गोवा विधानसभा संकुलाचा आज रौप्यमहोत्सव

0
34

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राहणार उपस्थित

महोत्सव काळात विधानसभा संकुल नागरिकांसाठी खुले

गोवा विधानसभा इमारतीचा रौप्यमहोत्सव सोहळा 6 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलात साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा आणि लोकशाही व्यवस्थेतील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन 6 रोजी संध्याकाळी 4 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभास गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विधिमंडळ कामकाज मंत्री माविन गुदिन्हो आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसोझा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन समारंभात गोवा विधानसभा आणि सचिवालय इमारतीवरील खास टपाल तिकीट आणि आजी-माजी आमदाराच्या कार्याची माहिती देणाऱ्या खास स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा सत्कार
उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. संसदीय लोकशाही तसेच गोव्याची प्रगती आणि समृद्धी यामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल या सत्काराद्वारे घेतली जाईल. लोकशाही शासन व्यवस्था बळकट करण्यात विधिमंडळ संस्थांचे असलेले चिरंतन महत्त्वही या प्रसंगी अधोरेखित केले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात इतर मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.

1994 रोजी संकुलाची पायाभरणी
गोवा विधानसभेच्या नूतन विधानसभा संकुलाची पायाभरणी 22 जानेवारी 1994 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम वर्ष 2000 च्या सुरुवातीला पूर्ण झाले. पर्वरी येथील गोवा विधानसभेच्या या प्रतिष्ठित संकुलाचे उद्घाटन 5 मार्च 2000 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गोव्याचे राज्यपाल मोहम्मद फजल, विधानसभा अध्यक्ष प्रतापसिंग राणे, मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन, उपाध्यक्ष उल्हास अस्नोडकर आणि विरोधी पक्षनेते रवी नाईक हे मान्यवर उपस्थित होते. हा प्रकल्प विधानसभा विभाग, सचिवालय विभाग आणि व्हीआयपी विभाग अशा तीन विभागांमध्ये विभागलेला
आहे.

छायाचित्र प्रदर्शन
या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त पणजीतील जुन्या सचिवालयापासून पर्वरीतील विधानसभा संकुलापर्यंतचा प्रवास दर्शविणारे दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन आणि लघुपट सादर केला जाणार आहे. या महोत्सवाच्या काळात विधानसभा संकुल नागरिकांसाठी खुले ठेवले जाणार आहे. या काळात नागरिक विधानसभा संकुलाला भेट देऊन संकुलातील मुख्य सभागृह आणि विविध विभागांची पाहणी करू शकतात. विधानसभेचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती घेऊ शकतात. विधानसभा संकुल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सोबत आपले ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.