>> तीन दिवसांच्या महोत्सवाला चित्रपट रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
>> महोत्सवात ‘आकडा’ चित्रपटाचा प्रीमिअर
विन्सन वर्ल्ड आयोजित 15 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी आमदार नीलेश काब्राल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. समारोपाला शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आकडा या चित्रपटाचा प्रीमियर झाला. यावेळी त्यातील प्रमुख भूमिका साकार केलेल्या दीप्ती धोत्रे उपस्थित होत्या. विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये व श्रीपाद शेट्ये यांनी त्यांचा सन्मान केला.
आकडा चित्रपट पिंपरी गावात आकडा लावून चोरून वीज मिळवणाऱ्या गावची कथा होती. त्यातून वीज धक्क्याने दगावलेला बालक व एक म्हातारा, त्यामुळे त्या मुलावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारया महिलेला झालेले दुःख त्यातून नवऱ्याकडे मीटर बसवून कायदेशीर वीज घेण्याचा केलेला हट्ट आणि मीटर मिळवण्यासाठी नवऱ्याला, शासकीय सोपस्कार करतांना आलेले छळवादी अनुभव, लाचलुतपतीचे चटके आणि मीटर न बसवता आलेले भरमसाठ बील यातून त्याच्या संताप त्यातून त्याच्या गरोदर बाईवर बेतलेला प्रसंग असे कथानक अंतर्मुख करायला लावते.
यावेळी अभिनेत्री दीप्ती धोत्रे यांनी नवप्रभाच्या प्रतिनिधीशी बोलताना, या चित्रपटातील भूमिका कथानकामुळे खूपच भावली. वेगळा वास्तववादी विषय होता, दिग्दर्शक शिवाजी पाटील असे विषय छान हाताळतात. वेगळे काही करण्याची संधी मला लाभली असल्याचे सांगितले.
कौटुंबिक महोत्सव ः दीप्ती धोत्रे
गोवा चित्रपट महोत्सवाविषयी त्या म्हणाल्या, या महोत्सवात सहभागी होताना कौटुंबिक सोहळ्याला आल्यासारखे वाटते. उत्तम दर्जेदार आयोजन, आतिथ्य सगळे उत्कृष्ट असते. या महोत्सवात माझा भुंगा व इतर दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.
नीलेश काब्राल यांनी, सरकारी अनुदानाशिवाय हा एवढा मोठा महोत्सव संजय शेट्ये व त्यांचे बंधू उत्कृष्ट आयोजित करतात याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.
महोत्सवाला रसिकांची गर्दी
आयनॉक्समधील दोन थिएटर्स व मॅकॅनिझ पॅलेसमधील थिएटर रसिकांना पुरत नसल्याने अनेक प्रेक्षकांना सगळ्या चित्रपटांचा आस्वाद घेणे शक्य होत नाही अशी मोठी उपस्थिती या महोत्सवाला लाभली. रविवारी नीलेश नाईक दिग्दर्शित द्विधा, महेश मांजरेकर दिग्दर्शित पांघरुण, संतोष दवाखर दिग्दर्शित गोंधळ, समीर तिवारी दिग्दर्शित बाप्या, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित दुकान, विविध कोरे गावकर दिग्दर्शित तुंबाडची मंजुळा या चित्रपटांना प्रेक्षकांनी बरीच गर्दी केली होती. काहींनी उभे राहून चित्रपट पाहिले. बाप्या चित्रपटाने मनुष्य ही जात आणि मानवता धर्म आहे हा संदेश दिला.

