26 C
Panjim
Monday, January 18, 2021

गोवा मुक्तीच्या उंबरठ्यावर

  • प्रभाकर सिनारी

१९ डिसेंबरच्या रात्री लष्करी अधिकार्‍यांसमोर शरणागतीच्या औपचारिक दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि अशा तर्‍हेने साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांनी गोव्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत झाला. या काळात पोर्तुगीजांनी जे जे काही भारतीय आहे असे त्यांना वाटले ते ते सर्व म्हणजे इमारती, मंदिरे, साहित्य, संस्कृती, भव्य प्रासाद वगैरे सर्वच्या सर्व उध्वस्त करून टाकले. शेकडो वर्षांच्या या दडपशाहीनंतरही गोमंतकीयांनी दिलेला हा लढा सामान्यांचा नव्हता. मुक्तिदिनी मी सगळ्यात आनंदी व्यक्ती असल्याचे मला जाणवत होते.

गोव्यावरील संकटांच्या बाबतीत भारत सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचे बदल घडून येण्याची चिन्हे मध्यंतरी दिसायला लागली. तत्कालीन वरिष्ठ भारतीय पोलीस अधिकारी श्री. जी. के. हांडू, जे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षादलाचे मुख्य होते आणि त्यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून गणले जायचे. त्यांच्याकडे गोवा, दमण आणि दीव हद्दीचा ताबा होता. १९६१च्या आरंभास कधीतरी त्यांनी मला निरोप पाठवला आणि तातडीने मुंबईच्या त्यांच्या कचेरीत येऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार मी मुंबईला जाऊन हांडूना भेटलो. त्यांना गोव्याच्या परिस्थितीबाबतीत प्रत्यक्षदर्शी माहिती जाणून घ्यायची होती. मी त्यांना आमच्या संघटनेचे गोवा, दमण आणि दीवमधील कार्य, तसेच पोर्तुगीजांचे गोमंतकीय जनतेवरील अत्याचार आणि दडपशाही याविषयी इत्थंभूत माहिती पुरवली. त्यानंतर त्यांनी मला जे काही सांगितले त्याच्यामुळे माझे विचारचक्र फिरायला लागले. त्यांनी म्हटले, ‘‘प्रभाकर हे पहा, आम्ही या वर्षाच्या अखेरीस (१९६१) अथवा नव्या वर्षाच्या आरंभास कोणत्याही परिस्थितीत गोव्यात शिरकाव करू’’. त्यांनी माझा एकेरी नावाने उल्लेख केल्यामुळे मी आश्‍चर्यचकित झालो. त्यांनी आश्‍वासन देऊन मला जिंकून घेतले होते. जेव्हा त्यांनी गोवा १९६१-६२मध्ये मुक्त होणारच, असे सांगितले तेव्हा त्यांच्या आवाजात मला प्रखर आत्मविश्‍वास जाणवला.

मला नेहरूंच्या धोरणाबाबतीत अजून शंका होती. कारण ते शांततापूर्ण समेट घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते ज्यामुळे पोर्तुगीजांना प्रोत्साहन मिळत होते. भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ १४ वर्षांचा काळ लोटला होता आणि आम्हाला गुलामगिरीत जगण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं. भारतास स्वातंत्र्य लाभल्यानंतर गोव्याच्या वाट्यास कधी नव्हे तितक्या हालअपेष्टा आल्या असल्याचे मी त्यांच्या नजरेस आणून दिले. पोर्तुगीजांनी भारतीय सार्वभौम देशाचे डझनावर सत्याग्रही मारले होते आणि ते भारतीय हद्द म्हणजे जणूकाही आखाती देशाची हद्द असल्याप्रमाणे वागत होते आणि भारताने याबाबतीत नेहमीच दुर्लक्ष केल्याचे मी त्यांना सांगितले. मला आश्‍वस्त करत हांडू मला म्हणाले, ‘‘प्रभाकर, आता ते सगळे विसर. आता आपल्याला आपले लक्ष्य साध्य करण्याकरिता कठीण परिश्रम करायचे आहेत. या संदर्भात तुला वरचेवर मला भेटावं लागेल आणि तुझ्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे’’, ऐकून मी हरखून गेलो. भारताचे हे आश्‍वासन मी जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना आणि गोमंतकीय जनतेस सांगावे असे त्यांनी मला सांगितले. मी प्रचंड आशा-अपेक्षा घेऊन गोव्यात परतलो. त्यांनी मला काही शस्त्रसाठा देऊन गोव्यातील आमच्या आंदोलनास मदतही केली. आता मला काहीतरी घडणार असल्याची चाहूल लागली होती. लष्कराच्या वर्तुळात वारंवार घडून येणार्‍या उच्चस्तरीय बैठका याचे द्योतक होते. गोवा, दमण आणि दीवच्या भौगोलिक आणि स्थानिक भूआराखड्याची माहिती विशेष आस्थेने गोळा करण्यात येत होती.

