लक्ष्मण साईल
अलिकडे हैद्राबादला जाण्याचा योग आला. त्यावेळी तेथील प्रसिद्ध गोवळकोंडा किल्ला आठवला. अनेकांकडून त्याच्याविषयी ऐकले होते. थोडेफार वाचलंही होतं. पण प्रत्यक्ष पाहाण्याचा योग जुळला नव्हता. अचानक संधी मिळाली व जाणे निश्चित झाले. गोवा ते कोवळकोंडा हा प्रवास साधारण बाराशे कि. मी. अंतराचा आहे. संध्याकाळी बसमध्ये बसल्यास सकाळी हैद्राबादला पोहोचतो. रेल्वेने गेल्यास पूर्ण चोविस तास लागतात. वास्को रेल्वेस्थानकावरून सकाळी ७ वा. ट्रेन निघते ती दुसर्या दिवशी सकाळी पोचते. मध्यंतरी या प्रवासात तीन तासांचा खंड पडतो. कारण गोव्याहून निघालेल्या त्या ट्रेनचे फक्त दोनच डबे हैद्राबादपर्यंत जातात व ते आंध्रप्रदेशाच्या सीमेतच असलेल्या एका स्थानकावर दुसर्या ट्रेनला जोडले जातात. आधल्या रात्री मित्राकडे थांबून दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता हैद्राबादच्या दिशेने कूच केली. तिकीट पूर्वीच आरक्षित केलेले होते.
रेल्वेचा प्रवास त्यामानाने सोयीचा असतो. सोबत साथीदार असतील तर सोन्यासून पिवळं. काही मित्रांनी खासगी बसने जाण्याचा पर्याय सुचविला होता. पण मी मात्र माझ्या मताशी ठाम राहिलो. गोव्यातील ‘दूधसागर’ धबधबा प्रसिद्ध आहे. पर्यटकांचे ते मोठे आकर्षण बनलेले आहे. पण गोव्यात असूनही मला कधी तो पाहण्याची संधी मिळाली नव्हती. हे धबधबे साहित्यिकांना प्रेरणा देणारी निसर्गाची अद्भूत किमया आहे. १९९४ साली आशिया खंडातील सर्वांत मोठा ‘गेरसपा’ धबधबा पाहण्याची संधी मिळाली होती. सुमारे एक हजार फूट उंचीच्या खडकाळ पहाडावरून खाली शरावती नदीत कोसळणार्या त्या दुग्धवर्णी जलधारा व त्यातून उठणारे ते विलोभनीय तुषार पाहून मी स्तिमीत झालो होतो. रेल्वेतून जाताना दुधसागर धबधब्याचे ओझरते दर्शन झाले आणि स्मृतीच्या डायरीत नोंदलेला तो क्षण आठवल. नवीन अनुभव नेहमी जुन्या आठवणींना उजाळा देतात. म्हणूनच आजच्या या नव्या प्रवासात सुरूवातीपासूनच पूर्वीच्या प्रवासातील बर्याच गोड व कटू अनुभवांची स्मृतीचित्रे डोळ्यांसमोर उभी राहत होती.
धारवाड रेल्वेस्थानकावर पाच-सहा तरुणांची एक टोळी जागा शोधीत डब्यात शिरली. ते सगळे कानडीत संवाद करीत होते. मला ती भाषा अवगत असल्याने ते तरुण कर्नाटक विद्यापीठाचे पदव्यूत्तर विद्यार्थी असल्याचे समजले. वयानुरुप बरीच मजामस्करी करीत ते चालले होते. एकेकाळी मीही त्याच विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याने साहजिकच त्यांच्याशी संवाद साधण्याचा मोह आवरला नाही. ते सगळे हंपी दर्शनाला चालले होते. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले ते ऐतिहासिक शहर एकेकाळी वैभवाच्या शिखराव होते. आजमात्र ते अवशेष रूपाने शिल्लक आहे. अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्याने माझा इतिहास विषयाशी फारसा संपर्क आला नव्हता. पण पुढे शिक्षकी पेशात शिरल्यानंतर भुगोल व इतिहास या विषयांचा थोडा अभ्यास करावा लागला. त्यातून इतिहासाविषयी बरीच अभिरुची वाढली. कालांतराने अनेक ऐतिहासिक