25 C
Panjim
Wednesday, September 30, 2020

गोवा ‘ग्रीन झोन’मध्ये कसं आलं?

  • बबन विनायक भगत

 

महाराष्ट्र व कर्नाटकमधील पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने गोव्यात येत असून काही दिवसांसाठी ती वाहने बंद करायला हवीत व त्यासाठी राज्याच्या सीमा सील करण्याचा विचार असल्याचे राणे यांनी १७ मार्च रोजी स्पष्ट केले होते आणि त्यानुसार गोव्याने आपल्या सर्व सीमा २५ मार्चपासून बंद केल्या. परिणामी परराज्यांतून येणारी वाहने बंद झाली आणि गोव्यात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका टळला!

 

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेलं गोवा ‘कोविड-१९’च्या आपत्तीवर विजय मिळवीत ग्रीन झोनमध्ये आलं, तेही अवघ्या २८ दिवसांत. सुपर पॉवर अमेरिका, युरोपी राष्ट्रे यांना सळो की पळो करून सोडणार्‍या कोविड-१९ या जागतिक आपत्तीवर गोव्याने मिळवलेला विजय ही सर्वांना थक्क करून टाकणारी अशीच गोष्ट आहे.

गोवा आकाराने (म्हणजेच भौगोलिकदृष्ट्या) लहान असल्याने ते ग्रीन झोनमध्ये जाऊ शकले असेही काहीजण म्हणतील. पण आकाराने ते जरी लहान असले तरी ते जगप्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे व पर्यटन मोसमात देशी-विदेशी पर्यटक मिळून लाखो पर्यटक या चिमुकल्या प्रदेशात येत असतात ही गोष्ट निश्‍चितच नजरेआड करता येणारी नाही.

गोवा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने कोविड-१९ विरुद्ध गोव्याला मोठा लढा द्यावा लागू शकतो असे तज्ज्ञांनाही वाटत होते; मात्र गोव्याने सुरुवातीच्या हलगर्जीपणानंतर कडक पावले उचलून कोविड-१९ ला राज्यात अक्राळविक्राळ असे रूप धारण करण्यापासून रोखण्यात यश मिळवले.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडून कडक निर्बंध

गोव्याचे तरुण व तडफदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व धडाडीचे असे तरुण व ऊर्जाशील आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे या व्यक्तींनी कोरोनाला राज्यात हातपाय पसरविण्याची संधीच दिली नाही. कोरोनाची चाहूल लागल्यानंतर आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन त्याविषयी राज्यातील जनतेमध्ये जागृती घडवून आणण्याचे काम केले. यावेळी राज्य सरकार सरकारी शिगमा व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठीच्या कामात व्यस्त होतं. पणजी, मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा, डिचोली, काणकोण आदी एकूण १८ ठिकाणी सरकारी शिगमोत्सवाचे वेळापत्रक तयार झाले होते. त्यापैकी पणजी, मडगाव तसेच अन्य काही शहरांतील शिगमोत्सव पारही पडला. प्रचंड गर्दीचे (दहा-दहा, पंधरा-पंधरा हजार लोक) हे शिगमोत्सव रद्द केले जावेत अशी मागणी होऊ लागली होती. हे कमी होते म्हणून की काय, सरकारने जिल्हा पंचायत निवडणुकांची तयारी करून त्याचे वेळापत्रकही तयार केले होते. त्याला आव्हान देत एका जागृत नागरिकाने न्यायालयातही धाव घेतली होती. नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर जिल्हा पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारच्या या हलगर्जीपणामुळे गोवा आता कोविड-१९ च्या विळख्यात सापडेल अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली होती. कारण मार्च महिना अर्धा संपलेला असतानाही गोवा सरकारने राज्यात कोणतेही निर्बंध लागू केले नव्हते. त्यामुळे जागृत लोक चिंता व्यक्त करताना दिसत होते.