त्यांनी मला मोलेच्या पोर्तुगीज लष्करवजा पोलीसचौकीपासून भारतीय हद्दीवरील अनमोड घाटाच्या संपूर्ण परिसराचा आलेख गोळा करण्याची विनंती केली. गोव्यात आता चळवळीने गती घेतली होती. ऑगस्ट १९५४ पासून मोठ्या प्रमाणात सत्याग्रहास आरंभ झाला होता आणि कितीतरी सत्याग्रहींनी गोव्याच्या सर्व हद्दींवरून गोव्यात प्रवेश केला होता. मुक्तिलढ्याची गती दिवसेंदिवस झपाट्याने वाढली होती आणि भारत सरकारची फौज मध्यस्थीसाठी कोणत्याही क्षणी घुसेल याची भीती पोर्तुगीज साम्राज्यात पसरली होती. दादरा, नगरहवेलीचा मुक्तिलढा यशस्वी होण्याचे कारण म्हणजे भारतीय सेनेचा लाभलेला पाठिंबा असा त्यांचा विश्‍वास होता. भारतीय सेनेचा तळ बेळगावला होता. गोव्याला अत्यंत जवळ असलेला हाच एक लष्करी तळ होता आणि अनमोड आणि बेळगाव या दरम्यानचे अंतर फक्त ५० ते ६० किलोमीटर होते. त्यांनी कल्पना केली की गोव्यावर जर हल्ला झाला तर त्यात बेळगावच्या लष्करी अधिकार्‍यांचा समावेश असेल.

मला केलेल्या विनंतीनुसार मी चार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनमोड घाटातून गोव्यात प्रवेश केला. आमच्या असे लक्षात आले की अनमोड ते मोलेपर्यंतचा संपूर्ण १२किमीचा रस्ता डोंगर कोसळवून बंद करण्यात आलेला आहे. पोर्तुगीजांनी सर्व रस्ते उध्वस्त करून वापरासाठी निरुपयोगी करून टाकले होते. माझे काम होते ह्या सर्व रस्त्यांचे आणि त्यावर पडलेल्या खड्‌ड्यांचे त्यांच्या लांबी-रुंदीसह फोटो काढायचे. आमच्यापुढे अडचण होती ती म्हणजे आम्ही कॅमेर्‍याच्या फ्लॅशचा वापर करू शकत नव्हतो कारण त्याचा प्रकाश मोलेपर्यंत दृष्टीस पडला असता आणि तेथे तळ ठोकून असलेल्या पोर्तुगीज लष्कराच्या ते लक्षात आले असते. तेथे त्यांचे लष्कर जय्यत तयारीनिशी तळ ठोकून होते आणि त्यांच्यापाशी रणगाडेसुद्धा होते. त्यामुळे आम्हाला मोलेजवळील जंगलात सूर्योदय होईपर्यंत प्रतीक्षा करत थांबावे लागले आणि नंतरच उध्वस्त करण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्‌ड्यांचे सर्व बाजूंनी फोटो काढले. सांब्रे, बेळगावच्या राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडर श्री. एस.एस. जोग हे आमच्याशी संपर्क साधून होते. त्यांना आणि इतर लष्करी अधिकार्‍यांना आमचे फोटो आणि इतर काम अत्यंत स्तुतीपात्र भासले. जर आता कोणतीही कृती करावयाची झाल्यास ती अनमोडमार्गेच केली जाईल याची मला कल्पना आली. त्याप्रमाणे त्यांनी हिशेब करून ते रस्ता रणगाडे आणि इतर यंत्रे गोव्यापर्यंत सहजपणे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी कॅटरपिलर तसेच बुलडोझरची व्यवस्था करण्याच्या कामाला जुंपले.