स्थळांनादेखील मुद्दामहून भेटी दिल्या. हैद्राबादला जाताना डोळ्यांसमोर तेथील गोवळकुंडा किल्ल्याबरोबरच अनेक ऐतिहासिक गोष्टी होत्या. अचानक त्या विद्यार्थ्यांच्या तोंडून हंपीचे नाव ऐकताच माझीही उत्सुकता चाळवली. काही वर्षांपूर्वी पं. जवाहरलाल नेहरुजींच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ ही दूरदर्शन मालिका पाहिली होती. त्यातून विजयनगर साम्राज्य व हंपी नगरी विषयी बरीच माहिती मिळाली होती. त्यामुळे जाताजाता हंपी दर्शनही करून जावे असा विचार मनात आला. त्यासंबंधी चौकशी केल्यावर त्या विद्यार्थ्यांनी प्रवास खंडित करण्याची मुभा असल्याचे सांगितले. तसेच दुसर्या दिवशी बसने पुढील प्रवास करण्याचा पर्यायही सुचवला. अधिक विचार न करता हॉस्पेट स्थानकावर उतरलो. तिथून हंपी फक्त बारा कि. मी. अंतरावर आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या तिथे वाहतून करीत असतात. संपूर्ण हंपी दर्शनासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या बसगाड्यांचीही खास सेवा उपलब्ध आहे. बसमधून जाताना बर्याच अंतरावरून सर्वप्रथम तेथील भव्य गोपुराच्या शिरोभागाचे दर्शन होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे या विराट गोपुराची उंची १६५ फूट आणि रुंदी अनुक्रमे १२० व १५० फूट आहे. तो अकरा मजली आहे. ‘बिस्तप्पय्या गोपूर’ म्हणून तो ओळखला जातो. कुणी व कधी त्यांची उभारणी केली या विषयी अद्याप काहीच माहिती उपलब्ध नाही. पण १५१० साली कृष्णदेवरायाने त्याचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. याशिवाय विरुपाक्ष मंदिर, पुरंदरदास मंडप,विजय विठ्ठल मंदिर,कडलेकल्लू गणपती, कृष्ण मंदिर, बडवी लिंग, उग्र नरसिंह, वीरभद्र मंदिर, कमल महल, हत्तीशाळा, राणीचा तरणतलाव इत्यादी मान्यताप्राप्त एकूण ३२ प्रेक्षणीय अवशेष आहेत. राजवाड्याभोवती विशेष शैलीने उभारलेला दगडी तटही अद्याप तिथे इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. तसा या परिसरातील प्रत्येक दगड हंपी नगरीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे आणि काहींना काही तो सांगत असल्याचा आभास होतो. तुळू घराण्यातील राजा कृष्णदेवरायाने विजयनगर साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोचवलं होतं आणि हंपी नगरीतील अनेक अवशेषही त्यांचाच इतिहास सांगतात.
१२१६ साली अल्लाउद्दीन खिलजीने यादवगिरीवर केलेल्या आक्रमणानंतर अवघ्या काही वर्षांतच बाहेरील आक्रमणकार्यांनी दक्षिण भारतात हाहाकार माजवला. हिंदू धर्म आणि संस्कृती धोक्यात आली होती. अशा बिकट समयी होयसळांच्या सेवेत असलेले संगमा घराण्याच्या हरीहर आणि बुक्का या दोन शूर योद्यांनी या साम्राज्याची नीव घातली.पुढे दोनशे वर्षे ते साम्राज्या अस्तित्वात राहिले. १५७१ साली दक्षिणेतील पाच मुसलमान शासकांनी संयुक्तपणे चहूबाजूंनी स्वारी करून त्याचा शेवट केला. हंपी नगरीतले सगळे लोक जीव वाचवण्यासाठी पळून गेले. पण त्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा अद्याप टिकून आहेत.