१५ मार्चपर्यंत राजधानी दिल्ली व महाराष्ट्र राज्यासह १५ राज्यांत कोरोना विषाणूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. या विषाणूमुळे देशात दोनजणांचे बळीही गेले होते. याच पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कोविड-१९ ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली. नेमक्या त्याचवेळी म्हणजे १५ मार्च रोजीपासून ३१ मार्चपर्यंत खबरदारीचे उपाय म्हणून गोवा सरकारने राज्यातील सर्व शिक्षणसंस्था, कॅसिनो, क्रूझ बोट, जीम, जलतरण तलाव, सिनेमागृहे, स्पा, मसाज पार्लर्स आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा पंचायत निवडणुका

मात्र, खबरदारीचे उपाय म्हणून वरील सगळे काही बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या गोवा सरकारने २२ मार्च रोजी ठरलेल्या जिल्हा पंचायत निवडणुका मात्र घेण्याचा निर्णय घेऊन प्रचाराचे काम चालू ठेवल्याने सरकारवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. निवडणूक कर्मचार्‍यांच्या रक्षणार्थ सरकारने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली होती. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर निवडणूक अवघ्या दोन दिवसांनी पुढे ढकलून सरकारने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. मात्र, नंतर प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोविड-१९ आपत्ती दार ठोठावत असताना राज्य सरकार जिल्हा पंचायतीत मग्न राहिल्याने त्यावेळी सरकारची नाचक्की झाली होती. सरकारची अब्रू गेली होती. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांसह सिनेमागृहे, मॉल्स आदी बंद करण्याचा निर्णय घेतलेल्या सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २२ मार्च रोजी देशात ‘जनता कर्फ्यू’ लागू केला आणि गोवा सरकारने कोविड-१९ आपत्तीचे गांभीर्य ओळखून नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सरकारने वरील निर्णय घेतला.

१५ ते ३१ मार्चच्या लॉकडाऊनचा मोठा फायदा

१५ ते ३१ मार्च या दरम्यान गोव्याने राज्यात लॉकडाऊन करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा कोविड-१९ विरुद्ध लढा देण्याच्या बाबतीत गोव्याला मोठा फायदा झाला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे त्याचा वेळोवेळी उल्लेख करतात. हे लॉकडाऊन केले जावे असा प्रस्ताव आरोग्य खात्याकडूनच सरकारला पाठवण्यात आला होता. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी राज्यातील आरोग्यतज्ज्ञांशी केलेल्या चर्चेनंतरच सरकारला हा लॉकडाऊनचा प्रस्ताव पाठवला होता, आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला. परिणामी केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वीच गोव्यात लॉकडाऊन अमलात आले होते आणि त्याचा मोठा फायदा राज्याला मिळाला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च हा दिवस ‘जनता कर्फ्यू’ म्हणून जाहीर करण्यापूर्वीच गोव्यात एक प्रकारे लॉकडाऊन अस्तित्वात आले होते. केंद्राने त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे २५ मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित केले, जे १४ एप्रिलपर्यंत राहिले, तर त्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन १४ एप्रिल ते ३ मेपर्यंत लागू करण्यात आले. त्यानंतर थोडीशी शिथिलता देऊन ४ ते १७ मे या दरम्यान तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन मोदी यांनी लागू केले.

गोव्यातील सीमा बंद करण्याचा सर्वात मोठा फायदा

देशभरात व विशेष करून कर्नाटक व महाराष्ट्र या शेजारच्या राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्याच्या सीमा सील करायला हव्यात असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे म्हणणे होते, आणि सरकारने योग्य वेळी या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र व कर्नाटकमधील पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने गोव्यात येत असून काही दिवसांसाठी ती वाहने बंद करायला हवीत व त्यासाठी राज्याच्या सीमा सील करण्याचा विचार असल्याचे राणे यांनी १७ मार्च रोजी स्पष्ट केले होते आणि त्यानुसार गोव्याने आपल्या सर्व सीमा २५ मार्चपासून बंद केल्या. परिणामी परराज्यांतून येणारी वाहने बंद झाली आणि गोव्यात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका टळला.

तरी कोरोनाने गोव्यात शिरकाव केलाच!