गोव्यावर करण्यात येणार्‍या लष्करी कारवाईच्या योजनेस ‘ऑपरेशन विजय’ असे जरी नामकरण करण्यात आले होते तरी त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. तरी मला खात्रीपूर्वक जाणीव होती की लष्करी कारवाई करताना अनमोडच्या बाजूने मुसंडी मारणे अत्यंत योग्य आहे. त्याचबरोबर श्री हांडू आणि लष्कराचे इतर उच्चपदस्थ अधिकारी नद्या, पूल यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करत असल्याचीही मला जाणीव होती. आम्ही भूमिगत कार्यकर्ते अगदी उचंबळून आलो होतो आणि भारत सरकारने गोव्याच्या मुक्तीचा प्रश्‍न गांभीर्याने घेतल्याचे, तसेच कुठल्याही क्षणी कृती करण्यात येईल याची आम्हाला खात्री झाली होती. आमच्यावतीने आम्ही पोर्तुगीजांच्या साधनसुविधांवर जेथे जेथे शक्य आहे तेथे हल्ला करण्याची संधी घेतली. मडगावच्या मोंते टेकडीवर लष्करी तळ होता. तेथील काही आस्थापनांची आम्ही हल्ला चढवून नासधूस केली. रावणफोंड, बाळ्ळी-केपे, काणकोण तसेच इतर ठिकाणच्या सैनिकी चौक्यांवर हल्ले केले. आमचा उद्देश त्या ताब्यात वगैरे घ्यावयाचा नव्हता तर त्यांच्या सशस्त्र दलाचे नीतिधैर्य खच्चीकरण करण्यासाठी त्यांना उसकवण्याचा तो प्रयत्न होता. या दरम्यान पोर्तुगीजांनी सर्व पूल आणि रस्त्यावरील लहान-मोठे साकव वगैरे उडवून टाकण्याच्या उद्देशाने जागोजागी सुरंग पेरून ठेवले. भारत सरकारने काही कृती केलीच तर पूल उडवून देण्याचा त्यांचा हा कट होता, ही गोष्ट लपून राहिली नव्हती. पोर्तुगीजांनी खाण कंपन्यांचे पन्नासपेक्षा अधिक ट्रक आणि त्यांच्यापाशी उपलब्ध असलेली संपूर्ण स्फोटके गोळा करून संभाव्य वापरासाठी जवळ ठेवली होती.

यावेळी नेहरूंना पोर्तुगीज वसाहतवाद शक्य तितक्या लवकर नामशेष केला जावा या मताच्या देशांतर्गत जनतेकडून, त्याचप्रमाणे कित्येक आफ्रिकी राष्ट्रवादी तसेच अलिप्त राष्ट्रांच्या नेत्याकडून येणार्‍या दबावास जबरदस्त तोंड द्यावे लागले होते. दिल्लीत घेण्यात आलेल्या गोमंतकीय सर्वपक्षीय बैठकीतसुद्धा लवकरात लवकर लष्करी कारवाईच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला होता. पोर्तुगीज सरकारने सगळ्या स्तरांवर रणगाडे, सशस्त्र वाहने आणि पलटणीचे संचलन शहरात सुरू केल्याची कल्पना भारत सरकारला होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पणजी, वास्को त्याचप्रमाणे इतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच नोव्हेंबर महिन्यात सियाटो राष्ट्रसंघातील अमेरिकन, ब्रिटीश, तुर्की, पाकिस्तानी आणि इराणी आरमार गोव्यापासून १५० मैल अंतरावरील अरबी समुद्रात होणार्‍या नाविक कवायतीत भाग घेणार होते. अशा या पार्श्‍वभूमीवर भारत सरकार नजदीकच्या काळात संभवणार्‍या कुठल्याही गोष्टीसाठी तयार होते. अत्यंत वेगाने घटना घडत होत्या. परंतु कोकणीत ‘काळ आयलो पूण वेळ येवंक नासलो’ म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती… असे जे म्हटले जाते त्याप्रमाणे भारत सरकार योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते आणि ती संधी लवकरच चालून आली.

