्‍चिमी देशांनी कितीही लपविण्याचा, नाकारण्याचा किंवा विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे काही बिघडणार नाही, बदलणार नाही. इतिहास हा इतिहासच आहे आणि गोव्याच्या बाबतीत येथील एका झुंजार पिढीने तो समर्पितपणे रजलेला आहे. स्वतःच्या रक्ताचे व घामाचे सिंचन करून त्याला जिवंतपणा आणला आहे.