कोरोना विषाणूंना गोव्यात शिरता येऊ नये यासाठी गोव्याने सर्वते प्रयत्न केलेले असतानाही या विषाणूने राज्यात शिरकाव केलाच.

गोव्यात कोरोनाचा संसर्ग झालेले एकूण सात रुग्ण सापडले होते. या सात रुग्णांपैकी केवळ १ रुग्ण हा गोव्यात राहणारा होता, तर अन्य सहा रुग्ण हे अन्य ठिकाणांहून आलेले होते. गोव्यात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण सापडले ते २५ मार्च रोजी. तद्नंतर आणखी ५ रुग्ण सापडले. शेवटचा रुग्ण ३ एप्रिल रोजी सापडला. या सर्व रुग्णांवर उपचार करून डॉक्टरांनी सर्वांना कोरोनातून मुक्त केले आणि राज्यात कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडल्याच्या दिवसापासून २८ दिवसांनी गोवा कोरोनामुक्त झाले. त्यामुळे गोव्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाला. १ मे रोजी गोव्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाला आणि तेव्हापासून आजतागायत गोवा कोरोनामुक्त आहे, असे आरोग्य संचालनालयातील साथींच्या रोगांच्या विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडेकर म्हणाले. गोव्यात अजूनही कुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही हीसुद्धा लक्षात घेण्यासारखी बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

डॉक्टर्स व परिचारिका यांचे योगदान मोठे

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील सरकारी डॉक्टर्स व परिचारिका यांनी दिलेले योगदान मोठे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी म्हटले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता या डॉक्टर्स व नर्सेसनी रुग्णांना वाचवण्यासाठी जे कार्य केले ते अतुलनीय असेच असल्याचे मत या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे.

विलगीकरणाकडे विशेष लक्ष

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती, त्यांचे गोव्यात काटोकोरपणे पालन केले गेले. विदेशांतून आलेल्या लोकांना तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सामाजिक विलगीकरणात ठेवण्याकडे सरकारने विशेष लक्ष दिले.

गोमेकॉची महत्त्वाची भूमिका

कोरोनावर विजय मिळवण्याच्या बाबतीत गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर्स व परिचारिका तसेच मडगाव येथील ईएसआय व हॉस्पिसियो इस्पितळातील डॉक्टर्स व नर्सेेस यांनीही खूप महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्यक्षात आघाडीवर जाऊन युद्धभूमीवर कोरोना नावाच्या शत्रूशी दोन हात करण्याचे काम जर कोणी केले असेल तर या डॉक्टर व नर्सेसनी. गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर, हॉस्पिसियोतील डॉ. ऍडविन, साथींच्या रोगांच्या विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडेकर आदींनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व डॉक्टर्स व नर्सेसना योग्य ते मार्गदर्शन केले.

एका महिन्याच्या आत वायरोलॉजी लॅब

संशयित कोरोना रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील वायरोलॉजी लॅबमध्ये पाठवावे लागतात व अहवाल मिळण्यास विलंब होतो म्हणून विश्‍वजित राणे यांनी ताबडतोब पावले उचलीत अवघ्या एका महिन्याच्या आत गोमेकॉत वायरोलॉजी लॅब उभारण्याचे शिवधनुष्य पेलले. त्यासाठी त्यांना अर्थातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मोलाची साथ लाभली. या वायरोरॉजी लॅबमध्ये काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेण्यास राणे यांनी गोमेकॉतील काही डॉक्टर्स व नर्सेसना पुणे येथील वायलोरॉजी लॅबमध्ये प्रशिक्षण घेण्यासही पाठवले.

विमानतळावरही खास लक्ष

मोदी सरकारने देशभरात लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी देश-विदेशांतून गोव्यात विमाने येत असत. या विमानांतून दाबोळी विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची तेथेच कोरोनासाठीची तपासणी व्हावी यासाठी राणे यांनी विमानतळावर धर्मल गन्स व थर्मल स्क्रिनिंगची सोय केली. या विमानातून विमानतळावर येणार्‍या देशी-विदेशी प्रवाशांची तेथे विमानतळावर योग्य तपासणी होते की नाही हे पाहण्यासाठी कित्येक वेळा- मध्यरात्रीही- त्यांनी दाबोळी विमानतळावर आकस्मिक भेट देऊन पाहणीही केली. त्यासाठीची परवानगी विमानतळ प्राधिकरणाकडून मिळवण्यातही त्यांनी यश मिळवले.