१७ नोव्हेंबर १९६१ रोजी साबरमती नावाचे प्रवासी जहाज मुंबईहून कारवार मार्गे मंगळुरला जात असताना त्यावर अंजदीव बेटावरील पोर्तुगीज सैन्याने गोळीबार केला. एक गोळी जहाजावरील एका अधिकार्‍यास लागून तो जखमी झाला. सदर घटनेमुळे भारतीय आरमाराच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. भारत सरकारने ताबडतोब त्या भागात गस्तीकरता लढावू गलबते पाठवली. पोर्तुगीजांनीसुद्धा आल्बकेर्क नावाचे आपले लढाऊ गलबत अंजदीव बेटावर पाठवले. अंजदीव बेटावरील पोर्तुगीज सैन्याला भारत सरकारकडून सुडाचा हल्ला होण्याची भीती वाटू लागली. हल्लेखोर जहाजातून नव्हे तर लपत छपत इतर मार्गाने बेटावर प्रवेश करतील अशीही त्यांना भीती वाटली. जवाहरलाल नेहरूंच्या लोकसभेतील वक्तव्यामुळे यात भरच पडली. हा सगळा प्रकार कधी घडला तर जेव्हा सुरमई (विसवण)सारखे महागडे मासे त्या बेटाजवळ पकडण्याचा काळ होता तेव्हा. नेहमीप्रमाणे भारतातील माजाळी गावातील मच्छीमार आपल्या होड्यातून रात्रीच्या वेळी अंजदीव बेटाजवळील भागात गेले होते.

तेव्हा २४ नोव्हेंबर १९६१च्या रात्री बेटावरील पोर्तुगीज सैन्याने काही होड्या बेटाच्या दिशेने येताना बघितल्या. त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात आत्माराम कोचरेकर नावाच्या मच्छीमाराच्या मांडीत गोळी घुसली. त्यामुळे जोराने रक्तस्राव सुरू झाला. समुद्र खवळलेला असल्याने होडी किनार्‍यावर नेण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागला. जेव्हा त्याला किनार्‍यावर आणले तेव्हा पहाटेची साडेचारची वेळ झाली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि तो मेला. खरं म्हणजे जखम त्याच्यावर मृत्यू ओढवण्याएवढी गंभीर नव्हती. परंतु त्या मच्छिमार्‍याला रक्त थांबवण्यासाठी काळजी कशी घ्यावी याचे ज्ञान नसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ही घटना म्हणजे आम्हा भूमीगत कार्यकर्त्यांचे कृत्य असा लोकांचा समज तेव्हा झाला होता आणि आजपावेतो तो कायम आहे. परंतु तो प्रकार पोर्तुगीजांच्या विनाकारण झालेल्या घबराटीमुळे घडून आला होता असा माझा दावा आहे.

भारत सरकारला कृती करण्यासाठी ही योग्य संधी होती आणि माझ्या आठवणीनुसार सदर घटनेच्या तिसर्‍या अथवा चौथ्या दिवसी हद्दीचे संरक्षण करणार्‍या राज्य राखीव पोलिसाला बिनतारी संदेश आला की लष्कराने कूच केलेली आहे. लष्करासाठी झांसी, आग्रा आणि इतर लष्करी केंद्रांवरून रेल्वेगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.
१४ डिसेंबर रोजी आम्ही ज्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होतो तो आदेश आला आणि १८ डिसेंबर रोजी लष्कराने गोव्यात कूच करण्यास आरंभ केला.

