डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोकांनी गोव्यात हजेरी लावली. त्यात प्रामुख्याने होते ते देशी पर्यटक. उत्तर व दक्षिण भारतातून आलेल्या या पर्यटकांना पर्यटन क्षेत्रातील लोकांनी अक्षरश: लुबाडून स्वत:ची चांदी केली. या लोकांची लुबाडणूक करण्याच्याबाबतीत आघाडीवर होते ते हॉटेल, रेस्टॉरंट व शॅकवाले. खासगी विमान कंपन्या व बस कंपन्या यानीही आपल्या तिकिटांचे दर कधी नव्हे एवढे वाढवल्याने पर्यटकांचे डोळे पांढरे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रतिनिधीशी बोलताना कर्नाटकमधून आलेल्या काही युवकानी सांगितले की आम्ही ३० रोजी सकाळी गोव्यात पोचलो. कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये आम्ही खोल्याचे आगाऊ आरक्षण केले होते, मात्र, आम्ही सकाळी ११ वा. तेथे पोचलो असता खोल्या नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे खोल्यांसाठी आमची वणवण सुरू झाली. शेवटी एका हॉटेलातील व्यवस्थापकाने खोल्या देण्याची तयारी दाखवली. मात्र, २ हजार रु.च्या खोलीसाठी ७ हजार रु. मोजावे लागतील असे सांगितले. आम्ही तीन मित्र होतो. नाईलाजाने आम्हाला ती खोली घ्यावी लागली. नंतर संध्याकाळी समुद्र किनार्यावर कर्नाटकातील काही पर्यटक भेटले असता त्यानाही असेच फसवण्यात आल्याचे कळून आल्याचे ते म्हणाले. खोल्या असतानाच खोल्या नसल्याचे भासवून दाम दुप्पट दरात त्या भाड्याने देण्याचे कारस्थान हॉटेलवाले रचत असल्याचा त्यानी आरोप केला.
किनारपट्टीवरील शॅक्समध्ये जाऊन काही खायची सोय राहिली नाही, अशा प्रतिक्रियाही पर्यटकांकडून ऐकायला मिळाल्या. एक लिटरच्या मिनरल वॉटरची बाटली ४० ते ५० रु. या दराने विकल्या जात होत्या. जेवणाचे दर तर सामान्यांना परवडण्यासारखे नव्हते, असे पर्यटकांचे म्हणणे होते. काही हॉटेल व रेस्टॉरंटवाल्यानी विशेष पार्ट्यांचे आयोजन केले होते. त्यासाठी एका-एका माणसामागे १० ते २० हजार रु. पर्यंत शुल्क आकारण्यात येत होते, अशी माहितीही काही जणांनी दिली.
रिक्षा व टॅक्सीवाल्यानीही लुबाडले
नव्या वर्षासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांना रिक्षा व टॅक्सीवाल्यानीही जबर लुबाडल्याच्या तक्रारी ऐकू येत आहेत. मडगांव येथून माजोर्डे जाण्यासाठी (२० कि. मी.) एका टॅक्सीचालकाने एका पर्यटक जोडप्याकडून १२०० रु. घेतल्याची माहिती हाती आल्याचे एका युवकाने सांगितले. तारांकित हॉटेलांपासून अतारांकीत हॉटेवाल्यानीही नववर्षासाठीची पर्यटकांची गर्दी पाहून पर्यटकांना जाम लुबाडल्याच्या सुरस कथा ऐकू येऊ लागलेल्या आहेत.
या सगळ्या धामधूमीत बारवाले, रेस्टॉरंटवाले, हॉटेलवाले, शॅक्सवाले आदीनी प्रचंड पैसा कमावल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तर गोव्यात कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूण, हरमल व मांद्रे तर दक्षिण गोव्यात पाळोळे, कोलवा, आगोंद, बेताळभाटी आदी किनारे नववर्षाच्या स्वागतासाठीचे हॉट स्पॉट ठरल्याची माहिती सूत्रानी दिली.

