गोवा डेअरीचे 13 आजी-माजी संचालक अपात्र

0
11

>> सहकार सोसायटीच्या निबंधकांची मोठी कारवाई; तूर्त तीन सदस्यीय प्रशासकांच्या समितीकडे सहा महिने कारभार

एका महत्त्वाच्या घडामोडीत काल सहकार निबंधकांनी गोवा डेअरीच्या 13 आजी-माजी संचालकांना अपात्र ठरवले. या संचालकांमध्ये 6 विद्यमान संचालक, तर 7 माजी संचालकांचा समावेश आहे. विद्यमान संचालकांची संचालक मंडळावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. गोवा डेअरीच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गोवा डेअरीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार कुडतरी दुग्ध संस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी 11 सप्टेंबर 2019 रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती तक्रार सहकार निबंधकांकडे पाठवून यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सहकार निबंधकांनी गोवा डेअरीच्या 18 आजी-माजी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. प्रतिवाद्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सहकार निबंधकांनी काल आपला निवाडा दिला.
अपात्र ठरवण्यात आलेल्या आजी-माजी संचालकांमध्ये राजेश फळदेसाई, उल्हास सिनारी, विठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब, माधव सहकारी, माधवराव देसाई, राजेंद्र सावळ, धनंजय देसाई, शिवानंद पेडणेकर, बाबू कोमरपंत, अजय देसाई आणि अस्लेमा फुर्तादो यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर डॉ. नवसो सावंत यांनी गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असताना गैरकारभार करून जे नुकसान केले ते वसूल करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करावी. तसेच यासंबंधीचा अहवाल तयार करावा, असा आदेशही गोवा डेअरीला देण्यात आला आहे.

उरले केवळ चारच संचालक
सहा संचालकांना अपात्र ठरवले, तर माधव सहकारी व अनुप देसाई यांनी यापूर्वीच संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंडळावर श्रीकांत नाईक, उदय प्रभू, नितीन प्रभुगावकर व बाबू देऊ फालो हे चारच संचालक उरले आहेत. मात्र त्यांच्याकडे बहुमत नसल्याने प्रशासकीय समिती यापुढे गोवा डेअरीचा कारभार पाहणार आहे.

राजेश फळदेसाई काय म्हणाले?
गोवा डेअरीचे अपात्र ठरलेले संचालक व अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी या निवाड्याविषयी प्रतिक्रिया देताना सहकार निबंधकांनी दिलेला हा निवाडा लोकसाहीविरोधी असल्याचा आरोप केला. गोवा डेअरीवर सुमारे 5 ते 6 हजार दूध उत्पादक अवलंबून असून, हा निवाडा देताना त्यांचा विचार करण्यात आला नसल्याचे फळदेसाई यांनी म्हटले आहे.

निवाड्यास उच्च न्यायालयात आव्हान देणार
संबंधित प्रकरण हे 2017 साली झाले होते आणि त्यापूर्वीच दूध खरेदीचा निर्णय झाला होता. या प्रकाराला तत्कालीन प्रशासक जबाबदार आहेत. नाकारण्यात आलेल्या मालाची खरेदी त्यांच्याकडून करण्यात आली होती, असे फळदेसाई यांनी सांगितले. सहकार निबंधकांच्या आताच्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय समिती अध्यक्षपदी पराग नगर्सेकर
आता गोवा डेअरीच्या व्यवस्थापनाचे काम सांभाळण्यासाठी तीन सदस्यीय प्रशासकांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात अध्यक्षपदी पराग नगर्सेकर यांची, तर सदस्य म्हणून डॉ. राम परब व संदीप परब पार्सेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या काळासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. नव्या संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत ही समिती गोवा डेअरीचे कामकाज सांभाळणार आहे.

विद्यमान संचालक मंडळातील 6 जण अपात्र
विद्यमान संचालक मंडळातील 6 संचालक अपात्र ठरल्याने संचालक मंडळाकड आता बहुमत राहिलेले नाही. त्यामुळे ते बरखास्त करण्यात आलेले असून, दैनंदिन कारभार चालवण्यासाठी सरकारने त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे. विद्यमान संचालक मंडळातील अपात्र ठरवलेल्या संचालकांमध्ये अध्यक्ष राजेश फळदेसाई, बाबुराव देसाई, विजयकांत गावकर व उल्हास सिनारी यांचा समावेश आहे.