ऑपरेशन विजय

मी गोव्यात आमच्या कार्यकर्त्यांना आणि इतरांना भेटून एकंदर घटनेचारिपोर्ट श्री. हांडूंना देण्यासाठी माजालीला गेलो. मी आता आर्मी राजपूतांबरोबर राहावे असे त्यांनी सांगितले. तथापि १५ आणि १६ दरम्यानच्या काळात, आम्ही पर्तगाळ मठाजवळ मुख्य रस्त्यावर एक शक्तिशाली बॉंब पेरला होता. या रस्त्यावरील स्फोटात एक रणगाडा उध्वस्त होऊन तीन गोरे सैनिक ठार झाले होते. १७डिसें.च्या रात्री आम्ही एक कपट करायचे ठरवले. माजाळीत जे लष्कर उभे करण्यात आले होते त्याची शक्ती काही रेजिमेंटची नव्हती तर पूर्ण विभागाची म्हणजे जवळ जवळ २१ हजारच्या संख्येने सैन्य आणि साधनसामुग्री अशी होती. या विभागातील संपूर्ण मनुष्यबळाला जेवण तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने पाकखाने आणि चुली उभारण्यात आल्या होत्या. पण जमिनीवरील या रिकाम्या पाकखान्यातील फक्त जळण तेवढे दृष्टीस पडत होते. हे अशा प्रकारचे कपट अत्यावश्यक होते. कारण हद्दीवरील लष्करात पोर्तुगीज एजंट असायचे. आम्ही भूमीगत कार्यकर्त्यांनी ही संधी दवडली नाही. पोळेतील मुख्य पोलीस परदेशगमन चेकपोस्ट उध्वस्त केला. आतापर्यंत इतर बहुतेक पोलीस चौक्या ओसाड पडल्या होत्या आणि त्यातील पोलीस गायब झाले होते.

सूर्यास्तावेळी आम्ही गोव्यात प्रवेश करत होतो तेव्हा मी नेतृत्व करणार्‍या वाहनात, शक्तिमान ट्रकमध्ये होतो. आमचे कितीतरी कार्यकर्ते आमच्यापुढे कधी चालत तर कधी लष्करी वाहनातून संचलन करत होते.आम्ही सकाळी ८ वा. पैंगिणी गावात पोहचत आलो होतो. तेव्हाच आमच्या कानावर एक प्रचंड धमाका आला. पोर्तुगीजांनी अर्धा फोंड पूल उडवल्याचा तो पुरावा होता. तो पोळे ते मडगाव मार्गावरील महत्त्वाचा पूल होता. आमचे कार्यकर्ते त्या भागात संचलन करत असताना मी पोर्तुगीज पकडत असलेल्या मोरसे (बिनतारी) सिग्नलचा सोध घेऊन पोर्तुगीजांच्या त्या भागातील अस्तित्वाचा शोध लावण्यात यश मिळवले. सुमारे दहा सशस्त्र रणगाडे आणि वाहने बरीच आघाडीवर होती. त्यांनी अर्दाफोंड नदीच्या दुसर्‍या बाजूला झाडीत दबा धरला होता आणि आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मी त्वरित मागे धावलो आणि आमच्या लष्करास ज्याचे नेतृत्व मेजर नायर करायचे, त्यांना सावध केले. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या तुकडीस वाहन सोडून जागा घ्यायचा आदेश दिला.

