गोवा-लंडन थेट विमानसेवा हिवाळ्यापासून सुरू होणार

0
12

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचे सदानंद तानावडेंना आश्वासन

बंद पडलेली गोवा-लंडन थेट विमानसेवा येत्या हिवाळ्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे या विमानसेवेसंबंधी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी ही विमानसेवा येत्या हिवाळ्यापासून पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन राज्यसभेत दिले.

या पार्श्वभूमीवर सदानंद शेट तानावडे यांनी काल केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजारापू राजमोहन नायडू यांची भेट घेऊन ही विमानसेवा विनाविलंब सुरू करा, अशी विनंती पुन्हा त्यांच्याकडे केली.

पूर्वी आठवड्याला तीनदा ही गोवा-लंडन थेट विमानसेवा चालू होती. आणि या सेवेचा विशेष करून लंडनमध्ये स्थायिक झालेल्या, तसेच तेथे नोकरी करणाऱ्या गोमंतकीयांना चांगला लाभ मिळायचा. त्याशिवाय पर्यटकांचीही चांगली सोय व्हायची, असे तानावडे यांनी काल घेतलेल्या भेटीत नायडू यांना
सांगितले.

बऱ्याच काळापासून बंद असलेल्या या थेट विमानसेवेमुळे लंडनपासून गोव्यात येऊ पाहणाऱ्या गोमंतकीयांची अडचण होऊ लागली असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व आता विनाविलंब ही सेवा पुन्हा सुरू केली जावी, अशी त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी आश्वासन देताना नायडू यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.