राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी गोवा प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची एक विशेष बैठक नवी दिल्ली येथे काल घेतली. प्रदेश काँग्रेसच्या काही नेत्यांमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतरांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा केली.
गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट कार्यरत असल्याची चर्चा आहे. अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी त्यांच्या विरोधातील गटाकडून बऱ्याच वेळा राष्ट्रीय नेतृत्वावर दबाव आणला जात आहे. या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांनी गोवा काँग्रेसच्या नेत्यांची काल बैठक आयोजित केली होती. वेणुगोपाल यांनी गोव्यातील नेत्यांची वैयक्तिक बैठक घेऊन पक्ष संघटन आणि इतर विषयांवर मते जाणून घेतली. यावेळी गोवा प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय नेतृत्वाने गोव्यात पक्षसंघटन मजबूतीसाठी स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतली. गोव्यातील नेत्यांमध्ये अंतर्गत हेवेदावे नाहीत, असा दावा डॉ. निंबाळकर यांनी केला.