आपल्या वाहनातून बाहेर उडी गेत ते आता जमिनीवर आपली जागा घेणार तोच जवळ जवळ १५ मिनिटांच्या आत पोर्तुगीजांचा हल्ला सुरू झाला. त्यांनी मोठे मोठे वृक्षसुद्धा वगळले नाहीत. ते मोडून आमच्यावर पडत होते. पोर्तुगीजांच्या मार्‍याची अचूक दिशा कोणती याचा तपास लावल्यानंतर थोडा काळ माघार घेतल्यासारखे भासणार्‍या भारतीय लष्कराने रोखठोक जबाब द्यायला आरंभ केला. पोर्तुगीजांनी भारतीय मार्‍यास बेजबाबदारपणे उत्तर दिले. ते एवढ्या वेगाने गेले होते की नंतर आम्हाला त्यांची चिलखती वाहने उध्वस्त झालेल्या अवस्थेत सापडली. त्यांनी फक्त पलायन आरंभलं आणि काणकोणचं सैन्यसुद्धा मागे घेत शेवटी करमल घाटाच्या जंगलात जागा घेतली. आमच्या लष्करास आता अर्धाफोंड नदी ओलांडायची होती. माझ्या नेतृत्वाखाली १९५७ साली आम्ही या पुलावर आणि त्याच्या रक्षकांवर हल्ला केला होता. तो पूल तेव्हापासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी असुरक्षित गणला जात होता.

पोर्तुगीजांनी मागाहून नदीला एक बगलरस्ताही बांधला होता जो पावसाळ्यानंतर कोरडा पडत होता. मला या बगलरस्त्याची कल्पना होती. मी तो लष्करास दाखवला खरा पण तिथे सुरुंग पेरले असण्याची शक्यता माज्या लक्षातही आली नाही. आमच्या आरंभीचे वाहन या बगलमार्गावरून नदी ओलांडताना उडाले आणि त्यात वाहनचालक आणि दोन जवान शहीद झाले. आता आम्ही आमच्या मार्गावर थांबलो. मी ते सुरुंग काढून टाकण्यासाठी व्यवहार्य खुबी वापरण्याचे ठरवले. आम्हाला लोकांचे चांगले सहकार्य लाभत असल्याने आम्हाला दोन रेडे मिळणे कठीण नव्हते. आम्ही त्यांना मोठे लाकडी ओंडके बांधले आणि त्या मगलमार्गावरून त्यांना हाकलले. या प्रक्रियेत एक सुरुंग उडाला आणि दुसरा गावाच्या जोडरस्त्याला लागून असलेल्या चक्कीजवळ सापडला. त्या रेड्यांना लांब दोरखंडांनी बांधलेले असल्याने त्यांना काहीच इजा झाली नाही आणि नंतर त्यांच्या मागून संध्याकाळी ४ वाजता आम्ही काणकोणला, जिथे लष्कर रात्रीच्या वेळी तळ ठोकणार होते तिथे पोचलो.

दरम्यान संध्याकाळी ४ वा. काहीतरी अनपेक्षित घडून आले. उत्तरेकडून गोव्यात केलेली तुकडी मांडवी नदीच्या काठावरील बेती गावात पोहोचलीसुद्धा होती. आणि ती नदी ओलांडून पणजीत प्रवेश करण्यासाठी परवानगी मागत होती. आम्हाला ही सर्व माहिती बिनतारी संदेशातून उपलब्ध झाली होती. त्यांना आदेशाची प्रतीक्षा करण्यास सांगितले आणि सायं. ५ वा. नदी न ओलांडण्याचा, तसेच बेतीतच तळ ठोकून राहण्याचा त्यांना आदेश आला. नंतर संध्या. ६ वा. ते दुसर्‍या दिवशी सकाळी नदी ओलांडू शकतात असा संदेश आला. पोर्तुगीज सगळीकडे सशक्त प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने संपूर्ण योजनेचाच विचका झाला. मेजर जनरल सी. पी. कॅन्डेथ (७व्या विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग) ज्यांनी अवजड वाहने आणि ज्यात जमीन तसेच पाण्यातूनही जाऊ शकणार्‍या वाहनांचा ताफा होता त्यांच्या समवेत अनमोड घाटातून गोव्यात प्रवेश केला होता आणि १८ रोजी सायंकाळी मोले येथे पोचले होते. त्यांना उशीर होण्याचे कारण म्हणजे रस्त्यातून येताना त्यांना उडवून दिलेल्या पूलांची तसेच उध्वस्त केलेल्या रस्त्याची डागडुजी करून ते लष्करी वाहतुकीसाठी खुले करावे लागले होते. मेजर जनरल कॅण्डेथ हे पणजीत दुसर्‍या दिवशी करण्यात येणार्‍या मुख्य हल्ल्याचे म्होरके होते आणि मांडवी नदीकाठावर तोपर्यंत येऊन ठेपलेल्या इतर तुकडीस कामं सोपवण्याची त्यांची जबाबदारी होती.