संपूर्ण हंपी दर्शनानंतर तिथल्या काही आठवणी साठवून दुसर्या दिवशी संध्याकाळी बस पकडून हैद्राबाद गाठले. हॉटेलात राहण्याची व्यवस्था करून सकाळी साडेनऊ वाजता गोवळकुंडाच्या ‘बाला हिसारा’ या पहिल्या प्रवेशद्वारावर पोचतो. त्याच्यासमोर एक मोठी भिंत आहे. त्याला ‘पडद्याची भिंत’ असे म्हटले जाते. युद्धकाळात सैन्य या पडद्याच्या भिंतीमागे राहून ‘बाल हिसारवर’ नजर ठेवीत असे. त्यानुसार पुढील सुरक्षा योजना आखली जायची. या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने वर एक छीद्र आहे. युद्याच्यावेळी शत्रूपक्षाचे हत्ती जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्यावर त्या छीद्रातून उकळलेले पाणी किंवा तेल ओतले जायचे. प्रवेशद्वार पार करून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला ‘कुतुबशाही हमाम’ (स्नानगृह) आहे. उजवीकडे नगीनाबाग लागते. १६८७ साली ज्यावेळी औरंगजेबाने हल्ला केला त्यावेळी कुतुबशाहाशी गद्दारी करून अब्दुल खान पन्नीने किल्ल्याचा पूर्वेकडील दरवाजा उघडा केला त्यावेळी मोठ्यघ शौर्याने लढलेल्या अब्दुल्ला रज्जाक व त्याचा घोडा रक्तबंबाळ स्थितीत याच बागेत पडले होते असे सांगितले जाते. दक्षिणेला एक मोठी कमान आहे. त्याला झोपाळे बांधून राजकुमार तथा राजकुमारी करमणुकीसाठी झोके घेत असत. ते झोपाळे बांधण्याचे छीद्र आजही पाहायला मिळतात. या नगिना बागेच्या डाव्या बाजूंना अंगरक्षकांचा निवास तसेच त्याच रांगेत पुढे दोन मजली पक्की इमारत आहे. ते मंत्री अकन्ना व मुदन्ना यांचे कार्यालय होते असे सांगितले जाते. कुतुबशाहीतील शेवटचे शासक अब्दुल हसान तानाशाह यांच्या कारकिर्दीत ते दोघे मंत्री होते. पुढे पायर्या चढून वर जाताना उजव्या बाजूला एक मोठी विहीर आहे. तीत कायमस्वरूपी झर्याचे पाणी असते. बाजूला एक इमारत आहे. तिला दोन वर्हांडे आहेत. त्याच्यावर बसून कुतुबशाहीतील राजे मनोरंजनासाठी निसर्गावलोकन करायचे. याशिवाय या किल्ल्यावर दरबारगृह, यल्लमादेवी मंदिर, रामदास तुरुंग, तारामती महल, प्रेमावती महल व अन्य अनेक छोट्यामोठ्या पक्क्या व कच्च्या इमारती आहेत. त्या काळातही या किल्ल्यावर प्रत्येक कक्षात पाणीपुरवठा करण्यासाठी केलेले नियोजन पाहून खरोखरच दाद द्यावी लागते.
गोवळकोंडा किल्ल्याची बांधणी एका मेंढपाळाच्या सांगण्यावरून वारंगलचे काकत्तिया शासक राजा प्रताप रुद्रदेव यांनी ११४९ साली कच्च्या स्वरूपात केली होती. ‘गोल्ला’ याचा अर्थ तेलगून मेंढपाळ तर ‘कोंडा’ याचा अर्थ टेकडी असा होतो. कालांतराने त्याला गोवळकुडा म्हणून संबोधू लागले. पुढे १५१८ साली कुबुतशाहीची स्थापना झाली आणि यातील पहिल्या तीन शासकांनी मिळून एकूण ६२ वर्षांच्या काळात त्याला पक्के स्वरूप दिले. १६४७ साली औरंगजेबाने गोवळकुंड्यावर दुसर्यांदा आक्रमण केले व तिथेच कुतुबशाहीचा शेवट झाला. या किल्ल्याला एकूण ९ प्रवेशाद्वारे आहेत व त्याची वेगवेगळी नावेही आहेत तसेच याच्या आवारात ८७ छोटी मोठी बुरुजं आहेत. त्याच्यावरून शत्रूवर दारूगोळा दागण्यासाठी तोफखानेदेखील ठेवलेले आहे. या बुरुजांची वेगवेगळी नावेदेखील आहेत. त्यामध्ये पेटला बुरुज, मोसा बुरुज व मजनून बुरुज प्रसिद्ध आहेत. ही नावे रुढ होण्यामागे काही कथाही आहेत. किल्ल्याची घेरी पाच मैल आहे तर ५२ खिडक्यांसह ४८ भुयारी मार्ग आहेत. असे सांगितले जाते की सुलतान मोहम्मद कुतुबशाह याच भुयारी मार्गाने आपली प्रेयसी भागामतीला भेटायला जात असे. तिच्याच नावे त्यांनी भागामती शहराचीही निर्मिती केली होती व पुढे त्यालाच हैदराबाद हे नाव रुढ झाले.
