भाजप प्रवक्ते कृष्णा साळकर यांची माहिती; चर्चेनंतर पुढील निर्णय
माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी रविवारच्या सभेत केलेल्या आरोपांची पक्ष संघटनेने दखल घेतली आहे. गावडे यांच्याकडे चर्चा केल्यानंतर पक्षाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते आमदार कृष्णा साळकर यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही. गोविंद गावडे यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कारवाई करण्यात आलेली आहे. गावडे यांनी रविवारी घेतलेल्या सभेचा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आढावा घेऊन पुढील कृती करतील, असे भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.
‘आप’चे भाजपला सवाल
माजी मंत्री गोविंद गावडे यांचे आरोप खरे होते, तर मुख्यमंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात आली नाही. जर ते खोटे होते तर गोविंद गावडे यांना पक्षातून का काढून टाकण्यात आले नाही, असा सवाल आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी केला.
गावडे आता भाजपचा भाग नाहीत : सरदेसाई
राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर गोविंद गावडे यांनी घेतलेल्या पहिल्या जाहीर सभेत ज्या पद्धतीने भाषण केले, त्यावरून ते आता भाजपचा भाग नसल्याचे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवडचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल व्यक्त केली. भाजप अध्यक्ष बेजबाबदार आहेत आणि त्यांना कसे बोलावे हे माहीत नाही, असा थेट आरोपही गावडे यांनी केला होता; मात्र भाजपकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कारण गावडे हे सत्य बोलले आहेत, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
आरोपांवर भाजपने स्पष्टीकरण द्यावे : फेरेरा
राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर आमदार गोविंद गावडे यांनी त्यांच्या पहिल्या जाहीर सभेत भाजप सरकारविरुद्ध धाडसी विधाने केली. आत्तापर्यंत कोणत्याही मंत्र्याने त्यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपने त्यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.

