गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र आणि उपयोजित विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांनी सादोळशे काणकोण येथील दिडके तारीवरील पुलावरून काल उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र काणकोण पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरिष देसाई आणि अन्य पोलिसांच्या सावधगिरीमुळे त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले.
म्हापसा पोलीस स्थानकात प्रणव नाईक हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. यानंतर ते काणकोणच्या दिशेने आला असल्यााची माहिती म्हापसा पोलिसांकडून काणकोण पोलिसांना मिळाल्यानंतर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. या दरम्यान सादोळशेचया दिडके तारीवर ते पोलिसांना सापडले, अशी माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिष देसाई यांनी दिली. नाईक हे सध्या काणकोण पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल.