हैदराबादेत प्रेक्षणीय अशा अनेक गोष्टी आहेत. दोन-तीन दिवसांचाच मुक्काम असेल तर त्या सगळ्या स्थळांना भेटी देणे शक्य नाही. पण तिथपर्यंत गेल्यानंतर गोवळकुंडा, सालारजंग म्युझियम (वस्तूसंग्रहालय) व चारमिनार व रामोजी फिल्म सिटी न पाहात तसेच हैदराबादी मटन बिर्याणी न खाता येऊ नये. चारमिनार ही एक चर्तुभूज इमारत आहे. त्याच्या चारही कोपर्यांत चार उंच मिनार, अर्थातच कलात्मक स्तंभ आहेत. त्यांची उंची १८० फूट असल्याचे सांगितले जाते. त्याच्या शेवटच्या अर्थातच चौथ्या मजल्यावर एक मशीद आणि एक मदरसा आहे. वर जाण्यासाठी आतून पायर्या आहेत. साधारण १५९१च्या काळात या प्रेक्षणीय ऐतिहासिक वास्तूची निर्मिती झाली होती.
‘सालारजंग म्युजियम’ हा एक जगभरातील अनेक संस्कृती व सभ्यतेचा आरसाच आहे. देशातले ते एक मोठे शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थानही म्हणता येईल. मीर युसुफ खान सालारजंग यांची अभिरूची आणि सौंदर्याची आराधना याच्यातून हे वस्तूसंग्रहालय साकारलेले आहे. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगभरातील सुंदर वस्तू हेरून त्यांचा संग्रह करण्यामध्ये असलेली त्यांची भक्ती आणि श्रद्धा वंदनीय आहे. एका भव्य इमारतीत अनेक दालनांत विभागलेला हे वस्तूसंग्रहालय पाहाण्यास किमान तीन तास लागतात.
रामोजी फिल्म स्टुडिओ हे खास करून तरुण पीढीचे आकर्षण आहे. हैदराबादच्या टुरिष्ट गाईड पुस्तीकेत त्याचा उल्लेख सापडत नसला तरी ही चित्रनगरी अत्यंत प्रेक्षणीय आहे. रामोजी ही टोलीवूड व तेथील प्रसारमाध्यमातील एक बडी असामी आहे. त्याच्या विलक्षण कल्पकतेतून ही नगरी साकारलेली आहे. चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी जुन्या आधुनिक पद्धतीच्या इमारती व अन्य सर्व प्रकारच्या गोष्टी तिथे आहेत. तिथे गेल्यावर एखाद्या सुनियोजित सुंदर व स्वच्छ शहरात पोचल्याचा आभास होतो. पृथ्वीवरील जणू ते नंदनवनच असल्यासारखे वाटते. एका टेकडीवर नैसर्गिक परिसरात कमीत कमी ढवळाढवळ करून किंबहुना तो अधिक सुशोभित व आल्हाददायक बनवून खास चित्रपट निर्मितीसाठी हे छोटे शहर तयार केले गेले आहे. एखा खुल्या वाहनातून सविस्तर माहितीसहीत त्याचे संपूर्ण दर्शन घडवण्याची सोय तिथे केली जाते. तसेच चित्रपट निर्मितीची कला किती गुंतागुंतीची व पडद्यावरील कलाकारांव्यतिरिक्त किती कलावंताच्या विभिन्न कला त्यात पणाला लागलेल्या असतात याचे प्रत्यक्ष ज्ञानही तिथे दिले जाते. अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांचे चित्रिकरण याच चित्रनगरित झालेले आहे हे मला त्यावेळी कळले.
तीन दिवसांचा मुक्काम संपवून त्याच दिवशी संध्याकाळी मी रेल्वेस्थानकावर पोचला. परतीचे तिकीट ट्रेन सुटण्यापूर्वी तासाभराआदी निश्चित झाले की नाही ते कळणार होते. संगणकावर ते स्वत:च पाहायचे असते. त्याबाबतीत मी अज्ञानीच असल्याने अन्य एका प्रवाशाची मदत घेतली. ते निश्चित झाल्याचे कळताच जीव भांड्यात पडला. परतताना गोवा ते गोवळकोंडापर्यंतचा सगळा प्रवास आठवत होत. त्याचबरोबर हैदराबादी भाषेची गोडी व हैदराबादी बिर्याणीचा स्वादही विसरलो नव्हतो.
…………….