केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह;
एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासाच्या पानांतून सुटता कामा नये;
हुतात्मा स्मृती स्मारकाचे उद्घाटन
पत्रादेवीचा सत्याग्रह हा गोव्याच्या मुक्ती लढ्यामधील भारताच्या एकतेचे प्रतीक होता. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक गोव्यात आले होते. 1946 मध्ये गोव्याच्या मुक्तीसाठी लढा देण्याकरिता सुमारे 10 हजार स्वातंत्र्यसैनिक पत्रादेवी येथे एकत्र आले होते. ज्यांनी गोवा मुक्ती लढ्यात प्राणांचे बलिदान दिले, त्या जवळपास सर्वांची नावे हुतात्मा स्मृती स्मारकावर कोरलेली आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रादेवी येथील नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मृती स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना काल केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई व इतरांची उपस्थिती होती.
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेकांनी आपले सर्वस्व पणाला लावले. अनेकांनी तुरुंगवास, छळ आणि हालअपेष्टा सहन केल्या, तर काहींनी प्राणांची आहुती दिली. मात्र या संघर्षातील प्रत्येकाचे योगदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचले आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. इतिहासाच्या नोंदींमध्ये एखाद्या हुतात्म्याचे नाव राहून गेले असेल, तर त्याचा शोध घेऊन त्याला योग्य स्थान मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
गोवा मुक्ती लढ्यात बलिदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहासात योग्य सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने सखोल संशोधन केले पाहिजे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांची नावे केवळ दस्तऐवजांपुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्मरणात राहावीत, यासाठी त्यांची नावे दगडावर कोरली जावीत, अशी अपेक्षाही संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे भावी पिढ्यांना गोव्याचे स्वातंत्र्य सहज मिळालेले नसून त्यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष आणि बलिदान आहे, याची जाणीव कायम राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास केवळ 1946 पासून सुरू झाला, असे मानणे योग्य ठरणार नसल्याचे नमूद केले. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोमंतकीयांचा प्रतिकार त्याहीपूर्वी अनेक वर्षे सुरू होता. या प्रदीर्घ संघर्षातील विविध घटना, आंदोलने आणि बलिदानांचा समग्र इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी कुंकळ्ळीच्या ऐतिहासिक उठावाचा विशेष उल्लेख करत गोमंतकीयांच्या पोर्तुगीज सत्तेविरोधातील प्रतिकाराची परंपरा खूप जुनी असल्याचे अधोरेखित केले. 1946 मधील आंदोलनाने मुक्तिलढ्याला नवी दिशा आणि व्यापक स्वरूप मिळाले; मात्र त्यापूर्वीच्या संघर्षांचे योगदानही तितक्याच गांभीर्याने इतिहासात नोंदवले गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
केवळ सेल्फीसाठी स्मारकाला भेट देऊ नका!
पत्रादेवी स्मारकाला केवळ सेल्फीसाठी भेट देऊ नका, तर त्यातून प्रेरणा घ्या. पत्रादेवी हुतात्मा स्मृती स्मारक हे भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. स्मारकाला केवळ सेल्फी काढण्यासाठी भेट देऊ नये, तर प्रेरणा घेण्यासाठी, नवी ऊर्जा मिळवण्यासाठी आणि देशाला पुढे कसे न्यायचे हे शिकण्यासाठी भेट द्या, असे आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
1946 च्या आधीपासून गोव्याचा लढा
पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोव्याचा लढा 1946 च्या आधीच सुरू झाला होता. गोव्यातील प्रतिकाराचा एक सुरुवातीचा टप्पा म्हणून ऐतिहासिक ‘कुंकळ्ळी उठाव’चा उल्लेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी येथील ‘हुतात्मा स्मृती स्मारक’ हे स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण आजच्या पिढीला करून देते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