१९ डिसेंबरला सकाळी राजपूतांनी मडगावला निघण्यासाठी काणकोण सोडले. मध्यंतरी पोर्तुगीजांनी कित्येक वृक्ष पाडून करमल घाटातील रस्त्यावर कित्येक ठिकाणी अडथळे निर्माण केले होते. त्यांनी भूसुरंग फक्त रस्त्यांवरच नव्हे तर झाडांच्या फांद्या टाकून जिथे जिथे बालिश सापळे उभारले होते तिथेसुद्धा
ते पेरून ठेवले होते. त्यामागचा हेतू असा होता की तो सापळे दूर करताना सुरुंगाचा स्फोट होऊन शत्रू ठार होतील. त्याचप्रमाणे त्या बालीश सापळ्यांच्या आत आणखी बालीश सापळे तयार करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने राजपूतांनी आपल्या समवेत बॉंब निकामी करणारे पथक आणले नव्हते. सुदैवाने ते बालीश सापळे आणि त्यात दडवलेले भूसुरुंग कसे शोधून काढावे याची खुबी मी जाणत असल्याने लष्करी वाहनासाठी मी रस्ते मोकळे केले. रस्त्यातून पुढे सरकत असताना करमल घाट काढल्याबरोबर आम्हाला वाटेत उध्वस्त केलेला एक महत्त्वाचा पूल आणि कित्येक रस्ते उखडलेल्या स्थितीत दिसले. आता पुढे कसे जायचे ही समस्या आमच्यापुढे उभी राहिली असतानाच लोकांनी दुसर्‍या बाजूला ट्रक आणून उभे केले. त्यांचा वापर करून लष्कराने १९ डिसेंबरच्या संध्याकाळी सरळ मडगाव गाठले आणि मडगाव पोलीस मुख्यालय तसेच इतर सरकारी इमारती ताब्यात घेतल्या.

पोर्तुगीज लष्कर आतापर्यंत वेर्णेला पोहचले होते आणि तिथून वास्कोच्या दिशेने कूच करत होते. त्यांचा समज होता की सालाझार त्यांच्या सुटकेसाठी जहाजांची व्यवस्था करील. त्यांच्या समवेत पोर्तुगीज गव्हर्नर वासाल-द-सिल्वा हेसुद्धा वास्कोत सापडले. खरं म्हणजे तो निष्फळ प्रयत्न होता. त्याचबरोबर त्याच संध्याकाळी गव्हर्नर वासाल-द-सिल्वा यांनी १९ डिसेंबरच्या रात्री लष्करी अधिकार्‍यांसमोर शरणागतीच्या औपचारिक दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि अशा तर्‍हेने साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांनी गोव्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत झाला. या काळात पोर्तुगीजांनी जे जे काही भारतीय आहे असे त्यांना वाटले ते ते सर्व म्हणजे इमारती, मंदिरे, साहित्य, संस्कृती, भव्य प्रासाद वगैरे सर्वच्या सर्व उध्वस्त करून टाकले. काहीच वगळले नाही. शेकडो वर्षांच्या या दडपशाहीनंतरही गोमंतकीयांनी दिलेला हा लढा सामान्यांचा नव्हता. मुक्तिदिनी मी सगळ्यात आनंदी व्यक्ती असल्याचे मला जाणवत होते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

उरल्या सगळ्या त्या आठवणी…

सोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात...

शाणी

प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव- वाळपई) आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले...

विश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद

डॉ. लता स. नाईक ‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा...

अहंकाराचा वारा न लागो …

ज.अ. रेडकर.(सांताक्रूझ) गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज...

निराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया

सुरेखा दीक्षित आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका...