गोविंद गावडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
32

>> आमदार व मंत्रिपदाचा दिला राजीनामा

प्रियोळ मतदारसंघाचे अपक्ष आमदार व मंत्री गोविंद गावडे यांनी काल मंगळवारी सकाळी आपल्या आमदारकीचा तसेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि संध्याकाळी भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजप पक्षात रितसर प्रवेश केला. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व पक्षाचे गोव्याचे सहप्रभारी किशन रेड्डी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जर्दोश आदींच्या उपस्थितीत गोविंद गावडे यांना पक्षात प्रवेश दिला.

यावेळी बोलताना श्री. गावडे म्हणाले की, आज आपण पक्ष नेत्यांच्या निमंत्रणावरून भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. आपले सगळे कार्यकर्ते व हितचिंतक यांना विश्‍वासात घेऊनच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रियोळ मतदारसंघातील सर्व भाजप कार्यकर्त्यांचाही आपणाला पाठिंबा असल्याचा दावा करताना त्यांनी, आपण २०१७ सालापासून भाजपबरोबर असून आपण प्रियोळमधील भाजप कार्यकर्त्यांना कधीही दुखवले अथवा वाईट वागणूक दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीत वावरताना सगळ्यांना घेऊन पुढे जावे लागते, असे सांगून यापुढेही आपण भाजपच्या तसेच आतापर्यंत आपणाबरोबर असलेले कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यात जेव्हा जिल्हा पंचायत व पंचायत निवडणूक झाली तेव्हा आपण भाजपसाठी काम केल्याचे गावडे म्हणाले.
गोविंद गावडे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर बोलताना प्रदेश अध्यक्ष तानावडे म्हणाले की, आम्ही गावडे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाला मान देऊन पक्षात प्रवेश करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच असल्याचे ते म्हणाले. २०१७ सालापासून ते भाजपबरोबर आहेत. अगोदर मनोहर पर्रीकर यांच्या व नंतर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले.
कोविड एसओपीमुळे काल भाजप प्रवेशावेळी शक्तीप्रदर्शन न करता गावडे यांनी आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना आपल्या सोबत आणले होते.

२०१७ साली भाजपमुळे विजय
२०१७ साली आपण प्रियोळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली तेव्हा भाजपने आपणाला पाठिंबा दिल्याने आपला विजय सुकर झाल्याचे ते म्हणाले. आता आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य भाजप नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढील निवडणुकीत काम करणार असल्याचे ते म्हणाले.