Home बातम्या गोवा सरकारच्या 62 वेबसाईट्स हॅक!

गोवा सरकारच्या 62 वेबसाईट्स हॅक!

0

सायबर गुन्हेगारांनी सरकारी खात्यांच्या एकूण 62 वेबसाईट्सवर सायबर हल्ला करुन त्या हॅक केल्या असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. या सरकारी खात्यांच्या ‘होस्ट सर्व्हर’वर सायबर हल्ला करुन या वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या असल्याचे राणे म्हणाले. त्यामुळे या सरकारी वेबसाईटस्‌‍वर आता कॅसिनोंच्या माहितींसह अनावश्यक मजकूर दिसायला लागला असल्याचे राणे यांनी नमूद केले.

आपल्या महिला आणि बालविकास या खात्याविषयी बोलताना राणे म्हणाले की, या खात्याची वेबसाईट देखील हॅक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यासह एकूण 62 सरकारी वेबसाईट्सवर सायबर गुन्हेगारांनी हल्ला केले असताना राज्यातील माध्यमांनी मात्र महिला आणि बालविकास खात्याचेच तेवढे नाव घेऊन वृत्त दिल्याबद्दल राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

महिला आणि बालविकास खात्याच्या वेबसाईटला वैध वेब सुरक्षा ऑडिट प्रमाणपत्र आहे, असे सांगून उपाययोजना म्हणून ही वेबसाईट सध्या बंद करण्यात आली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. गेल्या 8 महिन्यांपूर्वीही सायबर गुन्हेगारांनी अशाच प्रकारे गोवा सरकारच्या काही वेबसाईट्वर सायबर हल्ला करुन त्या हॅक केल्या होत्या, अशी माहिती देखील राणे यांनी दिली