कोविड- १९ आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका सेनापतीप्रमाणे काम केले हे सर्वांनाच मान्य करावे लागेल.

आपल्या आरोग्य खात्यातील डॉक्टर व नर्सेस यांना या आपत्तीविरुद्ध आघाडीवरील सैनिक म्हणून लढण्यासही त्यांनी योग्य तर्‍हेने प्रेरित केले. त्याचाच परिणाम म्हणून गोव्यातील सर्व सातही कोरोनारुग्ण रोगमुक्त तर झालेच, शिवाय गोवाही कोरोनामुक्त बनून गोव्याने ग्रीन झोनमध्ये प्रवेश केला.

ईशान्येकडील मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही राज्ये ग्रीन झोनमध्ये जाणे व आंतरराष्ट्रीय खात्याचे गोवा हे राज्य ग्रीन झोनमध्ये जाणे यांच्यात तुलना केल्यास गोव्याचेच कौतुक करावे लागेल. ईशान्येकडील राज्ये ही दुर्गम प्रदेशातील राज्ये. तेथे जाणार्‍या देशी-विदेशी नागरिकांचा आकडा हा तुलनेने फारच कमी. गोव्यात मात्र येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांचा आकडा हा लाखोंच्या घरात. जेव्हा देश-विदेशात कोरोनाचा फैलाव झाला तेव्हा गोव्यात हजारो देशी व विदेशी पर्यटक पर्यटनासाठी आलेले होते. मात्र, असे असतानाही गोव्याने कोरोनावर विजय मिळवण्याचे काम केले. हा लेख लिहून होईपर्यंत गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता आणि निसर्गरम्य असे हिरवेगार गोवा कोरोनाच्या लढाईतही ग्रीनच होते. यापुढेही ते तसेच राहील अशी आशा करतानाच त्यासाठीचे सर्वते प्रयत्न करूया.

चला तर मग, आपण घरातून बाहेर पडताना रोज मास्क परिधान करूया, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूया आणि स्वतःबरोबरच दुसर्‍यांचाही कोरोनापासून बचाव करूया.

 

 

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

हृदय महत्त्वाचे आहे! निरोगी हृदयाला कोविडचा धोका नाही

डॉ. शिरीष एस. बोरकर(एम.एस. एम.सीएच. डी.एन.बी.)कार्डिओव्हास्न्युलर आणि थोरासिक सर्जरी- विभाग प्रमुख आणि प्राध्यापक, गो.मे.कॉ. ज्या रुग्णांना हृदयरोगाच्या समस्या...

हृदयास सांभाळा…!

डॉ. राजेंद्र रा. साखरदांडेसाखळी हृदयविकार असलेल्या लोकांनीही स्वतःची स्वतः काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे....

बाल हृदयरोग : समज/गैरसमज

- डॉ. रवींद्र पवार(बालरोग व गर्भाच्या हृदयरोग तज्ज्ञहेल्थवे हॉ.) बाल हृदयरोगाबद्दलची सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे की, बहुतांशी...

बिहारचा कौल

कोरोनाच्या विळख्यातून देश अद्याप मुक्त झालेला नसतानाच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहेत. विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपते आहे हे खरे असले तरी...

जुवारी पुलावरील चौपदरी मार्ग एप्रिलपर्यंत खुला : पाऊसकर

जुवारी पुलावरील चारपदरी रस्ते येत्या एप्रिल २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती काल बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना...

ALSO IN THIS SECTION

संत मोहनदास

ऍड. रमाकांत खलप अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह...

ततो युद्धाय युज्यस्व…

मीना समुद्र कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार...

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...