प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे प्रतिपादन
आजपासून दक्षिण गोव्यात यात्रा सुरू
काँग्रेस पक्षाच्या गोवा राखण यात्रेला उत्तर गोव्यातील लोकांकडून अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रतिसाद मिळाल्याचे काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पक्षाच्या गोवा राखण यात्रेचा काल उत्तर गोव्यात समारोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर व अन्य उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या गोवा राखण यात्रेला उत्तर गोव्यातील वीसही मतदारसंघातील लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
या वीसही मतदारसंघांतील जनतेकडून आम्हाला जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्यामुळे पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारावून गेले आहेत. उत्तर गोव्यातील जनतेकडून आम्हांला एवढे प्रेम व सहकार्य मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे आम्ही भारावून गेलेलो तर आहोतच. पण त्याचबरोबर आम्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याचे चोडणकर म्हणाले.
आजपासून दक्षिण गोव्यात यात्रा
उत्तर गोव्यातील आमची ‘गोवा राखण यात्रा’ आता संपली असून आजपासून दक्षिण गोव्यात ‘गोवा रक्षण यात्रा’ सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चोडणकर यांनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी तसेच मंत्री विश्वजित राणे यांच्या वाळपई या मतदारसंघांतील जनतेकडून मिळालेला पाठिंबा हा धक्कादायक असा होता. या मतदारसंघातील हजारो लोकांनी यात्रेला उत्स्फूर्त असा जो पाठिंबा दिला तो सुखद धक्का देणारा होता, असे स्पष्ट केले. त्याशिवाय राज्यभरातील बिगर सरकारी संघटना, सामाजीक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते आदींनीही उत्तर गोव्यातील या गोवा रक्षण यात्रेला भरभरून प्रतिसाद दिल्याचे चोडणकर म्हणाले. त्याशिवाय डॉक्टर्स, अभियंते तसेच अन्य बुद्धिजीवी लोकांनीही भरभरून पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
सर्वधर्मियांकडून स्वागत
काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष असा पक्ष असल्याने आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तेथे सर्वधर्मिय लोकांकडून आमच्या यात्रेचे भव्य असे स्वागत झाल्याचे चोडणकर यानी नमूद केले. हिंदू, मुस्लिम तसेच ख्रिश्चन देवस्थानांजवळच एकसमान व भरभरून पाठिंबा मिळाल्याचे ते म्हणाले. या यात्रेत काँग्रेसबरोबर युती केलेल्या रेव्हुलेशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनीही अधुनमधून येऊन यात्रेत भाग घेतल्याची माहितीही चोडणकर यांनी दिली.
कलम 39-ए रद्द करू ः युरी
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना, राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर जमीन रुपांतरणासाठीचे 39-ए हे कलम रद्ध करण्यात येईल. पक्षाची ‘गोवा राखण यात्रा’ ही एक लोकचळवळ असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपचे सरकार हे एक इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असल्याचा आरोपही यावेळी बोलताना आलेमाव यांनी केला. जमीन घोटाळे, पर्यावरणाचा प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार, कचरा समस्या, पाणी टंचाई आदी प्रश्नांवरून राज्यातील जनता त्रस्त असून या लोकांकडून यात्रेला प्रचंड प्रतिसाद अपेक्षित असल्याचे आलेमाव यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही गोवा रक्षण यात्रेला उत्तर गोव्यात जो प्रतिसाद मिळाला त्याविषयी आनंद व्यक्त केला.
राहुल गांधी, पवन खेडा
डी. के. शिवकुमार येणार
काँग्रेस पक्षाच्या गोवा रक्षण यात्रेचा उत्तर गोव्यात काल समारोप झाला असून आता दक्षिण गोव्यात ही यात्रा सुरू झाली आहे. आता या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे अन्य एक नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पावन खेडा व अन्य नेते सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आपने भाजपवरही टीका करावी : पणजीकर
काँग्रेस पक्षावर रोज टीकेचा हल्ला करणाऱ्या आम आदमी पक्षाची जीभ भाजपवर टीका करण्यास का घाबरते, असा सवाल काल काँग्रेस पक्षाने केला. एका बाजूला आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस हे काँग्रेसला विरोधी आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन करतात, तर दुसऱ्या बाजूने आपच्या अधिकृत गोवा पेजवरून काँग्रेसची खिल्ली उडवली जाते, असे सांगून हा दुटप्पीपणा, असल्याचा आरोप काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी काल केला.
आपचे नेते अरविंद केजरीवाल हे गोव्यात ‘गोवा फर्स्ट’ची भाषा करत आहेत. पण सध्या आपचे राजकारण पाहता गोवा फर्स्ट की भाजप फर्स्ट असा प्रश्न पडत असल्याचे पणजीकर म्हणाले. गोव्यात सरकार भाजपचे आहे. मात्र, आम आदमी पक्ष टीका मात्र काँग्रेसवर करीत आहे, असा आरोप पणजीकर यांनी काल केला.
एका हातात युतीची विनंती आणि दुसऱ्या हातात काँग्रेसविरोधी तलवार असे सांगून हे गोवा फर्स्ट नव्हे तर हा राजकीय संधीसाधूपणा आहे, असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.

